मुंबई: शहरातील असो किंवा ग्रामीण भागातील, कामानिमित्त असो किंवा नोकरीनिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे. स्वच्छतागृहाअभावी महिलांची होणारी कुचंबणा थांबविण्यासाठी प्रयत्न होताना दिसतात पण सध्या जी काही स्वच्छतागृहं आहेत तिथं अस्वच्छतेचा प्रश्न मोठा आहे. याच संदर्भात मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री हेमांगी कवी हिनं शेअर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हेमांगीनं सार्वजनीक ठिकाणी वापरताना महिलांना किती त्रास सहन करावा लागतो, हे तिच्या पोस्टमधून दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक ठिकणी स्त्री आणि पुरुषांसाठी एकाच कॉमन टॉयलेची सोय असते. त्यात हे वेस्टर्न पद्धतीचं म्हणजेच कमोड असेल तर महिलांची अस्वच्छतेमुळं कुचंबना होत असते, असं तिनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. काय लिहिलं आहे हेमांगीनं? हल्ली बऱ्याच कामाच्या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट (कमोड) असतात. त्यात काही कॉमन म्हणजे स्त्री- पुरुषांकरता एकच टॉयलेट असतं. अश्यावेळी ते टॉयलेट कसं वापरावं याचं ज्ञान हे शाळेत किंवा घरातच पालकांनी लहानवयात आपल्या मुलामुलींना द्यायला हवं. अत्यंत गरजेचा विषय आहे समजून! पुरुष मूत्र विसर्जन करताना कमोडच्या रिंग वर, आजूबाजूला जी काही रांगोळी करून ठेवतात ते बघूनच अंगावर शिसारी येते. स्त्रियांची मूत्र विसर्जन करायची पद्धत या पुरुषांना माहीत नसते का? की याचा विचारच केला जात नाही? की अश्या घाणेरड्या कमोडवर त्या कश्या बसत असतील? बसत नसतील तर मग कशा मॅनेज करत असतील? त्यांचा हा मूलभूत नैसर्गिक हक्क बजावताना काय द्राविडी प्राणायाम करत असतील याचा विचार होत नाही का? मासिक पाळी ( #periods, menustral cycle) च्या वेळी काय करत असतील याचा विचार होत नाही का? होत नसेल तर करावा. स्त्री पुरुष दोघांनी! # कमोड कसं वापरावं हे कळत, माहीत नसेल तर न लाजता विचारावं, शिकून घ्यावं! कारण त्याचा थेट संबंध दोघांच्या ही स्वच्छता,आरोग्याशी असतो! सगळ्यांनी या विषयी खुले पणानं बोलावं! कित्येकदा काहीजण आपला कार्यभाग उरकल्यावर प्लशही करत नाहीत... अरे काय? एक बटन दाबायचं असतं फक्त... तेवढं ही होऊ नये आपल्याकडून? बरं ते दिवसभर पुन्हा आपल्यालाच वापरायचं असतं. या गोष्टीकडे आपण कधीच गांभीर्याने पाहत नाही किंवा हसण्याचा, चेष्टेचा विषय म्हणून सोडून देतो... पण त्यामुळे होणारे अनेक त्रास, याकडे अनाहूतपणे आपण दुर्लक्ष करतोय. हे शिकून किंवा समजून घेण्यात काहीच कमीपणा नाही. उलट स्त्रियांचं आरोग्य यावर ही अवलंबून असतं याचा विचार करावा! प्रत्येकाला 'मनासारखं' 'मनोसोक्त' हलकं व्हावंसं वाटत असतं याचा आदर व्हावा एवढीच इच्छा!
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31PC0ps