मुंबई- 'बिग बॉस १४' मधून बाहेर पडल्यापासून राखी सावंत सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. ती कधी आपलं मत मोकळेपणाने मांडताना दिसते. तर कधी इतरांवर ओरडतानादेखील दिसते. राखीचा हाच बिनधास्त स्वभाव तिच्या चर्चेत राहण्याचं मुख्य कारण आहे. काही काळापूर्वी राखी मास्क न घालणाऱ्या पत्रकाराला ओरडताना दिसली होती. आता तर तिने थेट बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत हिच्यासोबत पंगा घेतला आहे. राखीने कंगनाला तिच्या संपत्तीची आठवण करून देत करोनाकाळात गरजूंची मदत करण्याचा सल्ला दिला आहे. राखीचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. यात राखीने दोन मास्क लावले आहेत आणि दोन्ही हातात सॅनिटायझरच्या बाटल्या आहेत. गाडीतून खाली उतरताच ती हवेत सॅनिटायझर फवारते आणि म्हणते, 'तुम्ही सगळे स्वतःची काळजी घ्या. तुम्हीदेखील करोनाला स्वतः जवळ फिरकू देऊ नका. करोना आता लहान आहे, त्याला मोठं होऊ द्यायचं नाहीये.' यासोबतच ती सगळ्यांना कुटुंबीयांची काळजी घेण्याची विनंती करते. त्यानंतर कंगनाच्या व्हिडिओबद्दल प्रश्न विचारल्यावर ती म्हणते, 'ऑक्सिजनची कमतरता आहे तर तुम्ही पुढे येऊन मदत करा ना. लोकांना ऑक्सिजनचा पुरवठा करा. तुमच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. ती देशसेवेसाठी वापरा. आम्ही तर तेच करतोय.' असं म्हणत राखी कंगनाला सल्ला देऊन तिथून निघून जाते. कंगनाने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात ती देशातील गंभीर परिस्थितीवर चिंता व्यक्त करत होती. परंतु, कंगनाने तिच्यातर्फे कोणतीही मदत जाहीर केली नाही. तर दुसरीकडे सोनू सूद, अजय देवगन, सुनील शेट्टी यांसारखे कलाकार गरजूंच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. काहींनी रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध करून दिले आहेत तर काहींनी ऑक्सिजन सिलेण्डरचा पुरवठा केला आहे. अनेक बॉलिवूड कलाकार त्यांच्यापरिने शक्य ती मदत करताना दिसत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2S8FjXn