Full Width(True/False)

अमिताभ बच्चन म्हणतात;... तेव्हाच काम करणं थांबवेन

मुंबई :'आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवले. पण, त्यातूनच शिकत गेलो. स्वतःमध्ये सुधारणा करत राहिलो. आजही नवीन चित्रपट किंवा प्रोजेक्ट्सवर काम करताना ते यशस्वी होतील की नाही याची चिंता असतेच. कुणी काही बोललं तरी कायम कामावरच लक्ष्य केंद्रित करत असतो. वयानुसार मला आजही काम मिळत आहे. जेव्हा काम मिळणं बंद होईल, तेव्हाच थांबेन. जोपर्यंत काम मिळत राहील आणि रसिक 'थांबा' असं म्हणणार नाहीत, तोपर्यंत मी काम करतच राहेन'... हे प्रेरणादायी शब्द आहेत, बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या शहेनशाह यांचे. ज्येष्ठ अभिनेते, महानायक यांची जादू आजही कायम आहे. एका विद्यापीठाच्या ऑनलाइन कार्यक्रमादरम्यान बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी वरील उद्गार काढले. मुलांच्या प्रश्नांना त्यांनी मनमोकळेपणानं उत्तरंही दिली. ते पुढे म्हणाले, की 'कलाकारांना सामान्य माणसाच्या आयुष्याशी काही देणंघेणं नसते हा समज चुकीचा आहे. भारतीय चित्रपट क्षेत्रातील बहुतांश कलाकार आपापल्या परीनं सामाजिक बांधिलकी जपतात. मात्र त्याची फारशी चर्चा करत नाहीत' असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. 'करोनाच्या काळात डॉक्टर-नर्स यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केलेलं काम, त्यांचा त्याग प्रशंसनीय आहे. देवळात देव शोधू नका..तो अनुभवायचा असेल, तर रुग्णालयात जा. तिथे डॉक्टर आणि नर्सेसच्या रुपात खरे देवदूत मिळतील. नैराश्यात असलेल्या लोकांशी बोलले पाहिजे...संवादाने खूप गोष्टी साध्य होऊ शकतात. चर्चा आणि संवाद साधला नाही तर उत्तरं मिळू शकणार नाहीत.' असं बच्चन यांनी त्यांच्या खास शैलीत सांगितलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Hn84Ks