मुंबई: ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील मोमो अर्थात अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत आहे. तिच्या अभिनयाचंही कौतुक केलं आहे. या भूमिकेमुळं आज ती घराघरांत पोहोचली आहे. मराठी सिनेसृष्टीत येण्यापूर्वी ती योग प्रशिक्षक म्हणून काम करायची. सिनेसृष्टीत आल्यानंतर तिला कास्टिंग काऊचलाही सामोरं जावं लागल्याचं तिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल मीरा म्हणते, ‘मला दोनदा असा अनुभव आला. तू नवी आहेस, तुला कुणी ओळखत नाही, त्यामुळे तुला हे करावं लागेल असं मला सांगण्यात आलं. मी नाकारलं. मेहनतीवरच संधी मिळावी असं वाटतं. काम मिळवण्यासाठीचे शॉर्टकट मला मान्य नाहीत. थोड्या दिवसाचं फेम, एखादी सीरीज किंवा चित्रपट मिळवून फार काही साध्य होत नाही. एकाच माणसाकडून मला दोनदा असा अनुभव आला. एकदा मला भूमिका देऊ करण्याचा बहाणा करून त्यानं हात पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी त्याच्या सरळ कानशिलात लगावली आणि निघून आले. त्यानंतर दोन वर्षं मी काही काम केलं नाही. अशा प्रकारांमुळे कलाकार तणावात जावू शकतात. तुम्ही ठरवलं तर या सगळ्यापासून दूर राहू शकता. आता ओळखीतून आलेल्या कामालाच प्राधान्य देते.’ भूमिकेत हरवली... तू ‘मोमो’ या भूमिकेत हरवून जातेस, असं तुझ्या सहकलाकारांकडून कळतं असं विचारताच मीरा म्हणते, ‘हे खरं आहे. सहकलाकारांशी बोलताना अगदी माझ्या पालकांशी बोलतानाही मी मोमो बोलते तसेच उच्चार करते तसं बोलायची सवयच झाली आहे. घरी गेल्यावरही तसं बोलले, की भूमिकेतून बाहेर ये गं, असं सगळे सांगतात. ही भूमिका चाहत्यांना आवडतेय हे कळलं, की भूमिका साकारायला आणखी मजा येते. ऑडिशन दिलं तेव्हा अमेरिका रिटर्न मुलगी एवढीच तिची ओळख होती. हळूहळू ती भूमिका फुलत गेली. मी तिच्याएवढा मेकअप कधीच करत नाही आणि तशी अजिबातच नाही, त्यामुळे ही भूमिका साकारणं हे आव्हान होतं.’
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Tasa0P