-संपदा जोशी करोनाचं संकट सुरू झाल्यापासून त्याविषयी विविध मार्गांनी, वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. मालिकांच्या चित्रीकरणाला आता पुन्हा सुरुवात होत असताना, त्यामध्ये करोनाचे काही संदर्भ किंवा त्याविषयी जागृती केली जाणार का, अशी उत्सुकता प्रेक्षकांना आहे. अगदी थेट वेगळा ट्रॅक दाखवण्याबाबत काही सूचना नसल्या, तरी स्वच्छतेची काळजी, मास्कचा वापर यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मार्गांनी करोनाचे संदर्भ येत राहतील असं दिसतंय. तीन महिन्यांपूर्वी लॉकडाउनमुळे मालिकांचं थांबलं आणि आता काही शर्ती-अटींवर चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात होते आहे. टीव्ही मालिकांमध्ये बऱ्याचदा ताजे संदर्भ येत असतात. वेगवेगळे सणवार साजरे होताना दिसतात. त्यामुळे, मालिकांचे नवे भाग चित्रीत करण्यात येणार असताना करोनाच्या संकटाचं प्रतिबिंब मालिकांमध्ये दिसू शकेल अशी अटकळ बांधली जात होती. नव्या भागांच्या प्रतीक्षेत असलेले प्रेक्षकही संकटाविषयी मालिकांमध्ये काही ना काही पाहायला मिळणार अशी चर्चा करत होते. त्यामुळे ही उत्सुकता आहेच. लॉकडाउनपूर्वी मालिकांच्या गोष्टी जिथे थांबल्या होत्या, साधारण तिथून पुढे कथा सुरू होणार हे नक्की आहे. पण, हे ट्रॅक दाखवतानाच त्यामध्ये करोनाविषयक काही गोष्टींची भर पडू शकते. काही मालिकांमध्ये सुरक्षित वावराचे नियम पाळणं किंवा तसं दाखवणं, मास्क वापरून काम करताहेत किंवा अगदी सतत हात स्वच्छ धुत आहेत अशा प्रकारे अप्रत्यक्षरित्या करोनाबाबत काही गोष्टी मालिकांमध्ये बघायला मिळतील, असं समजतंय. प्रेक्षकांना इतके दिवस मालिकांची खूप आठवण येत होती. त्यामुळे नव्यानं प्रेक्षकांच्या भेटीला येताना त्यात काही ताजे संदर्भ आणण्यात येतील, असं टीव्हीविश्वातून कळतंय. , , , कलाकार आणि मालिकांची संपूर्ण टीमच त्यासाठी कामाला लागली आहे. मालिकांमध्ये करोनाच्या बाबतीत प्रत्यक्ष किंवा वेगळा असा काही ट्रॅक दाखवला जाणार नाही. किंवा त्याबाबत अजून काही सूचना मिळालेल्या नाहीत. पण, अर्थातच अगदी साध्या साध्या गोष्टी नक्कीच दाखवल्या जातील. कारण मालिका या वास्तवदर्शी असतात. त्यामुळे सॅनिटायझरचा वापर करणं, चेहऱ्यावर मास्कचा वापर दाखवणं, सुरक्षित वावर इत्यादी गोष्टी मी लिहित असलेल्या मालिकांमध्ये तरी दाखवल्या जातील. - अभिजीत गुरू, लेखक, (माझ्या नवऱ्याची बायको), (रंग माझा वेगळा) 'रात्रीस खेळ चाले-२' मालिका मुळातच भूतकाळातील गोष्टींवर आधारित असल्याने मालिकेची गोष्टं जिथं थांबली होती तिथूनच ती पुन्हा सुरू होईल. पण, मालिकेत करोनाविषयी गोष्टी कितपत दाखवता येतील याबाबत मी जरा सांशक आहे. कारण अजून अशा कोणत्याही प्रकारच्या सूचना मला मिळालेल्या नाहीत. करोनाबाबत जनजागृती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून गेले काही दिवस होते आहे. त्यामुळे पुन्हा मालिकेतून त्याबाबत दाखवण्यापेक्षा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यावर जास्त भर असेल. - प्रल्हाद कुडतरकर, पटकथालेखक, (रात्रीस खेळ चाले-२)
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fKg4Bi