Full Width(True/False)

सिनेरिव्ह्यू: लक्ष्मी

कल्पेशराज कुबल या बॉम्बला वात आहे. मोठ्या उत्साहानं आपण तो पेटवायला जातो. सुरुवातीला वात पेटायचं नावच घेत नाही. पण, कशीबशी फुरफुर होऊन वात जळू लागते. जळत जळत वात संपत आली आहे. आता मोठा धमाका होणार, असं आपल्याला वाटू लागतं. परंतु, सुरसुर फुरफुर होऊन 'बॉम्ब' तसाच राहतो. बॉम्ब फुटतच नाही. तरी, सावधगिरी म्हणून आपण थोडं थांबतो. आता फुटेल, आता फुटेल असं वाटतं. पण, शेवटी बॉम्ब हातात घेऊन निरखून बघितल्यावर जाणवतं की बॉम्बभोवती रस्सी घट्ट बांधलेली नव्हती. त्यामुळे केवळ दिसायला हा बॉम्ब टपोरा, धमाकेदार आहे, परंतु तेवढा परिणामकारक नाही. अशीच काहीशी गत '' या चित्रपटाची झाली आहे. प्रदर्शनापूर्वी सिनेमानं सर्वांना आर्कषित केलं होतं. चित्रपटाच्या नावावरुन वादंग झाला. परिणामी, चित्रपटाचं शीर्षकदेखील बदलण्यात आलं. विनोदाचा तडका असलेला भन्नाट, रंजक असा भयपट बघायला मिळेल असं प्रेक्षकांना वाटत होतं. परंतु, शेवटी निराशाच पदरी पडली. सिनेमातील कलाकारांचं काम, छायांकन, वेशभूषा आणि सिनेमाचं संगीत या गोष्टी स्वतंत्रपणे आपल्याला भावतात. पण, एक सिनेमा म्हणून बांधलेली पटकथा आणि त्याची ढिली मांडणी आपली निराशा करते. अनेकांनी 'कंचना' हा दाक्षिणात्य चित्रपट पाहिला असेल. याच 'कंचना' चित्रपटाचा अधिकृत रिमेक म्हणून 'लक्ष्मी' हिंदीत तयार झाला आहे. ज्यांनी 'कंचना' पाहिला आहे, त्यांना कदाचित 'लक्ष्मी' तितकासा भावणार नाही. 'कंचना'चा प्रभाव, 'लक्ष्मी'मध्ये नाही. ज्यानं कंचना दिग्दर्शित आणि अभिनयही केला आहे, त्याच राघव लॉरेन्सनं 'लक्ष्मी'देखील दिग्दर्शित केला आहे. असं असूनही त्या सिनेमाचा प्रभाव यावेळी दिग्दर्शकाला पडद्यावर उतरवता आलेला नाही. आपण तुलना करतोय कारण दोन्ही सिनेमांचा दिग्दर्शक एकच आहे. बाकी, स्वतंत्रपणे 'लक्ष्मी' चित्रपटाकडे पाहिलं, तरी सिनेमाला आपला परिणाम साधता आलेला नाही. मुळात एक सूडकथा असलेला 'लक्ष्मी' आपलं मनोरंजन करतो, ते केवळ त्यातील कलाकारांच्या अभिनयामुळे. बाकी गोष्ट आणि पटकथा, त्यातील विनोद सुमार आहेत. चित्रपटाची सुरुवात जर वास्तववादी होत असेल, सुरुवातीलाच नायकाच्या तोंडून ओरडून सांगितलं जात असेल की, 'भूत, आत्मा असं काही नसतं. काही ढोंगी बाबा विज्ञानातील काही रासायनिक प्रयोगांचा आधार घेऊन आपल्याला फसवत असतात. आत्मा-भूत नाही हे सांगण्यासाठी नायक विज्ञानाचे दाखले देतो. अशी गोष्ट (सिनेमाचं कथानक) पुढे जाऊन एका वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचा शेवट होण्याची अपेक्षा असते. पण, तसं होत नाही. विज्ञानाला, वैद्यकीय घटकांना, मानसिक स्थितीच्या (मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर) दाखल्यांना बाजूला सारुन नायक स्वतःलाच खोटं ठरवतो. त्यामुळे चित्रपट तुम्हाला पटत नाही. चित्रपटाची गोष्ट अशी आहे की, आसिफ (अक्षयकुमार) आणि रश्मी (कियारा आडवाणी) यांचा विवाह झाला आहे. पण, हा विवाह आंतरधर्मी (इंटर रिलेजन) आहे. त्यामुळे मुलीच्या घरचे, म्हणजेच रश्मीचे कुटुंबीय, खासकरून वडील नाराज आहेत. पण, लग्नाच्या काही वर्षांनंतर रश्मीला तिच्या आईचा फोन येतो आणि पतीसह माहेरी येण्याचं आमंत्रण मिळते. आसिफ आणि रश्मी माहेरी जातात. तिकडे काही घटना अशा घडतात की, असिफ हातात बांगड्या घालतो, साडी नेसतो. अगदी एखाद्या स्त्रीप्रमाणे वागू लागतो. त्याबरोबरच त्याच्या शरीरात आणखी काही व्यतिरेखा दिसू लागतात. पण, हे असं का होतं? त्यामागचं कारण काय आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल. सिनेमाचा पहिला सीन जोरदार आहे. अक्षयकुमारची एंट्री धमाकेदार आहे. अक्षयच्या परफॉर्मन्समध्ये कुठलीही कमतरता नाही. त्याचा उत्साह अफाट आहे. चित्रपटाची गोष्ट वेगानं पुढे सरकते. परंतु काही नाटकी दृश्यं सिनेमाचा वेग आणि परिणाम देखील मंदावतात. अक्षयनं स्वतःच्या भूमिकेत वेळोवेळी केलेले बदल, रूपांतर कौतुकास्पद आहे. लक्ष्मीच्या भूमिकेत असताना अक्षयच्या चेहऱ्यावरील भाव आणि देहबोली हुबेहुब स्त्रीसारखी असते. जे त्या भूमिकेसाठी महत्त्वपूर्ण आहे. दुसरीकडे कियारा आडवाणी सिनेमात असून नसल्यासारखी आहे. परंतु, तिची वेशभूषा, कपडेपट आकर्षित असल्यामुळे ती आपलं लक्ष वेधून घेते. सिनेमातील अश्विनी काळसेकर, राजेश शर्मा, आयशा रजा, मनु ऋषि यांचा अभिनयदेखील सरस आहे. पण, विनोदाचं टायमिंग मिसींग वाटतं. 'हॉरर' देखील ठीकठाक. सिनेमात विनाकारण गाण्यांचा भडीमार आहे. केवळ 'बम भोले' गाण्याचं संगीत आणि शब्द सुरेख आहेत. या सगळ्यात एका व्यक्तीचं मात्र कौतुक करावंच लागेल. ज्येष्ठ नाटककार-लेखक रत्नाकर मतकरी यांचं एक वाक्य आहे, की, 'अभिनय म्हणजे नटानं आपल्या शरीरात परक्या व्यक्तीला करू दिलेलं वास्तव्यच असते.' हे वाक्य अभिनेता शरद केळकर याच्या बाबीत तंतोतंत खरं ठरतं. 'लक्ष्मी'मधील शरदचं काम पाहिल्यावर हे तुम्हाला जाणवेल. यापूर्वीच्या सिनेमात त्यानं साकारलेली भूमिका जितकी उत्कृष्ट निभावली होती, तितक्याच ताकदीनं यावेळी शरदनं 'लक्ष्मी' साकारली आहे. शरद त्याच्या भूतकाळातील भूमिकांत अडकलेला नाही. आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून त्यानं काम केलं आहे. त्या स्क्रीनवर पाहणं, ही एक प्रकारे मेजवानी आहे. चित्रपटाचा शेवट पटण्यासारखा नसला, तरी व्यावहारिकदृष्ट्या सामाजिक संदेश देणारा आहे. त्यामुळे हा चित्रपट कलाकारांच्या अभिनयासाठी तरी एकदा बघायला हरकत नाही. सिनेमा : लक्ष्मी निर्मिती : फॉक्स स्टार स्टुडिओ लेखक / दिग्दर्शक : राघव लॉरेन्स कलाकार : , कियारा आडवाणी, अश्विनी काळसेकर, राजेश शर्मा, आयशा रजा, मनु ऋषि, शरद केळकर संगीत : अमर मोहिले, तनिष्क बॅगची, शशी डीजे खुशी, अनुप कुमार छायांकन : वेट्री पलनीसॅमी, कुश छाब्रिया संकलन : राजेश पांडे ओटीटी : डिस्नी प्लस हॉटस्टार दर्जा : २.५ स्टार


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kmgIH3