जवळपास दोन वर्षांपूर्वी, ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूची बातमी सर्वांना सुन्न करून गेली होती. तिच्या निधनाबद्दलही बरेच प्रश्न उपस्थित झाले होते. प्रथम त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं गेलं. नंतर त्या बाथटबमध्ये बुडाल्याची बातमी पुढे आली. त्याच्या मृत्यूबद्दल असंही बोललं गेलं की, सौंदर्य टिकवण्यासाठी केलेल्या अनेक शस्त्रक्रियांमुळे असं झालं असावं. दुबई पोलिसांनी दोनदा शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं सांगितलं असलं, तरी आजही बरेच लोक त्यांच्या मृत्यूला नैसर्गिक मानत नाहीत.
ज्याप्रमाणे दिशा सालियनच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जातो, त्याचप्रमाणे अभिनेत्री दिव्या भारतीच्या मृत्यूकडेही संशयानं पाहिलं गेलं होतं. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी 'शोला आणि शबनम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी दिव्या भारती अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. ३ एप्रिल, १९९३ ला फ्लॅटच्या खिडकीतून खाली पडून तिचा रहस्यमय मृत्यू झाल्याचं कळलं होतं. मद्यपान केल्यामुळे बाल्कनीतून पडणं हे मृत्यूचं कारण असल्याचं पोलिस अहवालात म्हटलं जात होतं. परंतु, तिच्या अचानक मृत्यूविषयी बऱ्याच शक्यता वर्तवल्या जात होत्या. काहींनी तिच्या मृत्यूचा संबंध तिचा पती साजिद नाडियादवालाशी जोडला होता. तर काहींनी तिला घरातून ढकललं गेल्याचं म्हटलं होतं. तिच्या मृत्यूचा संबंध थेट अंडरवर्ल्डशीही जोडला गेला होता.
अभिनेत्री दिव्या भारतीप्रमाणेच ६०-७० च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया राजवंशच्या निधनानंदेखील खळबळ उडाली होती. 'हिर रांझा' आणि 'हंसते जख्म'सारख्या हिट चित्रपटांची नायिका प्रिया राजवंशचं निधन तिच्या घरात रहस्यमय अवस्थेत झाल्याचं तेव्हा बोललं गेलं होतं. तिचा मृत्यू देखील ही आत्महत्या असल्याचं आधी सांगण्यात आलं होतं. नंतर मालमत्तेच्या वादातून तिची हत्या झाल्याचं तपासात स्पष्ट झालं होतं.
७०-८०च्या दशकातील लोकप्रिय दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्या निधनानंही अनेक प्रश्न उपस्थित केले होते. काहींचं म्हणणं होतं की, घराच्या गच्चीवरुन उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. तर काहींच म्हणणं होतं की, ते पाठीच्या दुखण्यानं ते त्रस्त होते आणि त्यामुळे ते पडले. पण, अद्याप त्यांच्या मृत्यूमागचं खरं कारण स्पष्ट झालेलं नाही. अभिनेत्री कृतिका चौधरी हिच्या रहस्यमय मृत्यूनंही पोलिसांसमोर पेच निर्माण केला. त्याचप्रमाणे बॉलिवूडमधील आणखी अनेक बड्या कलाकारांचा शेवट दु:खद आणि रहस्यमय झाला होता. अभिनेत्री परवीन बाबी, गायिका-अभिनेत्री सुरैया, अभिनेत्री मीना कुमारी आदी गुणी कलाकारांचा शेवट ही यातलीच काही उदाहरणं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ecHhMz