अभिनयाशी तोंडओळख व्हावी म्हणून दहावीच्या वर्षाला असताना 'आधे अधुरे' नावाचं नाटक मी केलं. ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांचं हे नाटक. या नाटकामुळेच मी अभिनयविश्वामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. सांगलीत गेली अनेक वर्ष नाट्यचळवळ सुरू ठेवणाऱ्या चेतना वैद्य यांनी हे नाटक बसवलं होतं. त्यांना मी मावशी म्हणायचे. कारण, ती माझ्या आईची मैत्रीण होती. चेतना मावशीनं मला अभिनयाचे सुरुवातीचे धडे दिले असं म्हणता येईल. या नाटकादरम्यानच मला आतून असं वाटत होतं की, आपण हे (अभिनय) पुढे आयुष्यभर करू शकतो. शाळेत असताना मी खेळाडू होते. नंतर खेळांकडे काणाडोळा करत मी माझा पूर्ण वेळ अभिनयासाठी देऊ लागले. त्यानंतर कॉलेजमध्ये मी इंटरकॉलेजिएट एकांकिका स्पर्धेत सहभागी होऊ लागले. एका एकांकिका स्पर्धेसाठी' मी 'काया कल्प' नावाची एकांकिका केली होती. त्यातल्या माझ्या भूमिकेसाठी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक मिळालं होतं. या एकांकिकेमधलं काम पाहून मला माझी पहिली मालिका मिळाली.
ती स्पर्धा बघण्यासाठी त्यावेळी आदेश बांदेकर सांगलीमध्ये आले होते. त्यांनीच मला मालिकेमध्ये काम करणार का? असं विचारलं. कसलाही विचार न करता लगेच ‘हो’ म्हणून मोकळी झाले. 'ह्या गोजिरवाण्या घरात' या मालिकाचं कास्टिंग त्यावेळी सुरू होतं. याच मालिकेच्या शूटिंगच्या निमित्तानं मी मुंबईत दाखल झाले. तेव्हा मी साधारण १९ वर्षांची असेन. राकेश सारंग यांचं लिखाण आणि दीपक नलावडे यांचं दिग्दर्शन असलेल्या 'ह्या गोजिरवाण्या घरात'मुळे मला अनेक जाणकार कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. डॉ. गिरीश ओक, आनंद अभ्यंकर यांच्यासारख्या दिग्गज नटांसमोर काम करण्याचा अनुभव एक कलाकार म्हणून सुखावणारा आणि खूप काही शिकवणारा देखील होता. या मालिकेमुळे मी घरा-घरात पोहोचले. माझा चेहरा प्रेक्षकांच्या ओळखीचा झाला होता. माझ्याभोवती प्रसिद्धीचं वलय तयार होऊ लागलं होतं. ही मिळालेली लोकप्रियता आपल्या कामातून कशाप्रकारे टिकवून ठेवायची याकडे माझं संपूर्ण लक्ष होतं. कारण, लोकप्रियता मिळवणं सोपं असतं, पण ती टिकवणं अतिशय कठीण असतं हे मी मानते.
पृथ्वी थिएटर हे मुंबईतल्या नाट्यचळवळींचं एक महत्त्वाचं केंद्र मानलं जातं. मुंबईत आल्यावर सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी अभिनेते-लेखक-दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांच्या नाटकांसाठी बॅकस्टेजचं काम करायचे. त्यावेळी कळत-नकळत माझ्यावर नाटकातल्या विविध अवकाशांचे संस्कार झाले. पृथ्वीला असताना एकदा मला कुणीतरी हिंदी सिनेमाची ऑडिशन सुरू असल्याचं सांगितलं. त्या ऑडिशनमधून मला माझा पहिला सिनेमा, तोही बॉलिवूडपट मिळाला. तो सिनेमा म्हणजे सुभाष घई यांचा 'ब्लॅक अँड व्हाईट'. यात माझ्या भूमिकेचं नाव निम्मो कीर्तन सिंग असं होतं. चित्रपटात अभिनेते अनिल कपूर यांची मध्यवर्ती भूमिका होती. भारतात घडवल्या जाणाऱ्या दहशदवादी कृत्यांवर आधारित हा सिनेमा होता. या सिनेमामधलं माझं काम पाहून सुभाष घई यांनी त्यांच्या मराठी सिनेमाविषयी मला सांगितलं आणि मला पुढे 'सनई चौघडे' हा सिनेमा मिळाला. सिनेमात माझ्याबरोबर अभिनेता श्रेयस तळपदे आणि सुबोध भावे यासारखे कलाकार होते. सिनेमातही माझ्या भूमिकेचं नाव सई असंच होतं. माझ्यावर चित्रित झालेलं सुनिधी चौहान यांचं 'कांदे पोहे' हे गाणं त्यावेळी कमालीचं हिट झालं होतं. या भूमिकेनं मला सिनेविश्वात लोकप्रिय केलं असं म्हणता येईल.
छोट्या पडद्यावर 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'अग्निशिखा', 'अनुबंध' यांसारख्या मालिका तर रुपेरी पडद्यावर सुरुवातीच्या काळात 'पिकनिक', 'हाय काय-नाय काय', 'बे दुणे साडेचार' यासारखे सिनेमे केले. लक्षात राहिलेल्या भूमिकांमध्ये 'लालबाग परळ'ची प्रिया, 'रिटा'ची संगीता, 'नो एंट्री पुढे धोका आहे'ची बॉबी, 'पुणे ५२'मधील नेहा आणि मग माझ्या वाट्याला आलेली 'दुनियादारी' सिनेमातली शिरीन. माझ्यासाठी ‘शिरीन’ खूप महत्त्वाची आहे. ‘दुनियादारी’ हे माझ्या अभिनयप्रवासातलं एक महत्त्वपूर्ण वळण आहे. मुळात ‘दुनियादारी’ ही कादंबरीच एवढी प्रचंड लोकप्रिय आहे. त्यावर आधारित सिनेमानं आम्हा सर्व कलाकारांच्या अभिनय प्रवासाला कलाटणी दिली. संजय जाधव यांचं दिग्दर्शन आणि सहकलाकार म्हणून स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी यासारखे कलाकार असल्यामुळे हा सिनेमा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे.
एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत शिरताना कलाकार म्हणून अनेकदा खूप त्रास होतो. एखादी व्यक्तिरेखा नेमकी सापडण्यासाठी एकाग्र चित्तानं आधी ती समजून घ्यावी लागते. आजवरच्या माझ्या अभिनय प्रवासात रेणुका शहाणे यांच्या ‘रिटा’ सिनेमातली संगीता, ‘पुणे ५२’मधील नेहा, ‘हंटर’मधली ज्योत्स्ना, 'वजनदार'मधली कावेरी आणि 'लव्ह सोनिया'ची अंजली या भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक होत्या. ‘लव्ह सोनिया’च्या बाबतीत अधिक सांगायचं झालं, तर सिनेमातली अंजली ही माझी व्यक्तिरेखा वेश्या व्यवसायातली ही मध्यस्थ असते. अशी व्यक्तिरेखा साकारताना मला खूप मेहनत घ्यावी लागली. आजपर्यंत मी रंगवलेल्या भूमिकांपेक्षा अंजली खूपच वेगळी होती. मी अशा प्रकारच्या स्त्रियांना कधी भेटले नव्हते. त्यांची देहबोली आत्मसात करताना काही गोष्टींचं निरीक्षणं केलं, अभ्यास केला. सिनेमाची संपूर्ण टीम इतकी अभ्यासू आणि बॉलिवूडमध्ये नावाजलेली होती की; माझ्या वाटेला आलेल्या प्रत्येक दृश्यात मला माझे शंभर टक्के द्यायचे होते. या सिनेमामुळे, देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या व्यथा मला खऱ्या अर्थानं समजल्या. इथं पकडून आणलेल्या लहान मुलांना कसं गुलाम बनवलं जातं तेही समजलं. त्यांना छोट्या पिंजऱ्यामध्ये दोन-दोन दिवस अन्न-पाण्याविना बंद करून ठेवतात. हे सगळं अक्षरश: अंगावर येणारं होतं. प्रचंड मानसिक वेदना देणारं होतं. या भूमिकेबरोबरच आणखी एक भूमिका माझ्यासाठी खास आहे. मी मूळची सांगलीची असूनही मला ग्रामीण भागातली व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली नव्हती. ती संधी मला अभिनेते गिरीश कुलकर्णी यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’च्या निमित्तानं मिळाली. सिनेमात मी करिश्मा कुंभार नावाची भूमिका साकारली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Z5G8QJ