Full Width(True/False)

सरोज खान यांना अखेरचा निरोप; मालाडच्या कब्रस्तानात केले दफन

मुंबई: बॉलिवूडमधील निर्माता, दिग्दर्शकांनाही ज्यांच्यापुढं नमून राहावं लागतं अशा अनेक तारेतारकांना आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या प्रसिद्ध कोरिओग्राफर यांना शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थित त्यांचा दफनविधी पार पडला. गेल्या काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत असल्यानं सरोज खान यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज रात्री १ वाजून ५२ मिनिटांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राण ज्योत मावळली. त्या ७२ वर्षांच्या होत्या. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची करोना चाचणी देखील करण्यात आली होती. त्याचे रिपोट्स हे निगेटिव्ह आले होते. करोनामुळं लॉकडाऊन सुरू असल्यानं कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थित मालाड इथं त्यांचा दफनविधी पार पडला. लॉकडाऊन असल्याकारणानं सेलिब्रिटींनी सरोज यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. जेनेलिया डिसूजा- देशमुख, रितेश देशमुख, मनोज बाजपेयी, सुनील ग्रोवर,अक्षय कुमार, कोरिओग्राफर रेमो डिसूजा, निमरत कौर आणि यांनी भावुक मेसेज लिहित सरोज खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या सगळ्यात सरोज खान यांची सर्वात आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षितही भावुक झाली असून माधुरी आणि सरोज यांनी एकत्र अनेक हिट गाणी दिली. माधुरीनं इन्स्टाग्रामवर सरोज यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करत म्हटलं आहे की, 'आज मला शब्द सुचत नाहीयेत. माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून सरोजजी माझ्यासोबत होत्या. त्यांनी मला खूप काही शिकवलं. फक्त डान्सच नाही तर त्याहून अधिक त्यांनी मला शिकवलं. माझं हे नुकसान कधीही न भरून येण्यासारखं आहे.' २२ नोव्हेंबर १९४८ रोजी सरोज खान यांचा जन्म झाला होता. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून त्यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती. त्यांना लहानपणापासून नृत्याची आवड होती. विशेष म्हणजे त्यांनी नृत्याचं कोणतंही शिक्षण घेतलं नव्हतं. सरोज खान यांनी दोन हजारांहून अधिक गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन केलं होतं. त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास'मधील 'डोला रे डोला', माधुरी दीक्षितच्या 'तेजाब' सिनेमातील 'एक दो तीन' आणि २००७ मध्ये आलेल्या 'जब वी मेट' सिनेमातील 'ए इश्क हाए' या गाण्यांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसंच 'मैं नागिन तू सपेरा' आणि 'हवा हवाई' ही त्यांची गाणी प्रचंड गाजली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dUNAnc