'घरकाम करणाऱ्या मावशी अजिबात नीट काम करत नाहीत', हे वाक्य माझ्यासकट ओळखीतल्या ९८ टक्के लोकांनी एकदा तरी म्हटलं असेल. हे बरोबरच आहे असं मलाही वाटत होतं. मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर झाला. तेव्हा माझ्या घरी मी, हेमंत, माझी आई (), आमचा मित्र आणि आमचा व्यंकू (पाळीव दोस्त) असे एकूण पाच जण राहात होतो. लॉकडाउन झाल्यामुळे कामाचं कसं होणार, बाहेर जाताच येत नाहीय, आर्थिक बाजू कशी सावरणार, खूप काळजी घ्यावी लागणार असे एक ना अनेक प्रश्न सतावत होते. त्यात आई आणि व्यंकूची जास्त काळजी वाटत होती. या सगळ्यात घरकाम करणाऱ्या मावशी येणार नाहीत, हा विचार जास्त ताण देणारा होता. तेव्हा आम्ही कामं वाटून घेतली. मी भांडी घासणार, आई पोळी किंवा भाकऱ्या बनवणार, समीर केर काढणार, हेमंत लादी पुसणार आणि व्यंकू शहाण्यासारखा वागणार. पहिला एक महिना म्हणजे एप्रिलच्या शेवटापर्यंत सगळं ठरल्याप्रमाणे पार पडत होतं. मग हळूहळू सगळेच तक्रार करु लागले. आई ओरडू लागली की, 'तुम्ही किती पोळ्या खाणार ते आधीच सांगा. नाही तर माझी मेहनत वाया जाते'. माझे केस गळतात. त्यामुळे केर वाढतो, हे समीर आणि हेमंतने माझ्या लक्षात आणून दिलं. त्यामुळे मी ठरवलं की, मी घरात असताना केस बांधूनच ठेवणार. तसंच काचेची भांडी जड असतात. ती धरुन-धरुन हात दुखतात, त्यामुळे ती वापरायची नाहीत हेही ठरवलं. मग आमच्या लक्षात आलं की, आपल्याला एवढा त्रास होतो तर घरकाम करणाऱ्या मावशी किती त्रास सहन करत असतील. त्या तर कधीच बोलून दाखवत नाहीत. घरकाम करणाऱ्या मावशींना पगार दिला म्हणजे झालं. त्यांना सांगितलेली कामं त्यांनी विनातक्रार केलीच पाहिजेत, असं आपण गृहीत धरतो. कधी तरी आपणही चालढकल करतो. कधी-कधी आपला काम करण्याचा मूड नसतो, कधी डोकं दुखत असतं तर कधी कसलं तरी टेन्शन असतं. हे सगळं आपण काम करतो त्या ठिकाणच्या माणसांनी समजून घ्यावं अशी आपली अपेक्षा असते. पण, मग आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना आपण का समजून घेत नाही? या लॉकडाउनमध्ये माझ्या मनात घरकाम करणाऱ्या मावशींविषयीचा आदर कैक पटीनं वाढला आहे. हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यावर सर्वात पहिली गोष्ट घडली असेल तर ती म्हणजे घरकाम करणाऱ्या मावशी कामावर रुजू झाल्या. यामुळे आपल्याला किती हायसं वाटलं. लॉकडाउनमध्ये आमच्या मावशी दर पाच दिवसांनी मला फोन करायच्या आणि विचारायच्या 'घरातले सगळे बरे आहेत ना?' या आपुलकीनं विचारण्यानं माझ्या मनात कायमचं घर केलं. आपण त्यांना पगार देतो त्याची त्यांना जेवढी किंमत आहे, त्यापेक्षा खूप जास्त त्यांची आपल्याला गरज आहे हे लक्षात आलं. त्यामुळे आता त्या माझ्या घरातलं काम करुन निघाल्या की मी त्यांना दररोज थँक यू म्हणते. अगदी मनापासून त्यांचे आभार मानते. या लॉकडाउनमध्ये मला त्यांचं महत्त्व कळलं आहे आणि हे मी सगळं सुरळीत सुरु झाल्यावरही विसरणार नाही. घरकाम करणाऱ्या सगळ्याच मावश्यांना थँक यू म्हणते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3aPSoMI