Full Width(True/False)

इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचा आनंद: दीपिका चिखलिया

मुंबई : महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा करोनाचा फैलाव होत आहे. या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या काळात घरात अडकून बसलेल्या लोकांचे मनोरंजन व्हावे, या उद्देशाने टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा रामायण मालिकेचे प्रसारण केले जाणार आहे. रामानंद सागर यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेत सीता ची भूमिका साकारणारी दीपिका चिखलियाने सोशल मीडियावर या निर्णयाचे स्वागत केले असून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दीपिकाने ही पोस्ट शेअर करताना सीता च्या भूमिकेतील एक फोटोही पोस्ट केला आहे. दीपिका लिहिते, ' हे तुम्हा सर्वांना सांगताना मला खूप आनंद होत आहे की रामायण ही मालिका पुन्हा एकदा टेलिव्हिजवरून केली जाणार आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळातच ही मालिका प्रसारित केली होती. आता असे वाटते आहे की इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचा आनंद आहे. ही मालिका केवळ माझ्यासाठी नाही तर हजारो भारतीय कुटुंबाच्या आयुष्याचा भाग झाला होता. आता या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा आपण सारेजण एका कुटुंबाचा भाग होणार आहोत. येणा-या पिढीसोबत रामायणाद्वारे सांगितलेले आयुष्याचे सार आपण वेचू या... स्टार भारत या वाहिनीवर रोज संध्याकाळी साडेसात वाजता रामानंद सागर यांचे रामायण तुम्हाल बघता येणार आहे...' दीपिकाने ही पोस्ट केल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. त्यातील एका प्रेक्षकाने लिहिले की, ' पुन्हा सुरू होते आहे, हे ऐकून किती आनंद झाला आहे, हे मी सांगू शकत नाही. पुन्हा एकदा ही सर्वश्रेष्ठ कथा पाहता येणार आहे...', अन्य एका प्रेक्षकाने लिहिले, 'हे महाकाव्य पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आणि आनंदी आहोत. हा कार्यक्रम खरा वाटतो.. सर्व कलाकारांनी भूमिका साकारताना त्यात सर्वस्व ओतले आहे... तुम्ही सर्वजण थोर कलाकार आहात..' गेल्यावर्षी लॉकडाऊन लागल्यानंतर रामायण ही मालिका दूरदर्शनवरून प्रसारित झाली होती. तेव्हा छोट्या पडद्यावरील टीआरपीचे सर्व विक्रम या मालिकेने तोडले होते. प्रेक्षकांनी मागणी केल्यामुळे पुन्हा ही मालिका स्टार भारत वाहिनीवरून संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित केली जात आहे. या मालिकेत रामाची भूमिका अरुण गोविल यांनी साकारली होती. तर लक्ष्मणाची भूमिका सुनील लहरी आणि सीताची भूमिका दीपिका चिखलिया यांनी साकारली होती. रामायण आणि महाभारत या मालिका नव्वदच्या दशकामध्ये दूरदर्शनवरून पहिल्यांदा प्रसारित झाल्या होत्या. आज इतक्या वर्षांनंतरही या मालिकांबद्दल लोकांना वाटणारे आकर्षण आणि प्रेम कायम आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QvUjOp