पाटणा: अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या बातमीनं बॉलिवूडसह अवघ्या मनोरंजनसृष्टीला जबरदस्त धक्का बसला. एवढ्या कमी वयात यशस्वी झालेल्या या तरुण-गुणी अभिनेत्याची एक्झिट सर्वांच्या मनाला चटका लावून जाणारी ठरली. सोमवारी त्याच्यावर मुंबईतील विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. सुशांतच्या अस्थींचे आज पाटणा येथील गंगा घाटावर विसर्जन करण्यात आले. सुशांतचे वडिल आणि त्याच्या बहिणींनी गुरुवारी दुपारी पाटणा येथील गंगा घाटावर सुशांतच्या केलं. सुशांतची बहिण श्वेतासिंह किर्तीनं हिनं तिच्या फेसबुक पोस्टवर या बद्दल माहिती दिली होती. श्वेता अमेरिकेतून पाटण्यात आली आहे. सुशांतच्या निधनाची बातमी कळल्यानंतर त्याच्या वडिलांची तब्येत बिघडली होती. पण आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. सुशांतच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. बहीण श्वेता अमेरिकेत असल्यामुळे अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकली नव्हती. पण आता ती वडिलांकडं पाटण्याला पोहोचली आहे. तिनं फेसबुकवर याची माहिती दिली. यासोबतच सुशांतसाठी प्रार्थना करणारे आणि मदत करणाऱ्या अनेकांचे तिनं आभार मानले आहेत. श्वेता म्हणाली की, 'आज आम्ही भावाचं अस्थिविसर्जन करत आहोत. तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा, त्याला चांगल्या आठवणींसोबत आणि प्रेमानं अखेरचा निरोप द्या. त्याचं आयुष्य साजरं करा आणि आनंदाने त्याला निरोप द्या.' दरम्यान, यशाच्या शिखरावर असलेल्या सुशांतनं रविवारी दुपारी मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून केली होती. त्याच्या या आत्महत्येनं केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर देशही हळहळला. कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्याच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्याच्या आत्महत्येच्या कारणांवरून सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत. याला आत्महत्येला भाग पाडण्यात आलं आहे, असं काहींचं म्हणणं आहे. तर, तो सिनेसृष्टीतील राजकारणाचा बळी ठरला आहे, असा आरोप काहींनी केला आहे. चित्रपटसृष्टीत ठराविक घराण्यांचं प्रचंड वर्चस्व आहे. त्या घराण्याशी संबंधित नसलेल्या किंवा एखादा गॉडफादर नसलेल्या नवोदितास इथं टिकून राहणं नेहमीच कठीण जात असल्याचं सांगितलं जातं. बॉलिवूडमधील कंगना राणावत सारख्या अभिनेत्री सातत्यानं त्या विरोधात आवाज उठवत आल्या आहेत. सुशांतच्या आत्महत्येनं पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2N7IzMZ