Full Width(True/False)

सायनाची चॅम्पियन होण्याची ‘सरळ’ गोष्ट

सायनाच्या हाती असलेल्या बॅडमिंटनच्या रॅकेटला लेखक-दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी ‘तलवारी’ची उपमा दिली आहे; पण लोखंडाच्या पातीचा धारदार तलवार होण्याचा प्रवास खडतर असतो. त्या लोखंडाला भट्टीत तापवलं जातं. वारंवार घणाचे घाव त्यावर होतात. पात्याला योग्य आकार दिला जातो. लवचिक बनवलं जातं आणि शेवटी त्या लोखंडाच्या तुकड्याला धार काढली जाते. हा असाच काहीसा तलवारीचा प्रवास भारतीय बॅडमिंटनपटू नेहवाल या युवा खेळाडूचा आहे. एका सर्वसामान्य मुलीचा चँपियन होण्याचा सरळ-साधा प्रवास दिग्दर्शकानं पडद्यावर मांडला आहे. गुप्ते यांनी चित्रपटाच्या कथानकात फार अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेतलेलं नाही. अतिरिक्त मीठ-मसाला टाकलेला नसल्यानं चित्रपट काहीसा संथ किंवा उत्कंठावर्धक नसला; तरी सायनाची चॅम्पियन होण्याची ‘सरळ’ गोष्ट चित्रपट हळूवार फुलवून सांगतो. बायोपिकमध्ये लेखक-दिग्दर्शक अनेकदा व्यक्तिरेखांच्या मोहात पडतो. आपल्याकडे काही निवडक बायोपिक्स वगळल्यास बहुतांश बायोपिकमध्ये ज्याच्यावर कथानक बेतलंय त्या व्यक्तीकडे एक सर्वसामान्य माणूस म्हणून पाहिलं जात नाही; तर त्याला देवत्व बहाल केलं जातं. त्या व्यक्तिरेखेला माणूस म्हणून सादर केलं जात नाही. गुप्ते यांनी या सगळ्याला बगल देत खरी खुरी सायना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सायना अगदी तुमच्या आमच्यासारखीच आहे. बॅडमिंटन हाती घेणाऱ्या प्रत्येक नवोदित सर्वसामान्य खेळाडूत सायनाचं प्रतिबिंब असल्याचं दिग्दर्शक सांगू पाहतो. सायना ही हरियाणात राहणाऱ्या उषा आणि हरवीर सिंह नेहवाल यांची मुलगी आहे. हरियाणातून हैदराबादमध्ये स्थायिक झालेल्या या जोडप्याच्या मुलीनं अर्थात सायनानं २०१५ मध्ये इतिहास रचला. जगभरात नंबर १ रँकिंग मिळविणारी ती पहिली महिला बॅडमिंटनपटू ठरली. हेच लक्ष्य सायनानं कशाप्रकारे साध्य केलं याची गोष्ट चित्रपटात दाखवण्यात आली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीचा अर्धा तास सायनाच्या आईवर (मेघना मलिक) केंद्रित आहे. आशावादी असलेली सायनाची आई आपली स्वप्नं मुलगी पूर्ण करेल; असा तिला विश्वास आहे. सायनालाही बॅडमिंटनशिवाय दुसरं काही दिसत नसतं. जिंकण्याची जिद्द आणि लढण्याची आशा सायनाची आईच तिला देते. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासून चँपियन होण्याचा सिलसिला सुरू होतो; तो पुढे सुरूच राहतो. बाकी, यश-अपयश कुणाला चुकलं नाही. तसं अपयश सायनाच्या वाट्यालाही आलं. पहिल्याच परदेशी सामन्याला जाण्यापूर्वी तिच्या आईचा अपघात होतो. खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मित्र आणि प्रेमापासून दूर जाणं; असे अनेक चढ-उतार तिच्या आयुष्यात आले. ती अनेक सामने हरली. खेळताना तिच्या पायाला अपघातदेखील झाला. सक्तीच्या विश्रांतीवर जावं लागलं; पण तिनं जिद्दीनं कमबॅक केला. ही प्रेरणादायी गोष्ट ‘सायना’ चित्रपटात सामावलेली आहे. अभिनेत्री मेघना मलिका यांनी सायनाच्या आईची भूमिका लीलया साकारली आहे. कोचच्या भूमिकेत असलेल्या मानव कौलनं अत्यंत संयमी काम केलं आहे. सायनाच्या अवतीभवती असलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखा सहज आणि पारदर्शी आहेत. चित्रपटाचा केंद्रबिंदू असलेल्या परिणिती चोप्रानं सायना या व्यक्तीरेखेत स्वतःला चपखल बसवण्याचा प्रयत्न केला आहे. चालताना सायनाची एक हात हलवण्याची सवय परिणितीनं हुबेहूब आत्मसात केल्याचं निदर्शनास येतं. सायनाची देहबोली उभी करणं तिला बऱ्यापैकी जमलं आहे. अभिनयाच्या पातळीवर परिणितीनं सचोटीनं प्रयत्न केल्याचं पडद्यावर दिसतं; पण ‘सायना’ हे व्यक्तिमत्त्व पडद्यावर उभं असल्याची खात्री मात्र पटत नाही. काही तरी राहिल्याची भावना मनात येते. बाकी तांत्रिक आणि सांगीतिकदृष्ट्या चित्रपट उजवा आहे. पाहा ट्रेलर: सायना निर्मिती ः भूषणकुमार, कृष्णाकुमार लेखक-दिग्दर्शक ः अमोल गुप्ते कलाकार ः , मानव कौल, ईशान नाकवी, मेघना मलिक, शुभ्राज्योती भारत संगीत ः अमाल मलिक छायांकन ः पियुष शहा संकलन ः दीपा भाटिया दर्जा ः तीन स्टार


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rv5DqH