मुंबई : रंगभूमी, चित्रपट व मालिका क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत असलेले ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोहर गौरू शिंदे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवारी पहाटे निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. मुंबई दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या अधिकारी बंधू यांची निर्मिती आणि अनिल कालेलकर यांचे लेखन असलेल्या बंदिनी, परमवीर, हॅलो इन्स्पेक्टर, रणांगण आदी अनेक मराठी मालिकांसह काही चित्रपटातही यांनी भूमिका साकारल्या. शिवसेनेचे माजी उपविभाग प्रमुख अशोक शिंदे आणि ज्येष्ठ पत्रकार सदानंद शिंदे यांचे ते थोरले बंधू होत. शासकीय नोकरी सांभाळून हौशी कलावंत ते व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपट व मालिका असा अभिनय प्रवास केलेले शिंदे हे उत्तम अभिनेते होतेच शिवाय त्यांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसह कामगार आणि व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी अनेक नाटके दिग्दर्शित केली आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'माझं काय चुकलं' या नाटकाला कामगार रंगभूमीच्या स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिक मिळाली आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Q37djf