शाळेतल्या झेंडावंदनाच्या आठवणी आजही मनात रुंजी घालतात. तेव्हा त्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमांचं अप्रूप, मान्यवरांचं भाषण आणि घरी जाताना मिळणाऱ्या चॉकलेटचं आकर्षण वाटत असे. अशाच झेंडावंदनाच्या आठवणी आज असलेल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त काही कलाकारांनी 'मुंटा'सोबत शेअर केल्या आहेत. बिस्कीट-चॉकलेटसाठी केलं नाटक शाळेत असताना १५ ऑगस्टला बिस्कीट आणि चॉकलेट मिळायचं. ते मिळवण्यासाठी त्या दिवशी मी शाळेत जायचे. स्वातंत्र्य दिनी शाळेत झेंडावंदन झाल्यानंतर मान्यवरांची भाषणं आणि इतर कार्यक्रम असायचे. तसंच १५ ऑगस्टच्या निमित्ताने शाळेत पाहुणे यायचे. त्या पाहुण्यांच्या भाषणानंतर आम्हाला चहा बिस्कीट-चॉकलेट मिळायचं. एके वर्षी एका पाहुण्यांनी भाषण द्यायला सुरुवात केली. पुढे त्यांचं भाषणं तासभर लांबलं. भाषण संपता संपेना. पण, मला चहा-बिस्कीट आणि चॉकलेट खायचं होतं. म्हणून मी चक्कर येऊन पडण्याचं नाटक केलं. जेणेकरून, मला शाळेतील शिक्षक बिस्कीट खायला देतील. ही आठवण कायमची लक्षात राहिली आहे. - स्मिता तांबे, अभिनेत्री जबाबदारीचा विसर पडला अन्... म्हटलं की मला माझ्या शाळेतला एक अत्यंत गमतीशीर प्रसंग आठवतो. मी सहावीला असताना संगीत शिक्षकांनी माझ्याकडे एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली होती. ती म्हणजे स्वातंत्र्य दिनाला एक देशभक्तीपर गीत सादर करायचं. पण, मी ते पूर्णपणे विसरलो. नेमकं १५ ऑगस्टला सकाळी शाळेत जाण्यापूर्वी माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला गाणं सादर करायचं होतं आणि आपली अजिबात तयारी झालेली नाही. मग त्या दिवशी शाळेत न जाता काका-काकूंच्या डायनिंग टेबलाखाली लपून बसलो. ते दोघंही ठरलेल्या वेळेत कामावर निघून गेले आणि मी मात्र तसाच दिवसभर घरात एकटा होतो. तेव्हा माझी आईदेखील दुसऱ्या शाळेमध्ये संगीत शिक्षिका होती. त्यामुळे साहजिकच माझे सर्व शिक्षक आईला ओळखायचे. त्यांनी घडला प्रकार आईला सांगितला. मग दुसऱ्या दिवशी आईने मला चांगलंच फटकावून काढलं होतं. - प्रसाद ओक, अभिनेता शाळेच्या आठवणी खास १५ ऑगस्टला सकाळी सव्वा सात वाजता झेंडावंदन करणं, ही आजही माझ्यासाठी खास गोष्ट आहे. म्हणजे शाळेतून बाहेर पडल्यावर देखील अनेक वर्षं मी स्वातंत्र्य दिनी शाळेमध्ये गेले आहे. अनेक आजी-माजी विद्यार्थी स्वातंत्र्य दिनाला आवर्जून शाळेमध्ये येतात. त्यामुळे सकाळचं ते प्रसन्न वातावरण आणि प्रार्थना यामुळे मन भरून जातं. पण, २०११ साली चित्रीकरणामुळे शाळेत जाता येणार नव्हतं, त्यामुळे मी नाराज झाले होते. पण, माझं चित्रीकरण आदल्या रात्रीच संपलं आणि तसंच मी ड्राइव्ह करत पुण्याला पहाटे ३ वाजता पोहोचले. ३ तासांची झोप घेतली आणि दरवर्षी प्रमाणे सकाळी सव्वा सातला शाळेत जाऊन स्वातंत्र्य दिन साजरा केला. माझ्यासाठी ही आठवण महत्त्वाची आहे. यंदा स्वातंत्र्य दिनी शाळेत जाता येणार नाही, याची खंत आहे. - अनुजा साठ्ये, अभिनेत्री लाभलं उत्तम मार्गदर्शन माझं शालेय शिक्षण नागपूरमध्ये झालं आहे. शाळेत असताना दरवर्षी १५ ऑगस्टच्या निमित्ताने मी गायन आणि नृत्य सादर करायचे. त्यावेळी येणारे पाहुणे हे आम्हाला मार्गदर्शन करायचे. लहान असल्यामुळे भाषण तेवढं काही कळायचं नाही. पण, आपण जे काम करत आहोत त्या कामातूनसुद्धा आपल्या देशाच्या प्रगतीत खारीचा वाटा उचलत आहोत हे कळलं होतं. नागपूरमध्ये शालेय शिक्षण झाल्यामुळे अनेक दिग्गजांची भाषणं मी ऐकली आहेत. आजही शाळेत साजरा होणाऱ्या १५ ऑगस्टची आठवण येत आहे. - समिधा गुरु, अभिनेत्री परेडची पर्वणी माझी १५ ऑगस्टची आठवण जरा हट केच आहे. कारण, माझे बाबा पोलिसात होते. मी लहान असताना बाबा १५ ऑगस्टच्या कार्यक्रमाचे मुख्य असत. सामान्यपणे इतर मूल ज्यावेळी आपल्या शाळेत जाणाच्या तयारीला लागायचं, त्यावेळी मी मात्र चांगले कपडे घालून परेड बघण्याची तयारी करायचो. बाबा आणि आम्ही सगळे ती परेड बघायला जायचो. ती एक वेगळीच पर्वणी होती. झेंडावंदनानिमित्त शिस्त पाहण्यासोबतच पोलिसांविषयीचा आदरसुद्धा वाढत होता. आता बाबा निवृत्त झाले आहेत. पण, त्या परेडची आजही आठवण येते. - हेमंत ढोमे, अभिनेता-दिग्दर्शक-लेखक संकलन- मुंबई टाइम्स टीम
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Y5fo37