Full Width(True/False)

करोना काळात वेब सीरिजचा 'हा' अतिरेक 'मनोभंजक' ठरू नये एवढीच अपेक्षा!

लॉकडाउनच्या काळात थिएटर्स बंद असल्यानं नवे चित्रपट थांबून आहेत. ओटीटीवर काही प्रमाणात चित्रपट येत आहेत. पण, त्याबरोबरच ओटीटीवर प्रेक्षकांना वेब सीरिजच्या माध्यमातून नवनवीन आशय बघायला मिळतोय. या कठीण काळात प्रेक्षकांना खिळवून ठेवणं हे मोठं आव्हान ओटीटीसमोर आहे. यावर त्यांनी थ्रिलरचा पर्याय शोधून काढला आहे. क्राइम, सायफाय आणि सायकॉलॉजिकल अशा तिन्ही प्रकारच्या सीरिज प्रदर्शित होत आहेत. त्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जातंय. पण, यातही तोच-तोचपणा येऊ लागल्यामुळे किंवा एकाच पठडीतल्या सीरिजमुळे प्रेक्षक कंटाळून त्याकडे पाठ फिरवण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून प्रदर्शित झालेल्या वेब सीरिजवर नजर टाकली असता, बहुतांश सीरिज थ्रिलर या प्रकारात मोडणाऱ्या आहेत. त्यामध्ये 'शी', 'स्पेशल ओप्स', 'एक थी बेगम' (मराठी), 'द रायकर केस', 'पाताल लोक', 'रक्तांचल' आणि 'ब्रीद इनटू द शॅडोज' या सीरिजची नावं प्रामुख्यानं समोर येतात. गेल्या वर्षीसुद्धा थ्रिलर सीरिजचा बोलबाला पाहायला मिळाला होता. 'सेक्रेड गेम्स २', 'क्रिमिनल जस्टीस', 'डेली क्राइम', 'हॉस्टेजेस', 'द फायनल कॉल' आणि 'अपहरण' या सीरिजची चर्चा झाली. आगामी 'दिल्ली' आणि 'द लास्ट अवर' या सीरिज थ्रिलर या प्रकारात मोडणाऱ्या आहेत. थ्रिलरचे प्रकार कोणते? - गुन्हेगारी (क्राइम) - गुन्हेगारी नाट्य (क्राइम ड्रामा) - सायकोलॉजिकल - सायफाय परदेशी सीरिजचं आकर्षण गेल्या काही महिन्यांमध्ये प्रदर्शित झालेल्या परदेशी थ्रिलर सीरिज आपल्याकडेही चांगल्याच गाजल्या. भारतीय प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतलं असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. 'मनी हाइस्ट', 'डार्क', 'एलाइट' आणि 'फौदा' या सीरिजची नावं प्रामुख्यानं घ्यायला हवी. येत्या काळातही या प्रकारात अनेक परदेशी सीरिज पाहायला मिळणार आहेत, असं तज्ज्ञ सांगतात. ०००० थ्रिलर हा प्रकार उत्कंठावर्धक आहे. गुन्हेगारी विश्वातील घडामोडींबद्दल जाणून घेण्याचं एक सुप्त आकर्षण लोकांना असतं. त्यामुळे भारतीय आणि परदेशी थ्रिलर सीरिजना मोठ्या प्रमाणात प्रेक्षक असतो. पुढे हा प्रकार किती चालेल हे सांगणं शक्य नाही. कारण तोच-तोचपणा येऊ लागला आहे. एकाच पठडीत मोडणाऱ्या सीरिज येत आहेत. त्यामुळे प्रेक्षक कंटाळून याकडे पाठ फिरवू लागले आहेत. - सचिन दरेकर, दिग्दर्शक, एक थी बेगम (वेब सीरिज) भारतीय प्रेक्षकांना पहिल्यापासून थ्रिलरचं आकर्षण आहे. म्हणून सीरिजविश्वातही हाच फॉर्म्युला वापरला जातोय. वास्तवाचं प्रतिबिंब दिसलं, की त्याला प्रेक्षक लगेचच त्याच्याशी जोडला जातो. म्हणून थ्रिलरना पसंती मिळते. एकामागोमाग एक थ्रिलर सीरिज प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे सध्या या प्रकाराचा अतिरेक होतोय असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. - अमोल उद्गीरकर, वेब सीरिज अभ्यासक दृकश्राव्य माध्यमात तंत्रज्ञानाच्या प्रभावानं तावूनसुलाखून विकसित झालेला 'थरार'चा फॉर्म्युला प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी वेब सीरिजमध्ये सर्रास वापरला जात आहे. मनोरंजन करुन घेण्यासाठी 'थरार' हा नाट्यप्रकार नक्कीच चांगला आहे. पण, त्याचा अतिरेक झाल्यास, दुसऱ्यांवर विश्वास ठेवण्याच्या मनाच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्याचे पडसाद सामाजिक किंवा घरगुती नातेसंबंधांवर उमटू शकतात. करोनाकाळात हा अतिरेक 'मनोभंजक' ठरू नये एवढीच अपेक्षा! - डॉ. आशिष देशपांडे, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gtkMUH