आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. कोरोनाचं संकट हे शेतकऱ्यांवरही ओढवलं आहे. त्यांना शेती करण्यापासून अडवण्यात आलेलं नाही. मात्र पिकवलेलं उत्पादन विकायचं कुणाला? हा प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा आहे. लॉकडाउनचे चटके हे त्यांनाही बसत आहेत. अशा सगळ्या वातावरणात एक दिलासा देणारी बातमी हवामान खात्याने दिली आहे.
शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा सरासरी इतका पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांसह संपूर्ण देशासाठी ही आनंदाचीच बातमी आहे. जून २०२० ते सप्टेंबर २०२० या महिन्यांमध्ये सरासरीइतका पाऊस पडणार असं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत ९६ %ते १०० % पाऊस पडेल असंही हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.