Full Width(True/False)

माध्यम नव्हे, आशय महत्त्वाचा: सुश्मिता सेन

प्रशांत जैन ० तू दहा वर्षं इंडस्ट्रीपासून दूर होतीस. यामागे काही खास कारण? - गेली दहा वर्षं माझ्यासाठी छान गेली. तेव्हा माझी मुलगी अलीसा लहान होती. तिचं बालपण अनुभवायचं, त्याचा आनंद घ्यायचा असं मी ठरवलं होतं. कारण, मोठ्या मुलीचं बालपण मला अनुभवता आलं नव्हतं. त्या काळात मी तीन चित्रपट करत होते. तिच्यावर मी अन्याय केला अशी रुखरुख मनाला लागली होती. म्हणून अलीसाचं बालपण एन्जॉय करण्याचा निर्णय मी घेतला. अलीसा जेव्हा पाच वर्षांची होती. तेव्हाच माझ्या आजाराचं निदान झालं. काही वर्षं उपचार घेण्यात गेली. त्या दरम्यान कमबॅक करण्यासारख्या स्क्रिप्टची विचारणा झाली नाही. आता माझी तब्येतही ठीक आहे आणि मुलगी दहा वर्षांची झाली आहे. त्यामुळे पुन्हा काम करतेय. ० ओटीटीच्या माध्यमातूनच कमबॅक करायचं असं ठरवलं होतंस का? - वयाच्या २० ते ३० वर्षं या काळात माझ्यासाठी मोठा पडदा महत्त्वाचा होता. पण, माध्यम नव्हे, तर आशय महत्त्वाचा आहे नंतर लक्षात आलं. कमबॅक करण्याचा विचार केला तेव्हासुद्धा मी माध्यमाला नव्हे तर आशयाला प्राधान्य दिलं. ० इंडस्ट्रीमध्ये सध्या आऊडसाइडर आणि इनसाइडर यावरुन जोरदार चर्चा सुरू आहे. तू स्वत: आऊटसाइडर आहेस. तुला याबाबत काय वाटतं? - प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये घराणेशाही चालते. पण, लोक सध्या असे वागताहेत की जणू त्यांना यापूर्वी घराणेशाहीबद्दल काहीच माहीत नव्हतं. त्याबद्दल आवाज उठवला की, मूळ मुद्दा राहतो बाजूला आणि वेगळ्याच गोष्टींवर चर्चा होते. म्हणून मी याबद्दल व्यक्त होणं टाळते. एवढे जण बोलत असताना मी आवाज उठवून काही फायदा होणार नाही. उलट, लोकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागेल. ० मिस युनिव्हर्स झाल्यापासून आतापर्यंतच्या प्रवासाकडे कशी बघतेस? - माझा आतापर्यंतचा प्रवास कमालीचा झाला आहे. वयाच्या १८ वर्षांपर्यंत मी इतर कोणत्याही देशात पाऊल ठेवलं नव्हतं. कधीच एकटी बाहेर गेले नव्हते. एवढंच नव्हे, तर मला इंग्रजीत नीट बोलतासुद्धा येत नव्हतं. मला एवढंच माहीत होतं की, माझा देशच माझी ओळख आहे. माझे वडील हवाई दलात होते. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की, तू देशासाठी काहीतरी करावंस. 'मिस युनिव्हर्स' आणि त्यानंतर आलेल्या अनुभवांनी मला घडवलं. मी जवळपास ३५ देश फिरले आहे. ते अनुभव नेहमीच उपयोगी पडतात. ० एकल पालकत्वाचा अनुभव कसा आहे? - मुलींसाठी तू आई आणि वडील अशा दोन्ही भूमिका पार पाडतेस असं मला वारंवार विचारलं जातं. याबद्दल मला वाटतं की, आजच्या युगात प्रत्येक आई दोन भूमिका बजावत असते. याशिवाय आणखीन एक जबाबदारी माझ्यावर आहे. ती म्हणजे माझी आर्थिक बाजू मलाच बघावी लागते. यामुळे माझी क्षमता वाढली आहे. मला असं वाटतं की, कोणत्याही जबाबदाऱ्या निभावण्यासाठी आपण घाबरत नाही, तेव्हाच आपली क्षमता वाढते. एकल पालकत्व सोपं नाही. अशावेळी प्राधान्यक्रम किंवा प्राथमिक गरजा काय आहेत, याचा प्रामुख्यानं विचार करायला हवा. त्यानुसार तुम्ही एकेक पाऊल पुढे टाकता. एकल पालकत्व सोपं नव्हे. पण, कोणत्याही जबाबदाऱ्या निभावण्यासाठी आपण घाबरत नाही, तेव्हाच आपली क्षमता वाढते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3i38yU0