Full Width(True/False)

पुन्हा शूटिंग ; कलाकार मंडळी म्हणतायत 'है तय्यार हम'

सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं आणि मार्गदर्शक तत्वांचे पालन करुनच चित्रीकरणाला सुरुवात होईल. चित्रनगरीमध्ये 'स्वराज्यजजनी जिजामाता', 'स्वामिनी', 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मराठी मालिकांचे सेट आहेत. या मालिकांना चित्रीकरण सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली असून, येत्या काही दिवसांत चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेलादेखील परवानगी मिळाल्याचं कळतंय. काही हिंदी मालिकांच्या चित्रीकरणास २२ जूनपासून सुरुवात होणार आहे. जुलै महिन्यापासून मालिकांचे नवे एपिसोड्स पुन्हा दिसणार आहेत. यामध्ये 'गुड्डन तुम से ना हो पाएगा', 'कुमकुम भाग्य', 'कुंडली भाग्य', 'तुझसे है राबता' यासारख्या मालिकांचे नवीन एपिसोड्स प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. ठाण्यात शूटिंग होत असलेल्या 'ह.म. बने तु.म. बने' आणि कोल्हापूरमध्ये चित्रीत होणाऱ्या ' तुझ्यात जीव रंगला' मालिकेलाही चित्रीकरणासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. शूटिंगसाठी तयारी जोरात सुरू आहे...कलाकार-तंत्रज्ञ हळूहळू सेटवर दाखल होत आहेत. मालिकांच्या चित्रीकरणासाठी एकूणच वेगानं हालचाली होताहेत. तीन महिन्यांनंतर पुन्हा सेटवर येताना प्रेक्षकांचे लाडके कलाकार नेमकी कशा प्रकारे तयारी करताहेत? कोणत्या गोष्टींची खबरदारी ते घेणार आहेत? हे आम्ही जाणून घेतलंय त्या कलाकारांकडूनच.

चित्रीकरण सुरू झाल्यानंतर, सरकारनं आखून दिलेल्या कोणत्याही नियमांचा आमच्याकडून भंग होणार नाही याकडे आम्ही कटाक्षानं लक्ष देऊ. नियमित व्यायाम करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचं ठरवलं आहे. सेटवर वेळोवेळी प्रत्येकाच्या शरीराचं तापमान, रक्तदाब तपासला जाणार आहे. शिवाय, चित्रीकरण सुरू झाल्यानंतरही तशी काही लक्षणं आढळ्यास तात्काळ विलगीकरण करून त्याबद्दलची माहिती आमच्या टीमला देऊ, असं आम्ही ठरवलं आहे. आता काम करणं हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. प्रोडक्शन टीम आमची काळजी घेईलच, परंतु, स्वतःची काळजी स्वतः घेणंही गरजेचं आहे. शिवाय, नियम पाळण्यात कुठेही हेळसांड होणारं नाही याकडे लक्ष असेल. कमी लोकांची टीम असल्यामुळे स्वतःची कामं स्वतः करणार आहे. जिथे आवश्यकता आहे, तिथेच सहकाऱ्यांची मदत घेऊन काम करू.

-अनिता दाते (राधिका, माझ्या नवऱ्याची बायको)

शूटिंग सुरू होणार आहे, पण शूटिंगचं नेमकं काय होणार, सेटवर कसं चित्र असणार याबद्दल तूर्तास सांगणं कठीण आहे. अर्थातच प्रोडक्शन टीमकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जाणार आहे. शिवाय, मला शक्य होईल तेवढी मी स्वतःची काळजी स्वतःही घेणार आहे. एरव्ही, मेकअपरूमध्ये रंगणाऱ्या गप्पा, धमालमस्ती कदाचित आता करणं कठीण होईल. पण, सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व नियमांचं पालन करणार आहे. त्यात नवीन गोष्टी शिकण्यास थोडा वेळही जाईल. भूमिकेनुसार काही बदल होतील. मालिका सुरू झाल्यापासून भाषेवर विशेष लक्ष देत होते. शिवाय, प्रसारित झालेले जुने भाग बघून त्यानुसार भूमिकेचा अभ्यास असेलच. स्वतःला सकारात्मक ठेवून काम करणार आहे. अगोदर हेअर किंवा मेकअप अशा गोष्टींसाठी आमच्या टीमवर अवलंबून असायचो. आता मात्र स्वतः या गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे मी या गोष्टी शिकून घेतल्या आहेत. लोक कमी असल्यामुळे कदाचित तारेवरची कसरत होईल. पण, त्यासाठी तयार आहे.

- अमृता पवार (जिजाऊ, स्वराज्य जननी जिजामाता)

करोनाच्या काळात चित्रीकरण करणं खरं तर काही अंशी धोकादायक असू शकतं. परंतु, सरकारची परवानगी मिळाल्यानंतर सगळ्यांनी त्याच उत्साहानं कामाला लागणं ही कौतुकास्पद गोष्ट आहे. सध्या घरी असताना आपण जेवढी काळजी घेतो, तेवढीच किंवा त्याहून अधिक खबरदारी घेणं ही माझी स्वतःची जबाबदारी असेल. शिवाय, मी साकारत असलेल्या पात्राचा मेकअप करायला मी या सुट्टीच्या दिवसांत शिकले. शुटिंगला संपूर्ण युनिट नसल्यामुळे काही प्रमाणात अडचणी येऊ शकतात, किंवा शूटसाठी अधिक वेळ लागू शकतो. पण, त्याला पर्याय नाही. शिवाय, खूप दिवस काम थांबवणं आणि त्यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन थांबणं हे कलाकार म्हणून न पटणारं आहे. पण, ही भीती बाळगून केवळ थांबून राहणं हा त्यावरचा उपाय नव्हे. त्यामुळे शूटिंग सुरू होतंय ही कलाकार म्हणून सुखावणारी गोष्ट आहे.

- सोनाली पाटील (वैजू, वैजू नं १)

शूटिंग सुरू होणार ही कलाकार म्हणून आनंद देणारी गोष्ट असली, तरी सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करून चित्रीकरण करणं ही आमची जबाबदारी असेल. लॉकडाउनच्या काळात चित्रीकरण बंद असल्यामुळे मी माझ्या सांगलीच्या घरी होतो. शूटिंग सुरू होणार हे कळताच मी आवश्यक ती सगळी पूर्तता करून पुन्हा मुंबईत येऊन सध्या क्वारंटाइन आहे. आता शूटिंग लवकरच सुरू होईल. पण, माझे शॉट्स नसल्यावर मास्क घालून सेटवर वावरणं, वेळोवेळी हातांची स्वच्छता करणं याकडे लक्ष देईन. शिवाय, शूटिंग सुरू होण्यापूर्वी आमचं एक वर्कशॉप होणार आहे. ज्यात आम्हाला शूटिंगमधले बदल, कलाकारांनी घ्यायची काळजी याबद्दल मार्गदर्शन केलं जाणार आहे. तीन साडे-तीन महिन्यांनंतर सुरू होणाऱ्या शूटिंगबाबत उत्सुकता आहे आणि त्यासाठी माझी पूर्ण तयारीही आहे.

- सुमित पुसावळे (बाळूमामा, बाळूमामाच्या नावानं चांगभलं)

येत्या काही दिवसांत शूटिंग कधीही सुरू होणार असल्यामुळे मी काही दिवसांपूर्वी पुण्याहून पुन्हा मुंबईत आले. साधारणतः तीन महिन्यानंतर चित्रीकरणाला सुरुवात होणा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याची आतुरतेनं वाट पाहत होते. करोनामुळे पुढचे अजून काही दिवस स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. तेच नियम पाळून शूटिंग करावं लागेल. या गोष्टीला खूप घाबरून न जाता, सकारात्मकतेनं मी याला सामोरं जाऊन काम करण्याचं ठरवलं आहे. शिवाय, खूप दिवसांनंतर काम करण्याचा वेगळाच उत्साह असेल. त्यामुळे शूटिंग सुरू झाल्यानंतरही आम्ही सर्वतोपरी काळजी घेऊन पूर्वीसारखीच मजा करत आमचं काम करणार आहोत. निर्माते-दिग्दर्शक त्यांच्या परीनं सगळी खबरदारी घेतीलच. परंतु, मीही स्वतःची योग्य ती काळजी घेईन. शिवाय, सर्व सरकारी नियमांचं मी पालन करणार आहे.

- गौतमी देशपांडे (सई, माझा होशील ना)

लॉकडाउनच्या काळात मी गोव्याला माझ्या घरी होतो. चित्रीकरण सुरू होणार असल्यानं काही दिवसांपूर्वीच सांगलीत आलो आहे. सांगलीत आल्यावर आम्ही कलाकार आणि प्रोडक्शनमधील लोकं असा आमचा व्हिडीओकॉल झाला. आम्हाला कशी काळजी घ्यायची आहे, काय करायला हवं याची उजळणी झाली. नियम पाळून शूटिंग करणं बंधनकारक असल्यामुळे आम्हा सगळ्यांचीच ती जबाबदारी असणार आहे. सध्या माझ्या मालिकेचे जुने भाग बघणं सुरू आहे. एवढ्या मोठ्या सुट्टीनंतर काम करणं आव्हान असणार आहे. पण माझ्या परीनं मी त्यासाठी तयारी करतोय. मालिकेच्या प्रवाहात शिरण्यास यामुळे मदत होईल. बाहेर जास्त चित्रीकरण करता येणार नसल्यामुळे काही बदलांसह संवाद आणि पटकथा येत आहेत. त्यामुळे मालिकेत आता पुढे काय असणार याबद्दल प्रेक्षकांइतकीच मलाही उत्सुकता आहे.

- अशोक फळदेसाई (शिवा, जीव झाला येडापिसा)

तीन महिने हा खरंच खूप कठीण काळ होता. कोणत्याही क्षेत्रापासून एवढे दिवस लांब राहिल्यावर त्यात पुन्हा काम करण्यासाठी तयारी करण्याची आवश्यकता असते. ती आम्हालाही करावी लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी साकारत असलेलं पात्र. लॉकडाउनपूर्वीच्या शूटिंगच्या वेळी त्याचा सूर कसा होता याकडे माझं विशेष लक्ष असेल. त्या दृष्टीनं अभ्यास सुरू करणार आहे. शेवटचे भाग बघून त्याप्रमाणे पुढील काम सुरू होईल. येत्या काळातल्या शूटिंगच्या संवादांचं झूम मीटिंगवर वाचन आणि सराव होईल. यामुळे, सेटवर गेल्यानंतरचा वेळही वाचेल. शिवाय, शूटिंगला परवानगी देताना सरकारकडून आखून देण्यात आलेल्या सगळ्या नियमांचं पालन करणं अत्यावश्यक आहे. मी सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करणार आहे. लवकरच परवानगीच्या सोपस्कारांची पूर्तता झाल्यानंतर साधारणपणे २५ किंवा २७ जूनपासून आमच्या शूटिंगला सुरुवात होईल.

- आशुतोष गोखले (कार्तिक, रंग माझा वेगळा)

शब्दांकन : अजय उभारे



from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3esHtHw