Full Width(True/False)

हळूहळू आम्हाला माणसंही कळायला लागली...वैभव मांगलेच्या गावकडच्या गोष्टी

माझी बायको मयुरी औषध तयार करणाऱ्या एका प्रसिद्ध कंपनीमध्ये काम करते. आतापर्यंत तिनं स्वतःच्या ज्ञानावर खूप मेहनत घेऊन त्या कंपनीमधल्या क्लिनिकल रिसर्च या विभागामध्ये मानाचं स्थान मिळवलं आहे. तिच्या कामाबद्दल आम्हाला आदर आहे. या दरम्यान त्या कंपनीनं अमेरिकेमध्ये एक अभ्यास केला होता. त्यातून कंपनीचा मोठा फायदा झाला. अमेरिकेमधली बाजारपेठ खुली झाली. त्या अभ्यासाचं नेतृत्व करणारी जी टीम होती, त्यात खूप महत्त्वाची भूमिका माझ्या बायकोची होती. तेवढीच एक आनंदाची बातमी मिळाली. हळूहळू आता तिच्यावरच्या जबाबदाऱ्याही वाढणार होत्या, काम वाढणार होतं. कोळवणला रेंज येत होती. पण, व्हिडीओ कॉल करण्याएवढी नव्हती. मग आम्ही एका प्रसिद्ध कंपनीचा राऊटर घेतला. पण, त्यालाही रेंज मिळेलच याची खात्री नव्हती. मयुरी अस्सल आहे. तिला ग्रामीण जीवनाविषयी माहिती आहे, आदर आहे. पण तिथे राहायचा अनुभव नाही आणि अशा गैरसोयींमध्ये राहणं ही तिला फारसं सुसह्य झालं नाही. तिला तिथे राहणं हळूहळू अवघड व्हायला लागलं. सकाळी लवकर उठून २० लोकांच्या भाकऱ्या चुलीवर करत असे आणि नंतर तिच्या ऑफिसच्या कामाला लागत असे. पण, एकंदर तिला फार काळ इथे राहणं जमणार नव्हतं आणि खरं सांगायचं तर हळूहळू आम्हाला माणसंही कळायला लागली होती. नव्याचे नऊ दिवस सरले होते. मला कुणालाच दोष द्यायचा नाहीय. पण आपण तिथे फार काळ राहणं बरं नाही हे कळायला लागलं. मग आम्ही देवरुखला भावाच्या घरी राहायला यायचं ठरवलं आणि एक दिवस तिथून निघालो. आम्हा कुणासाठी नाही पण माझ्या मुलांसाठी हा कोळवणातला काळ फार महत्त्वाचा ठरला. त्यांना खूप माणसांमध्ये राहता यायला, तडजोडी करायला शिकता आलं, भावंडांशी भांडता आलं, रुसवे-फुगवे निस्तरता आले, खूप मौज करता आली. त्यांनी भरपूर आंबे खाल्ले, फणस खाल्ले. आंब्याची-फणसाची साटे कशी घालतात, चुलीवरचं जेवण कसं बनवतात हे कळलं, बनवता आलं. रानात-वनात जाऊन निसर्ग पाहता आला,त्याचा आनंद लुटता आला, त्यांना त्यांचं गाव अनुभवता आलं, विविध माणसं पाहता आली, चांगली माणसं - गरीब माणसं, अहंकारी माणसं, शिव्या देणारी माणसं पाहता आली. जगात आपल्याला समजून घेणारे आपले पालकच असतात याचाही प्रत्यय आला. माझी मोठी मुलगी कमालीची समंजस झाली. माझा मुलगा आणि ती हे एकमेकांचे खूप चांगले मित्र-मैत्रीण झाले. मी आणि बायको पुन्हा नव्यानं एकमेकांना समजून घेतोय असं वाटलं. माझ्यासाठी हा काळ स्वतःच्याही जवळ जाण्यासाठी उपयुक्त ठरला असं वाटतंय. आपल्याला नेमकं काय हवंय, कशाच्या मागे आपण आहोत, आपल्यातही किती ढोंगीपणा, उथळपणा आहे, किती खोली आहे विचारांची हेही पडताळता आलं. सगळंच काही छान छान नाही हे पाहायला-ऐकायला मिळालं. पण, आपली माणसं अधिकाधिक आपल्याजवळ आली हे मात्र नक्की. माझा भाऊ, त्यांची बायको यांचं आमच्या कुटुंबाशी नव्यानं बंध निर्माण झाले. एकूण हा करोनाचा काळ नव्यानं स्वतःला सापडत जाण्याचा निघाला हे मात्र खरं. समाप्त


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37C2eA2