मुंबई: भारतीय टेलिव्हिजनच्या सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय कॉमेडियनबद्दल बोलायचं झालं तर त्यात भारती सिंगचं नाव नक्कीच घेतलं जाईल. भारतीचे आता देशभरात अनेक चाहते आहेत. मोठ- मोठ्या शोमध्ये तिनं कॉमेडियन म्हणून काम केलं आहे. पण हे सर्व भारतीला सहज मिळालेलं नाही. त्यासाठी तिला बराच संघर्ष करावा लागला आहे. गरीब घरातून आलेल्या भारतीनं स्वतःच्या कष्टावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण नुकत्याच एका कार्यक्रमात भारतीनं संघर्षाच्या काळात तिच्यासोबत घडलेल्या वाईट प्रसंगांबद्दल सांगितलं. अँकर मनिष पॉलच्या शोमध्ये भारती सिंगनं याबाबत भाष्य केलं. ती म्हणाली, 'अनेकदा इव्हेंटमध्ये कॉर्डिनेटर गैरवर्तन करत असत. ते लोक मला मागून चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करून जात असत. मला माहीत होतं की, हे चुकीचं आहे पण मी विचार करत असे की, हे तर माझ्या काकांसारखे आहेत माझ्याशी काही चुकीचं वागणार नाहीत. पण मी चुकीची होते आणि ते सर्व बरोबर होते. आता मला समजतं आहे की, ते सर्वच किती चुकीचं होतं.' भारती पुढे म्हणाली, 'मला वाटायचं हे सर्व ठीक नाहीये पण त्यावेळी मला तेवढी समज नव्हती. आता मी या सर्व गोष्टींना विरोध करू शकते. आता मी बिनधास्त बोलू शकते, 'काय चाललंय? काय पाहताय? बाहेर जा मला कपडे बदलायचे आहेत.' आज मी हे सर्व बोलू शकते. पण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. कोणाला विरोध करण्याची हिंमत माझ्यात नव्हती.' चॅट शोमध्ये भारतीनं तिच्या बालपणीच्या संघर्षाबद्दलही सांगितलं. ती म्हणाली, 'मला आठवतं दुकानदार आमच्या घरी येऊन उधारी मागत असत. ते माझ्या आईचा हात पकडत असत. तेव्हा मला माहीत नव्हतं की ते माझ्या आईसोबत गैरवर्तन करत आहेत. एवढंच नाही तर एकानं एकदा आईच्या खांद्यावर हात ठेवला होता. तेव्हा आई त्याला म्हणाली होती. तुला लाज वाटत नाही क? माझी मुलं आहेत, माझ्या पतीचं निधन झालंय आणि तू माझ्याशी असं वागतोयस.' भारतीच्या आईसोबत जेव्हा हे सर्व घडलं होतं. त्यावेळी त्या केवळ २४ वर्षांच्या होत्या. दरम्यान टीव्ही रिअलिटी शो लाफ्टर चॅलेंजमधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या भारती सिंगनं आतापर्यंत 'द कपिल शर्मा शो' आणि इतर अनेक शोमध्ये काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. २०१७ साली भारती सिंगनं स्क्रीनप्ले रायटर आणि टीव्ही प्रोड्यूसर हर्ष लिंबाचियाशी लग्न केलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ii4O1P