मुंबई: देशाचे पहिले फिल्ड मार्शल यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत असल्याचं सर्वांनाच माहित आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी एक व्हिडिओ शेअर करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या चरित्रपटाचं नाव 'सॅम' असं असून यात विकी कौशल माणेकशॉ यांची भूमिका साकारतोय. गेल्या वर्षी याच दिवशी विकीचा या चित्रपटामधला लूक समोर आला होता. अगदी हुबेहूब माणेकशॉ यांच्यासारखा दिसत असल्यानं विकीच्या या लुकची चर्चा सुरू आहे. 'भारताचे पहिले फिल्ड मार्शल, सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारायची संधी मला मिळाली आहे. एक सच्चा देशभक्त पडद्यावर साकारायला मला मिळणार आहे. या निर्भय देशभक्ताचा प्रवास मोठ्या पडद्यावर उलगडण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. मी त्यांची भूमिका साकारतोय याचा मला अभिमान आहे.' असं विकीनं म्हटलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार करणार असून २०२१ मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. पहिले फिल्ड मार्शल 'सॅम माणेकशॉ' १९७१ मध्ये बांगलादेश मुक्तीसाठी झालेल्या संग्रामात पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणारे भारतीय सैन्याचे पहिले फिल्ड यांची आज पुण्यतिथी. भारतीय लष्करात फिल्ड मार्शल हा सर्वोच्च सन्मानमिळविणारे माणेकशॉ हे पहिले अधिकारी होते. १९७१ मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धात बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळालं. या युद्धात त्यांनी लष्कराचे नेतृत्व केलं होतं. 'सॅम बहादूर' या नावानेही ते परिचित होतं. तीन एप्रिल १९१४ ला जन्मलेल्या माणेकशॉ यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत दुसरे महायुद्ध, पाकिस्तानविरुद्धची तीन युद्धे आणि चीनसोबत १९६२ साली झालेल्या युद्धांमध्ये सहभाग घेतला होता. दुसऱ्या महायुद्धात माणेकशॉ यांच्या शरीरात सात गोळ्या घुसल्या होत्या. त्यांंना तात्काळ लष्कराच्या तळावर पोहोचविल्याने त्यांच्यावर उपचार झाले आणि ते वाचले. त्यावेळी एका सर्जनने त्यांचे ऑपरेशन करण्यापूर्वी त्यांना काय झाले? असे विचारले असता त्यांनी 'मला एका गाढवाने लाथ मारली' असे उत्तर दिले. माणेकशॉ यांच्या दिलखुलासपणाचे असे अनेक किस्से आहेत. माणेकशॉ यांच्या प्रभावी कामगीरीने १९७२ मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांनी माणेकशॉ यांना पद्मभूषण या सन्मानाने सन्मानित केले. तसेच यांच्या सुवर्णमयी कामगिरीमुळेच त्यांना पद्मविभूषण, फिल्ड मार्शल असे सन्मान मिळाले. २७ जून २००८ रोजी वेलिंग्टन येथील सैनिकी रुग्णालयात माणेकशॉ यांचे निधन झाले.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3g8cOjr