कल्पेशराज कुबल काही वर्षांपूर्वी अभिनेत्री विद्या बालनचा 'डर्टी पिक्चर' या नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. एका दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटातील विद्याच्या अभिनयाचं भरभरून कौतुक आणि प्रशंसा झाली होती. चित्रपटाची कथा देखील प्रेक्षकांना आवडली होती. पण, यावेळी अभिनित 'शकीला' या चित्रपटात अभिनयाच्या बाबतीत सर्वच कलाकारांनी उमदं काम केलं आहे. परंतु, चित्रपटाची कथा शेवटापर्यंत खुर्चीवर खिळवून ठेवण्यात अपयशी ठरली आहे. असं 'डर्टी पिक्चर'च्या बाबतीत झालं नव्हतं. इंद्रजित लंकेश लिखित आणि दिग्दर्शित दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री शकीलाचा हा चरित्रपट आहे. चित्रपटातील विविध पात्रांसाठी कलाकारांची केलेली निवड अचूक आहे. त्या कलाकारांनी देखील आपापल्या भूमिकांना संपूर्ण न्याय दिलाय. पण, आता माशी कुठे शिंकली? तर कथानकाची बांधणी अत्यंत ठिसूळ झाली आहे. त्यामुळे चित्रपट कंटाळवाणा होतो. एका छोट्या साधारण गावातील तरुणी शकीलाच्या शालेय जीवनातच तिच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र नाहीसे होते. घरात कमावणारं कोणी नसतं. आई, चार लहान बहिणी असा परिवार. आईनं यापूर्वी सिनेमांमध्ये ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केलेलं असतं. शकीलाला देखील अभिनयात रस असतो. शाळेत ती नाटकांमध्ये सहभागी होत असते. आईच्या सांगण्यावरून ती दाक्षिणात्य चित्रपट विश्वात तरुण वयातच पाऊल टाकते. प्रौढांसाठीच्या सिनेमांमध्ये तिला काम मिळतं. पण, जे करतोय ते योग्य नाही; हे शकीलाला जाणवत असतं. परंतु, नाईलाजास्तव ती 'ते' काम स्वीकारते. पण, या निर्णयामुळे तिला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यांनतर सुपरस्टार होण्यापर्यंतचा तिचा प्रवास, कालांतरानं तिच्या प्रौढांसाठीच्या सिनेमांवर येणारी बंदी, सिनेमामुळे समाजातील उलथापालथ अशी सरळ सोपी गोष्ट 'शकीला' चित्रपटातून दिग्दर्शकानं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण, ही गोष्ट सांगताना चित्रपट म्हणून किंबहुना सिनेमावरील दिग्दर्शकीय पकड फार दिसत नाही. साचेबंद पद्धतीनं चित्रपटाची गोष्ट पुढे जात असते. फ्लॅशबॅक म्हणून स्वतः शकीला हे पात्र स्वतःची गोष्ट एका सिनेलेखकाला सांगत आहे. जेणेकरून तो सिनेलेखक तिच्या चरित्रपटाचं लेखन करेल. पण, हा सर्व घाट शकीला या पत्रानं का घातला आहे? स्वतःचा बायोपिक बनवण्यामागचं काय कारण आहे? हे जाणून घ्यायचं असेल तर एकदा सिनेमा पाहायला हरकत नाही. शकीलाचे चित्रपट बघून राज्यातील महिलांवर होणाऱ्या अतिप्रसंगाच्या घटना वाढल्या असल्याचा युक्तीवाद सिनेमात अधोरेखित केला आहे. पण या आरोपांचे खंडन करताना शकीलाच्या तोंडी असलेले संवाद समर्पक आणि मार्मिक आहेत. ते ऐकून भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. शकीलाच्या भूमिकेत रिचा चड्डानं उत्तम काम केलं आहे. पात्रातील सहजता आणि मादकता तिनं अचूकपणे पडद्यावर आणली आहे. सिनेमात एका सुपरस्टारच्या भूमिकेत असलेले यांनी देखील आपला अभिनय दोन पैसे अधिकच ठेवला आहे. अनेकदा पंकज यांचे संवाद नसतानाही चेहऱ्यावरील हावभाव आणि देहबोलीतून त्यांनी संबंधित दृष्यातून प्रेरीत असलेला संदेश पडद्यावर सादर केला आहे. छायांकन आणि संकलन एकदम चकचकीत झालं आहे. वीर समर्थ आणि मीट ब्रदर्स यांनी संगीतबद्ध केलेली गाणी देखील मनोरंजक आहेत. पण, सिनेमाच्या कथेवर आणि पटकथेच्या बांधणीवर अधिक काम झालं असतं तर चित्रपट म्हणून 'शकीला' परिणामकारक झाला असता जो सध्या एखाद्या माहितीपटाप्रमाणे भासत आहे. सिनेमा : शकीला निर्मिती : सॅमी नंवानी कथा / दिग्दर्शन : इंद्रजीत लंकेश पटकथा : सुनील अग्रवाल कलाकार : रिचा चड्डा, पंकज त्रिपाठी, राजीव पिल्लई छायांकन : संतोष राय संकलन : बल्लू सलुजा दर्जा : २.५ स्टार
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37YHDFP