मुंबई- प्रसिद्ध दिग्दर्शक यांचे सोमवारी वयाच्या ५० व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या दोन वर्षांपासून ते लिवर सोरायसिस या आजाराशी लढत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना हैदराबाद येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र आज दुपारी ३ वाजून २४ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. ‘दृश्यम’ आणि ‘मदारी’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या निशिकांतच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलं. अजय देवगणने ट्वीट करत म्हटलं की, 'निशिकांतशी माझं नातं फक्त दृश्यमपुरता मर्यादित नव्हतं. त्यानंतरही आम्ही एकत्र होतो. ही एक अशी गोष्ट होती जी मी काळजीपूर्वक सांभाळली होती. तो नेहमी हसतमूख असायचा. तो फार लवकर गेला. तुझ्या आत्म्याला शांती लाभो निशिकांत.' इतर सेलिब्रिटींनीही काहीशा अशाच प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे सिनेमे केले दिग्दर्शित निशिकांत कामत यांनी २००५ मध्ये दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्याआधी त्यांनी काही मराठी सिनेमांमध्ये अभिनेता म्हणून काम केले होते. डोंबिवली फास्ट हा त्यांचा पहिला दिग्दर्शित सिनेमा. २००८ मध्ये मुंबई बॉम्बस्फोटावर आधारित 'मुंबई मेरी जान' या सिनेमाच्या दिग्दर्शनातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर त्यांनी अनेक मराठी- हिंदी आणि इतर भाषिक सिनेमांचं दिग्दर्शन केलं. यात 'फोर्स', 'लय भारी', 'दृश्यम', 'रॉकी हँडसम', 'मदारी' या गाजलेल्या सिनेमांचा समावेश आहे. निशिकांत यांच्या साऱ्याच सिनेमांना प्रेक्षक आणि समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. दरम्यान, जुलै महिन्यात कावीळ आणि पोट दुखीच्या त्रासामुळे हैदराबाद येथील गचीबोवली स्थित एआयजी इस्पितळात भरती करण्यात आलं. यावेळी त्यांना क्रॉनिक लिव्हर डिजीज आणि अन्य आजारांचं संक्रमण झाल्याचं कळलं होतं. यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31Yr74G