Full Width(True/False)

यंदाची दिवाळी कलाकारांसाठी आहे खास; ऐन सणासुदीला मिळणार 'ही' खास भेट

मुंबई टाइम्स टीम मालिकांतल्या कुटुंबांमध्ये सगळेच सणवार उत्साहानं साजरे होतात. तर सणांचा राजा असल्यानं प्रत्येक मालिकेत हा सण साजरा होताना दिसणार आहे. पुढच्या आठवड्यात दिवाळी सुरू होत असली, तरी त्याचं सेलिब्रेशन मात्र मालिकांच्या सेटवर आधीच सुरू झालं आहे. कारण, दीपावलीच्या प्रसंगांचं चित्रीकरण आगाऊ केलं जात असून, कलाकार-तंत्रज्ञांना ऐन सणासुदीला सुट्ट्यांची भेट मिळणार आहे. त्यामुळे सेटवर सध्या आनंदीआनंद पाहायला मिळतोय. '' या मालिकेत लतिका आणि अभिमन्यूची लग्नानंतरची पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे दिवाळीचा प्रत्येक दिवस मालिकेत दिसणार आहे. त्याचं आगाऊ चित्रीकरण करण्यात सगळेच व्यग्र आहेत. कॅमेऱ्यामागे सेटवर, कोण कुठला फराळ घेऊन येणार याविषयी कलाकारांमध्ये चर्चा रंगलेली असते. 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत सोहम आणि कीर्तीची पहिली दिवाळी आहे. उटणं लावण्यापासून ते अगदी लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असं सगळं मालिकेत बघायला मिळणार आहे. या दोन्ही मालिकांप्रमाणेच 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्येही जयदीप-गौरीची पहिली दिवाळी असल्यामुळे शिर्के पाटील कुटुंबात दणक्यात सेलिब्रेशन आहे. इतकंच नव्हे, तर जयदीप गौरीला पाडव्याचं खास गिफ्ट देणार आहे. या तिन्ही मालिकांच्या टीम्सना दिवाळीत सुट्टी आहे. दिवाळी आपापल्या घरी साजरी करायला मिळणार या आनंदानं सेटवर उत्साही वातावरण आहे. 'सुखी माणसाचा सदरा', 'रंग माझा वेगळा', 'माझ्या नवऱ्याची बायको' आणि 'माझा होशील ना' या मालिकांमध्येही दिवाळीतले सगळे प्रसंग दाखवले जाणार आहेत. या मालिकांच्या टीम्सना सुट्टी असणार आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेची प्रॉडक्शनची टीम काही महिन्यांपासून सेटवरच राहत आहे. दिवाळी निमित्तानं मिळणाऱ्या सुट्टीमध्ये घरी जायला मिळणार असल्यामुळे सगळे खुश आहेत. 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' आणि 'तुझं माझं जमतंय' या दोन्ही मालिकांमध्ये दिवाळी साजरी करताना दाखवली जाणार आहे. त्यासाठी मालिकांच्या भागांचं चित्रीकरणही झालं आहे. पण त्यांच्या सुट्ट्यांबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असं सांगितलं जातंय. काही मालिकांमध्ये काहीसे दु:खाचे ट्रॅक सुरू आहेत. 'राजा रानीची गं जोडी' आणि 'डॉ. डॉन' मालिकेत काहीसं दु:खद वातावरण असल्यामुळे तिथे दिवाळी दाखवली जाणार नाही. पण 'राजा रानीची...' या मालिकेच्या सेटवर उत्साह मात्र खूप आहे. खरेदी, फराळ या सगळ्यावर चर्चा होताना दिसतेय. कलाकार ऑनलाइन खरेदी करताना दिसताहेत. ऑनलाइन खरेदीचं पार्सल रोज सेटवर येतं. चित्रीकरण वेळेत संपवून सुट्टी घेण्याचा विचार सुरू आहे. 'जीव झाला येडापिसा' मालिकेमध्ये यशवंत लष्करे या व्यक्तिरेखेच्या येण्यानं खऱ्या अर्थानं लष्करे कुटुंबात दिवाळीचा वेगळाच उत्साह आहे. याचं चित्रीकरण सध्या सुरू असून दिवाळीत संपूर्ण टीमला सुट्टी मिळण्याबाबत विचार सुरू आहे. तर 'सहकुटुंब सहपरिवार'मध्ये अंजी दिवाळीच्या मुहुर्तावर पुन्हा आपल्या सासरी गृहप्रवेश करेल. त्यामुळे या सेटवरही चित्रीकरणाची लगबग सुरू आहे. दिवाळीच्या दिवसांत सुट्टी असल्यानं एपिसोड्सची बँक करून ठेवली जातेय. त्यासाठी मालिकेच्या टीम्सनी कंबर कसली आहे. एरवी मालिकेच्या भागाचं चित्रीकरण तीन ते चार दिवस आधी होत असतं. पण यावेळी अनेक मालिकांचं चित्रीकरण जवळपास ८ ते १० दिवस आधी होत आहे. डेलीसोपमध्ये काम करणाऱ्यांना सुट्टी फारशी मिळत नाही. पण, यंदा मालिकांतल्या कलाकार-तंत्रज्ञांना सुट्ट्यांचीच दिवाळी भेट मिळाली आहे. लॉकडाऊनच्या तीन महिन्यांनंतर पुन्हा चित्रीकरण सुरू झाल्यानंतर काही मालिकांच्या सेटवर त्यांची तंत्रज्ञ मंडळी राहत होती. आता सुट्टीच्या निमित्तानं त्यांना घरी जाता येणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2JOGvev