Full Width(True/False)

नववर्ष...नवा उत्साह! कलाकार मंडळींचे खास संकल्प

लग्नाची उत्सुकता नवं वर्ष माझ्यासाठी खास आहे. कारण या वर्षात मी लग्न करणार आहे. त्यामुळे घरात उत्साहाचं वातावरण आहे. २०२१ येताना आशेचा किरण घेऊन येईल असं वाटतंय. एका रात्रीत अनन्यसाधारण बदल होणार नाहीयेत, हे आपल्यालाही ठाऊक आहे. पण तरीही हळूहळू सगळ्या गोष्टी सुरळीत होतील याबाबत विश्वास आहे. - सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री पॅराग्लायडिंगचं प्रशिक्षण २०२० या वर्षानं खूप काही शिकवलंय. घरात निवांत बसल्यावरही आपल्याला आतून शांत राहणं जमायला हवं. हीच मनाची शांतता आपल्या कामाच्या ठिकाणीही आणायला हवी. या दोन्ही गोष्टींचा समतोल साधण्याचा या वर्षी माझा प्रयत्न आहे. या वर्षात पॅराग्लायडिंग ही गोष्ट मला नव्यानं गवसली आहे. नवीन वर्षी पॅराग्लायडिंगचं अॅडव्हान्स प्रशिक्षण घेण्याचा माझा मानस आहे. - अमेय वाघ, अभिनेता नवं काम करण्यासाठी सज्जआपण कोणतीही गोष्ट गृहीत धरता कामा नये, हे या वर्षात पुरतं कळून चुकलंय. नवीन वर्षात मी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणार आहे. नव्या वर्षात सगळं छान होईल, अशी आशा आहे. २०२१ मध्ये खूप काम करण्यासाठी मनाची तयारी केली आहे. त्याचबरोबर आधी पूर्ण केलेलं कामही या वर्षात लोकांसमोर यावं, अशी अपेक्षा आहे. - वैदेही परशुरामी, अभिनेत्री सकारात्मक दृष्टिकोन हवाआपण आपल्या जवळच्या माणसांची काळजी घ्यायला लागलो आहोत. अशीच काळजी यापुढेही घेत राहू या. काळाच्या ओघात अनेक चांगल्या सवयी आपण विसरलो होतो. या कठीण काळानं लावलेल्या स्वच्छतेच्या सवयी अशाच कायम सुरू ठेवू या. नव्या वर्षात आपल्या विचारांची सकारात्मकता खूप महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सगळे नियम पाळून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नव्या वर्षाचं छान स्वागत करायला हवं. - सागर कारंडे, अभिनेता मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचंनव्या वर्षात मी नवं काम करून रिफ्रेश होणार आहे. भरपूर काम करण्यासाठी फिटनेस राखणं खूप महत्त्वाचं आहे. नियमित व्यायाम करण्याकडे वर्षाच्या सुरुवातीपासून विशेष लक्ष देणार आहे. मानसिक स्वास्थ्यासाठीही आवर्जून वेळ काढणार आहे. मानसिक स्वास्थ्यासाठीचे व्यायाम, टेक्निक्स शिकून घेतल्या आहेत. त्यांचा योग्यरित्या वापर करणार आहे. -अनिता दाते, अभिनेत्री शब्दांकन - गौरी आंबेडकर, एसएनडीटी विद्यापीठ


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3b0323E