अभिनेता सैफ अली खान आत्मचरित्र लिहित असल्याची बातमी नुकतीच तुम्ही वाचली असेल. सैफनं नुकताच त्याचा ५० वा वाढदिवस साजरा केला. या आत्मचरित्रात सैफनं त्याचे अनुभव, कौटुंबिक आणि करिअरमधील चढ- उतार याबद्दल सांगितलं आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, या पुस्तकात सैफच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग दिसेल. अनेक मुद्द्यांवर तो परखडपणे भाष्यही करताना दिसेल. तसंच अनेक अनुभव सांगताना त्याला विनोदाची फोडणीही या पुस्तकात असेल. आत्मचरित्राबद्दल बोलताना सैफ म्हणाला की, इतक्या गोष्टी बदलल्या आहेत की जर त्या नोंदवून ठेवल्या नाहीत तर काळासोबत निघून जातील. भूतकाळात जाणं मजेशीर असेल. आठवणं आणि रेकॉर्ड करणं हा अनुभवही आनंददायी होता. मी आशा करतो की इतरांमाही हे पुस्तक तेवढंच आवडेल.
आपल्या लाडक्या स्टार्सविषयी जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच असते. आत्मचरित्रांतून अशा अनेक चटपटीत गोष्टी कळत असल्यानं ती मोठ्या प्रमाणावर वाचली जातात.देशातल्या एखाद्या भागातून मुंबईत पाऊल टाकून, खूप संघर्ष करून पुढे बॉलिवूडमध्ये स्टार बनल्याची अनेक उदाहरणं आहेत. या लोकप्रिय कलाकारांचा जीवनप्रवास, त्यांनी केलेला संघर्ष, त्यांच्या खासगी आयुष्यातल्या गोष्टी, त्यांची प्रेमप्रकरणं हे सगळं जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना असते. जाणून घेऊ या, यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या बड्या कलाकारांच्या आत्मचरित्रातील गोष्टींविषयी.
देव आनंद
प्रचंड लोकप्रियता मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांनी त्यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या रोमांचक आयुष्याविषयी लिहिलं आहे. २००७ साली त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं होतं. त्यात त्यांनी आपल्या आईच्या निधनानंतर स्वतःला सावरत कशा प्रकारे मुंबई गाठली तो प्रवास मांडलाय. त्यावेळी त्यांच्या वडिलांकडे त्यांचा मुंबईला जाण्याचा, तिथे राहण्याचा खर्च करण्याइतके पैसे नव्हते. तरीसुद्धा देव आनंद यांनी मुंबई गाठली. त्यांनी यात हिंदी सिनेसृष्टीमधल्या त्यांच्या संघर्षाविषयीसुद्धा लिहिलं आहे. इ.स १९७५च्या राष्ट्रीय आपत्तीचा सिनेसृष्टीवर झालेल्या परिणामांविषयी ते व्यक्त झाले आहेत. तर सुरैया, मोना सिंहा, मुमताज, वरिदा रहमान, जिनत अमान, दिलीप कुमार आणि किशोर कुमार यांच्याशी असलेल्या नात्यांविषयी त्यांनी खूप उत्कटपणे लिहिलं आहे.
रामगोपाल वर्मा
रामगोपाल वर्मा यांच्या 'गन्स अँड थाईस : द स्टोरी ऑफ माय लाइफ' या आत्मचरित्रात त्यांनी, उजेडात न आलेल्या अनेक घटनांवर भाष्य केलंय. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात ज्या स्पष्टपणे बॉलिवूड क्षेत्राविषयी लिहिलंय, त्याच कठोरतेनं त्यांनी अनेक दुय्यम कलाकार आणि चित्रपट समीक्षकांशी असलेल्या त्यांच्या नात्याविषयीसुद्धा लिहिलं आहे. सहा भागांत असलेल्या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी बॉलिवूडमधील काही देवमाणसांविषयी लिहिलंय. यात अमिताभ बच्चन, श्रीदेवी आणि ए आर रहमान यांची नावं आहेत. त्यांना अनुभवाव्या लागलेल्या अपयशाविषयी कुठेही कमीपणा न ठेवता त्यांनी अगदी मोकळेपणानं लिहिलं आहे. त्यांनी त्यांच्या फ्लॉप सिनेमांविषयीसुद्धा लिहिलंय. 'पुरस्कार हे माझ्यासाठी निरर्थक आहेत, उलट चित्रपटांना प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रेम जास्त महत्वाचं आहे', असं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय त्यांनी अभिनेता आणि स्टार यात असलेलं अंतर काय असते याविषयी लिहिलंय.
नसिरुद्दीन शाह
ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी 'एंड देन वन डे' हे आत्मचरित्र लिहिलं. २०१४ साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी अनेक घटनांवर भाष्य केलंय. संघर्ष करणाऱ्या कलाकारानं ते नक्कीच वाचलं पाहिजे. ते १९ वर्षांचे असताना त्यांचा (परवीन मुराद) यांच्याशी झालेल्या लग्नाविषयी त्यांनी लिहिलंय. लग्न झाल्यानंतर दहा महिन्यांनी त्यांची एनएसडीमध्ये निवड झाल्याचं त्यांना कळलं. तेव्हा ते पिता होणार होते. त्यांच्या मुलीचा जन्म पुढच्या काही दिवसांत होणार होता. पुढे १२ वर्षे आपल्या मुलीला न पाहिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. नात्यांवरुन होणारी भांडणं असो वा दुसरी बायको रत्ना पाठक यांच्या प्रेमात पडणं असो, बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींना नापसंत करणं असो, अशा अनेक गोष्टी त्यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितल्या आहेत.
दिलीपकुमार
बॉलिवूडचे एक महान कलाकार दिलीपकुमार यांनी 'दिलीपकुमार- द सबस्टान्स अँड द शॅडो' हे आत्मचरित्र लिहिलं. २००७ साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक रहस्यमय गोष्टींना उजळा दिलाय. आपण वडील होऊ शकत नसल्याची खंत ते यात व्यक्त करतात. तर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या लग्नाविषयीच्या अफवांवरसुद्धा भाष्य केलंय. तेव्हा असं म्हंटल जात होतं, की दिलीपकुमार यांनी संततीच्या इच्छेपोटी आसमाशी लग्न केलं. पण, खरं तर त्यांनी दोन वर्षांनी आसमाला घटस्फोट दिला होता. दिलीपकुमार यांनी त्यांच्या पिता न होण्यामागचं खरं कारणसुद्धा सांगितलंय. १९७२ साली त्यांच्या पत्नी सायरा गरोदर होत्या. पण, उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे त्यांना श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. त्यामुळे गर्भाशयातील आठ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा अनेक गोष्टी दिलीपकुमार यांनी यात सांगितल्या आहेत.
करण जोहर
निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांनी त्यांच्या 'अॅन अनसुटेबल बॉय' या आत्मचरित्रात अनेक गोष्टींविषयी सांगितलंय. चर्चेत राहणाऱ्या अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केलंय. मग ते एलजीबीटी असणं, असो वा शाहरुख खानशी असलेलं नातं असो, वा त्यांची २५ वर्षे चालत आलेली मैत्री तुटण्याविषयी असो किंवा अभिनेत्री करिना कपूरनं एका सिनेमासाठी विशिष्ट रकमेच्या केलेल्या मागणीविषयी असो अशा अनेक गोष्टींवर स्पष्टपणे व्यक्त होत त्यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं आहे. २०१६ साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी म्हटलं आहे, की 'जग काहीही बोलू द्या, आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांनी काजोलविषयी म्हटलं आहे, आता आमची २५ वर्ष जुनी मैत्री संपली आहे. करिना कपूरनं त्यांच्या एका चित्रपटात काम करण्यासाठी केलेल्या पैशांच्या मागणीमुळे ते नाराज झाले होते.
संकलन:- सुरज खरटमल
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3keH4eh