Full Width(True/False)

द काश्मिर फाइल्स: क्रौर्याचा दाहक रंग

इतिहासाला वेगवेगळे रंग असतात. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. यातला कोणता रंग योग्य-अयोग्य, कोणता रंग महत्त्वाचा- बिनमहत्त्वाचा, कोणता रंग खरा-खोटा हे इतिहास वाचणाऱ्यानं आणि बघणाऱ्यानं ठरवावं. मी म्हणतो तोच खरा इतिहास आहे असा दावा करणाऱ्यांमध्येही मतभेद असू शकतात, विविध बाजू असू शकतात. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ‘द काश्मिर फाइल्स’ या चित्रपटातून त्यांना दिसलेली काश्मीरच्या इतिहासातील एका काळ्या अध्यायाविषयीची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडलेली आहे. १९९० साली काश्मीरमध्ये घडलेल्या एका क्रूर घटनेची पार्श्वभूमी या चित्रपटात दाखवली आहे. एक्सोडस आणि जेनोसाइड यावरून भिन्न मतं आजही बघायला मिळतात. त्या काळी मोठ्या संख्येने काश्मिरी पंडित त्यांची घरं सोडून निघून गेले (एक्सोडस) असं म्हटलं जातं. पण खरं तर ते निघून गेले नाहीत, त्यांचा क्रूर वंशविच्छेद (जेनोसाइड) करण्यात आला असा दावा हा चित्रपट करतो. सिनेमाची गोष्ट आहे नव्वद सालची. हिंदू-मुस्लिम वाद त्यावेळी चिघळला होता. तेथील मुस्लिमांनी काश्मिरी पंडितांना उद्देशून ‘धर्मांतर करा, सोडून जा नाही तर मरा’ असा नारा लावला. या दहशतीखाली काश्मिरी पंडित राहात होते. त्यांच्या डोक्यावर मृत्युची टांगती तलवार होती. ते जिवंतपणी मरण अनुभवत होते. ‘काश्मिर में हम सब जिंदा रहनेकी कोशिश कर रहें है और यही बहोत हिम्मत की बात है’ हा सिनेमातला संवाद त्या परिस्थितीचं सार सांगतो. कृष्णा पंडितचे (दर्शन कुमार) कुटुंबीय तो लहान असताना याच दहशतीचे बळी ठरलेले असतात. तो याबाबत अनभिज्ञ असतो. तो त्याचे आजोबा पुष्कर (अनुपम खेर) यांच्याकडे लहानाचा मोठा होतो. कालांतरानं पुष्कर यांचं निधन होतं. त्यांचं अस्थीविसर्जन करण्यासाठी तो काश्मीरमध्ये येतो. त्यावेळी कृष्णा पुष्कर यांच्या चार जिवलग मित्रांना (मिथुन चक्रवर्ती, पुनित इसार, प्रकाश बेलावडी, अतुल श्रीवास्तव) भेटतो. त्यांच्याशी बोलण्यातून कृष्णाला त्याच्या कुटुंबियांच्या मृत्युमागचं सत्य कळू लागतं. सिनेमात कुठलंही रहस्य नाही, थेट प्रसंग आहेत, पण ते पाहताना आणि चित्रपटाच्या शेवटी अंगावर काटा आल्याशिवाय राहात नाही. एका तिऱ्हाईत माणसानं आपल्याला आपल्याच घरातून बाहेर काढल्यावर ज्या भावना मनात दाटून येतील तशाच भावना पंडितांना ‘धर्मांतर करा, सोडून जा नाही तर मरा’ असं सांगितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतात. चित्रपटातील छोट्या आणि साध्या संवादांमधूनही विषयाची दाहकता पोहोचते. ‘बिकने को तयार हो तो बाजार हमेशा खुला होता है’, ‘काश्मिरीओंने उनकी कहानी बताई क्यु नहीं? – किसीने सुनाभी तो नहीं’, ‘सपने पुरे नहीं होते.. उनके पिछे भागना पडता है’ हे संवाद खूप साधे वाटतील पण त्यातला खोल अर्थ प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. सिनेमात काय, किती आणि कसं मांडायचंय हे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना अचूक माहीत होतं आणि त्यांनी तसंच चोख दिग्दर्शन केलंय. इतिहासातल्या गंभीर विषयाची मांडणी करताना अनेकदा त्यातले विविध पैलू मांडले जातात आणि त्यामुळे मूळ विषय कधी-कधी भरकटतो. पण अग्निहोत्री यांनी एका कुटुंबाला समोर ठेवत त्यांची गोष्ट सांगत विषयाची मांडणी केल्यामुळे त्याची दाहकता आपल्यापर्यंत पोहोचते. सिनेमा भूतकाळ-वर्तमानकाळ-भूतकाळ असा फिरत राहतो. पण प्रेक्षक म्हणून आपल्याला कुठेही गोंधळायला होत नाही. शंख राजाध्यक्ष यांच्या संकलनामुळे हे साध्य झालं आहे. सिनेमात ‘स्टार’ नसले तरी अनुभवी कलाकारांची मोठी फळी आहे. त्यामुळे चित्रपटातील अभिनयाची बाजू उजवी ठरते. अनुपम खेर यांनी स्वत:चं घर परत मिळवण्यासाठी, स्वत:च्या हक्कांसाठी लढणाऱ्या वयस्कर पुरुषाची भूमिका चोख निभावली आहे. मिथुन चक्रवर्ती, पुनित इसार, प्रकाश बेलावडी, अतुल श्रीवास्तव, मृणाल कुलकर्णी, पल्लवी जोशी यांच्या कामात त्यांच्या इतक्या वर्षांचा अनुभव दिसतो. विशेष कौतुक करावं लागेल ते चिन्मय मांडलेकरचं. त्यानं साकारलेल्या फारुक अहमद दर या व्यक्तिरेखेचा राग येऊ लागतो. यातच त्याचं यश म्हणावं लागेल. दर्शन कुमारला सध्याच्या फळीतील उत्तम कलाकार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राजकारण, समाजकारण, आर्टिकल ३७०, प्रसारमाध्यमं, भारतीय सैन्य दल, पोलिस यंत्रणा, महाविद्यालयीन निवडणूक असे अनेक मुद्दे चित्रपटात वेगवेगळ्या संदर्भांनी समोर येतात. काही वेळा हे मुद्दे एकत्र येत असल्यामुळे काहीसा गोंधळ होतो. ते कदाचित टाळता आलं असतं. सिनेमाची लांबीही कमी करता आली असती. चित्रपटात मांडलेला विषय आणि भूमिका बघितल्यानंतर सत्य-असत्य काय, योग्य-अयोग्य बाजू कोणती या सगळ्याचं आकलन ज्यानं-त्यानं करावं. पण तत्कालीन काश्मिरी पंडितांचं झालेलं शोषण, त्यावेळचं दाहक वास्तव, भीषणता, परिणाम दाखवण्याच्या ज्या हेतूनं दिग्दर्शकानं चित्रपट केला आहे, त्यात तो पूर्ण यशस्वी ठरला आहे. पाहा ट्रेलर: सिनेमा: द काश्मिर फाइल्स निर्माते: तेज नारायण अग्रवाल, अभिषेक अग्रवाल, पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्री दिग्दर्शन: विवेक अग्निहोत्री लेखन: विवेक अग्निहोत्री, सौरभ पांडे कलाकार: मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, प्रकाश बेलावडी, पुनित इसार, अतुल श्रीवास्तव संगीत: स्कोअर-रोहित शर्मा, गाणी-स्वप्निल बांदोडकर छायांकन: उदयसिंग मोहिते संकलन: शंख राजाध्यक्ष दर्जा: साडे तीन स्टार


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/EMQoZkm