Full Width(True/False)

वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्या कथांची ओटीटीला भुरळ; 'या' सीरिज चर्चेत

मुंबई टाइम्स टीम आरोग्य जपणं किती महत्त्वाचं आहे हे करानोकाळात कळलं. छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे आरोग्यावर किती गंभीर परिणाम होतात, हे अधोरेखित झालं. या कठीण काळातून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस आणि वैद्यकीय विभागानं शर्थीचे प्रयत्न केले. हेच चित्र अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये पाहायला मिळालं. आता वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्या कथांची भुरळ ओटीटी (ओव्हर द टॉप) माध्यमालाही पडली आहे. डॉक्टर, नर्सेस किंवा वैद्यकीय विभागावर आधारित सीरिजचं पेव फुटलं आहे. यातील काही गंभीर बाजूंवर भाष्य करणाऱ्या आहेत तर काही सीरिजच्या कथांना हलकाफुलका टच आणि विनोदाचा तडका देण्यात आला आहे. 'मेडिकली युअर्स' या सीरिजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणांची व्यथा सांगण्यात आली आहे. एमबीबीएसची पदवी घेता-घेता कठीण प्रसंगांना समोरं जावं लागणाऱ्या तरुणांचं आयुष्य हलक्याफुलक्या पद्धतीनं सांगण्यात आलं आहे. दुर्गम भागातल्या लोकांना वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी एका डॉक्टरनं सरकारविरुद्ध पुकारलेला लढा 'लाखों में एक-२' मध्ये दाखवण्यात आला आहे. तर थ्रिलरचा जबरदस्त तडका असलेली 'कर्क रोग' ही सीरिज भाव खाऊन गेली. 'ऑपरेशन एमबीबीएस' या सीरिजमध्ये तीन विद्यार्थ्यांची कथा मांडण्यात आली आहे. याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. 'इट हॅपन्ड इन कोलकात्ता'ची कथा स्वातंत्र्यपूर्व काळात घडते. ही प्रेमकथा असून यात नायक आणि नायिकांचा वैद्यकीय शिक्षण ते डॉक्टर होण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. करोनाची पार्श्वभूमी असलेली 'द गॉन गेम' सीरिजची कथा प्रेक्षकांना भावली. एका डॉक्टरच्या आयुष्याची विनोदी बाजू दाखवणारी 'स्टार्टिंग ट्रबल्स' ही सीरिज प्रदर्शित झाली आहे. यात अभिनेत्री रेणुका शहाणे महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. मुंबईवर झालेला २६/११ चा दहशतवादी हल्ला कुणीही विसरु शकत नाही. तेव्हा पोलिस यंत्रणेनं नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिवाची पर्वा केली नव्हती. हा हल्ला झाला तेव्हा जखमी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस आणि हॉस्पिटमधील कर्मचाऱ्यांनीसुद्धा शर्थीचे प्रयत्न केले. याच पार्श्वभूमीवर आधारित 'मुंबई डायरीज २६/११' ही सीरिज येणार आहे. यात कोंकणा सेन-शर्मा, मोहित रैना, टीना देसाई आणि श्रेया धन्वंतरी मुख्य भूमिकेत दिसतील. कोणत्याही आजारावरचं औषध बाजारात आणण्यापूर्वी त्याची चाचणी केली जाते. ती चाचणी जिवंत माणसावरही केली जाते. हीच पार्श्वभूमी असलेली 'ह्युमन' ही सीरिज विपुल शहा दिग्दर्शित करत आहेत. यात अभिनेत्री शेफाली शहा मुख्य भूमिकेत दिसेल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39zPHfW