० '' या वेब सीरिजमध्ये तू साकारलेल्या पात्रात काय वेगळेपण जाणवलं? - मी फारशा विनोदी भूमिका साकारल्या नाहीत. या सीरिजच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीची विनोदी शैली हाताळता येणार होती. तसंच याची संहिता अतिशय रंजक पद्धतीनं लिहिली होती. त्यामुळे नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. ० ओटीटीवर वेगवेगळे विषय हाताळून बघण्याचा प्रयोग करत आहेस, यासाठी प्रेरणा कुठून मिळते?- ओटीटी माध्यमच प्रेरणादायी आहे. या माध्यमाचा उपयोग प्रयोग करुन बघण्यासाठी केला नाही तर सगळं शून्य आहे. यावर आर्थिक बाजूसह कथानकापर्यंत सगळ्यात प्रयोग करुन बघितले जात आहेत. प्रेक्षकांना हवं ते बघण्याची मुभा आहे. कलाकाराला तर फायदेच फायदे आहेत. भन्नाट विषय आणि भिन्न प्रकारच्या व्यक्तिरेखा उभ्या केल्या जात आहेत. ० ओटीटीवर सेन्सॉरशिप असावी की नसावी?- सेन्सॉरशिप अजिबात असू नये. ओटीटी हा इंटरनेटचा छोटासा भाग आहे. इंटरनेटच्या इतर भागांवर सेन्सॉरशिप नसेल तर ओटीटीसारख्या छोट्याशा भागाला सेन्सॉरशिप लावून काय मिळणार आहे. स्वयंनियमावलीचा पर्याय उत्तम होता. तसंच पडद्यावर दाखवली जाणारी पात्र काल्पनिक असतात. त्याचा खऱ्या आयुष्याशी संबंध जोडायची गरज नाही. ० पुन्हा मराठी चित्रपटांमध्ये कधी दिसणार? छोटा पडदा किंवा रंगभूमीचं आकर्षण वाटलं नाही का?- मुळात मला अभिनेता बनायचं नव्हतं. पण १९९५ साली इंग्रजी मालिकेसाठी विचारण्यात आलं तेव्हा ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला. तीसुद्धा वेळ होता आणि प्रयोग करुन बघायचं होतं म्हणून स्वीकारली. पण रंगभूमी किंवा छोट्या पडद्याकडे वळावंसं वाटलं नाही. सध्या दोन मराठी चित्रपटांसाठी विचारण्यात आलंय. पुढे काय होतं ते बघू या. ० तुझ्या मते सोशल मीडिया डीटॉक्स किती महत्त्वाचं आहे? ट्रोलर्सना काय सांगशील?- सोशल मीडिया हे घातक आहे असा मी विचार करत नाही. कारण त्या माध्यमाकडे मी तेवढ्या गांभीर्याने बघत नाही. माझ्या फायद्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतो. माझ्या लेखी ट्रोलर्सना शून्य महत्त्व आहे. ० सध्याच्या काळात कोणत्याही वादाला वेगळं वळणं मिळतं, यावर तुझ्या मते उपाय काय?- दुर्लक्ष करणं हा सर्वात प्रभावी उपाय असतो. जे महत्त्वाचं नाही त्याकडे दुर्लक्ष करायचं. ० फिटनेसच्या दृष्टीनं ध्येय काय आहेत?- निरोगी राहणं हेच ध्येय आहे. ० तुझ्या आईच्या फिटनेसची सर्वत्र चर्चा असते. त्याबद्दल काही सांग.- माझी आई कमाल आहे. प्रत्येकीला वाटत असतं की, आपण व्यायाम केला पाहिजे. पण ते कृतीत उतरत नाही. व्यायाम केलाच पाहिजे. नोकरी केली किंवा मूल जन्माला घातलं की झालं अशी काही महिलांची समजूत असते. पण त्यापुढेही स्वत:चं आयुष्य असतं. ते मनमुराद जगलं पाहिजे. असा विचार माझी आई करते. ० तुझ्या मते बॉडी पॉझिटीव्हीटी म्हणजे काय?- स्वत:ची काळजी घेणं. अनेक जण बॉडी पॉझिटीव्हीटीचा अर्थ शरीराचा बांधा आणि वजनाशी जोडतात. पण माझ्या मते त्याचा अर्थ स्वत:च्या शरीराचा आदर करणं असा आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36DNIX6