Full Width(True/False)

सतत खलनायकाच्या भूमिका करताना नेमकं काय वाटतं..? कलाकारांनी सांगितली मन की बात...

-स्वाती भट सतत नकारात्मक भूमिका स्वीकारत असताना या कलाकारांची त्याविषयीची भूमिका काय, टाइपकास्ट होण्याची भीती वाटते का, याविषयी जाणून घेऊया या कलाकारांकडून... नकारात्मक भूमिकेत वाव जास्तयापूर्वी मी सकारात्मक भूमिका केल्या आहेत आणि यापुढेही त्या करायला नक्कीच आवडतील. परंतु मालिकांसंदर्भात सांगायचे तर साधारणपणे त्यातल्या मुख्य भूमिका या माझ्यापेक्षा कमी वयाच्या कलाकारांसाठी लिहिलेल्या असतात. त्यामुळे त्या मर्यादा येतात. मग मुख्य भूमिकेनंतर सगळ्यात महत्वाचे असलेले ‘ग्रे शेड’चे पात्र का स्वीकारू नये? प्रेक्षकांना बघताना जरी दोन्ही खलनायिका असल्या तरी माझ्यासाठी या दोन वेगळ्या स्तरांतल्या भूमिका आहेत. नीलिमा ही तशी साधी, घरातल्या घरात काहीतरी छोट्या-छोट्या युक्त्यांनी भांडण लावणारी तर याउलट सिम्मी ही पक्की बिझनेसवूमन आणि स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करू शकणारी दाखवली आहे. त्यांची कट-कारस्थान करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे भूमिका करताना त्या दोन भिन्न सामाजिक, आर्थिक स्तरांतील बायका मला साकारायच्या होत्या. एकाचवेळी दोन खलनायिका करणे हे माझ्यासाठीसुद्धा चॅलेंज होते. कारण मीच एकटी या दोन भूमिका करत असले आणि एकच चेहरा, आवाज दिसला तरी प्रेक्षकांना त्यात वेगळेपण वाटायला हवे. नायिकेची व्यक्तिरेखा कायमच गोड, छान अशी लिहिलेली असते. परंतु खलनायिकेची भूमिका साकारताना त्या नकारात्मक वागण्यात राग, किळस, चीड, सूड अशा अनेक विविध भावनांचे मिश्रण असते. त्यामुळे कलाकारांनाही अभिनयात खूप वाव असतो. - शीतल आई कुठे काय करते, माझी तुझी रेशीमगाठ खलनायिकेचा शिक्का बसेल, असे वाटत नाहीमाझ्या आतापर्यंत पाच भूमिका या खलनायिका पात्राकडे झुकणाऱ्या होत्या; परंतु त्यामध्ये खूप विविधता होती. कुठे पार्टनरविषयी ‘पझेसिव्ह’ असल्याने भूमिकेला आलेले नकारात्मक वळण असेल तर कुठे राग, प्रतिशोधाची भावना यामुळे रंगवलेली ‘ग्रे शेड’ होती. खलनायिकेची भूमिका असली तरी मला कलाकार म्हणून त्यात अनेक वैविध्य आणता आलं. माझ्या भूमिकेमुळे मालिकेत रोचक वळणे येतात, हे मला महत्त्वाचं वाटतं. खरं तर, प्रेक्षकांनाही मला आता सकारात्मक भूमिकेत बघायचे आहे. जेव्हा प्रेक्षक भेटतात तेव्हा त्यांच्या प्रतिक्रियेमधून मला हे जाणवते. मी अजून पूर्णपणे चांगली व्यक्तिरेखा असलेली भूमिका केलेली नाही तरी ‘घाडगे अँड सून’मध्ये कियारा किंवा मुलगी झाली हो, अग्निहोत्र इत्यादी मध्ये काही प्रसंगांमध्ये छोट्या कालावधीसाठी साकारलेली हळवी बाजू, सकारात्मक बाजू प्रेक्षकांना भावली आहे. थोड्या वेळात ही छटासुद्धा प्रेक्षकांना लक्षात राहिली आहे, त्यामुळे माझ्यावर केवळ खलनायिकेचा शिक्का बसेल, असं वाटत नाही. -प्रतीक्षा मुणगेकरघाडगे अँड सून, मुलगी झाली हो, जीव माझा गुंतला प्रेक्षकांना हवाहवासा खलनायकएका व्यावसायिक कलाकारासाठी काम करत राहणे हे आवश्यक आहे. त्यामुळे कथानकात निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यात दम असायला हवा. कोणतीही भूमिका करताना मुळात तिचे त्या कथानकात किती महत्त्व आहे, यावर मी भूमिका स्वीकारायची किंवा नाही हे ठरवतो. ते महत्त्व मला आतापर्यंत केलेल्या खलनायकाच्या भूमिकांमध्ये दिसले. मी सकारात्मक भूमिकासुद्धा केल्या आहेत; परंतु प्रेक्षकांमध्ये माझ्या निगेटिव्ह भूमिका जास्त पोहोचल्या आणि गाजल्या. ‘बाजीगर’मधल्या शाहरुखसारखी ‘चेहरा चॉकलेट बॉय’ आणि भूमिका निगेटिव्ह अशी माझी ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांमध्येसुद्धा मला ‘क्युट खलनायक, भारी खलनायक’ असंच म्हटलं जातं. ‘काहे दिया परदेस’नंतर मी मालिकांमधून ब्रेक घेतला होता आणि इतर माध्यमांत वेगवेगळ्या भूमिका करत होतोच. त्यानंतर आता ‘येऊ कशी...’मध्ये मोहितची भूमिका करत आहे. त्यामुळे केवळ ग्रे शेडमधेच भूमिका मिळत राहतील असे नाही. उलट मी प्रेक्षकांना हवाहवासा खलनायक आहे, असं मला वाटतं. मोहित साकारतानासुद्धा जरी खलनायक म्हणून पात्र असले तरी त्याचे मालिकेतील पात्रांशी वागणे वेगवेगळे आहे. कुठे तो एकदम प्रामाणिक, साधाभोळा असण्याचा आव आणतो तर कुठे धूर्तपणे वागतो. त्यामुळे खलनायक असलो तरी ही भूमिका रंगबदलू सरड्याप्रमाणे बदलते. -निखिल राऊततू तिथे मी, काहे दिया परदेस, येऊ कशी तशी मी नांदायला प्रेक्षकांपेक्षा टीव्ही वाहिनीचे मत महत्त्वाचंमी जवळपास साडेचार वर्षं ‘तू माझा सांगाती’मध्ये विठ्ठलाची भूमिका करत होतो. त्यानंतर मला काही ग्रे शेड भूमिका मिळाल्या आहेत. म्हणजेच इथे एकच प्रकारच्या भूमिकाच मिळत राहतील, असे नाही. कलाकार त्यांचं कौशल्य कसे सादर करत राहतो, यावर खूप काही अवलंबून आहे. ‘मोलकरीण बाई’मधले पात्र प्रेक्षकांना आवडले. त्यामुळे निगेटिव्ह भूमिकाच जास्त चांगल्या करू शकतो, असा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन झाला. त्यामुळे टीव्ही वाहिन्यांकडून पुन्हा तशाच व्यक्तिरेखांच्या जास्त विचारणा आल्या. माझ्या मते, प्रेक्षकांपेक्षा वाहिनीचा तुमच्या अभिनयाबद्दलचा दृष्टिकोन काय तयार होतो, यावर मिळणाऱ्या भूमिका ठरत असतात. मध्यंतरी ‘कुसुम’ मालिकेत मी छोट्या कालावधीसाठी पात्र साकारले होते. ते सुरुवातीला पूर्ण सकारात्मक दाखवले होते; परंतु कथानकात नंतर अचानक वळण आणून त्याला ‘ग्रे शेड’ बनवण्यात आले. नकारात्मक भूमिका करत असतानाही मी प्रत्येक ठिकाणी भाषा, देहबोली, कपडे यामध्ये स्वतःहून वैविध्य आणायचा प्रयत्न करत असतो. - अतुल आगलावेमोलकरीण बाई, अबोली


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dVYU4N