Full Width(True/False)

रंगांचे फुगे नको रे बाबा! श्रद्धा कपूरचा हा क्युट व्हिडिओ होतोय व्हायरल

मुंबई- रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. या दिवशी एकमेकांना रंग लावून धुळवड साजरी करण्याचा आनंद काही औरच असतो. सगळेच या सणाचा आनंद घेताना दिसतात. लहान मुलं तर अगदी दोन तीन दिवस अगोदरपासूनच रंगपंचमीची मजा घेताना दिसतात. एकमेकांवर रंग आणि पाण्याचे फुगे उडवताना दिसतात. अशात आपला लाडका कलाकार आपल्या समोरून जात असेल तर त्याला रंग लावण्याचा मोह छोट्या मुलांपासून तरुणांपासून सगळ्यांनाच होतो. बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत देखील असंच काहीस घडलं. श्रद्धाला रंग लावायला आलेल्या मुलांना श्रद्धा हात जोडून विनंती करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. श्रद्धाने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावलं आहे. ती बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकतीच ती एका बोटीतून परत येतानाचा व्हिडीओ कॅमेरामध्ये कैद झाला आहे ज्यात काही मुलं श्रद्धावर पाण्याने भरलेले फुगे मारण्यासाठी एकच गोंधळ करतात. त्यात कॅमेरामन देखील मुलांना तसं करण्यापासुन रोखतोय तर श्रद्धादेखील हात जोडत त्यांना विनंती करतेय. जेव्हा श्रद्धा बोटीतून बाहेर पडते तेव्हा तिला पाहून मुलांना प्रचंड आनंद होतो आणि तिच्यावर पाण्याचे फुगे मारण्यासाठी ओरडू लागतात. तेव्हा श्रद्धा त्यांना अत्यंत सुंदर पद्धतीने होळीच्या शुभेच्छा देते आणि जोरात ओरडत 'नाही', असं म्हणत फुगे मारू नका म्हणून सांगते. श्रद्धाने दिलेला हा प्रेमळ नकार पाहून ती मुलंही माघार घेतात. ते श्रद्धाला फुगे मारत नाही आणि श्रद्धा तिथून हसत निघून जाते. श्रद्धाचं तिथलं वागणं चाहत्यांना प्रचंड पसंत पडलं असून तिची प्रतिक्रिया त्यांना क्युट वाटली आहे. चाहते तिच्या वागण्याचं कौतुक करत आहेत. श्रद्धा सध्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असून यापूर्वी ती 'बागी ३' मध्ये दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3u1DoBy