Full Width(True/False)

कंगनाने सांगितली सुशांतशी निगडीत धक्कादायक गोष्टी

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना रणौतने बॉलिवूडमधली घराणेशाही याला जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. आता कंगनाने एका मुलाखतीत यासंबंधीत अनेक मोठे खुलासे केले आहेत. यासोबतच तिने मुकेश भट्ट यांच्यावरही राग व्यक्त केला. मुकेश भट्ट यांनी सांगितलं होतं की, त्यांना सुशांतच्या मानसिक अवस्थेची आधीपासून कल्पना आली होती. एवढंच नाही तर त्यांनी सुशांतच्या मानसिक अवस्थेची तुलना परवीन बाबीशी केली होती. एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाला की, 'माझा आणि सुशांतचा कमल जैन हा कॉमन फ्रेण्ड आहे. यासंबंधी माझं कमलशी बोलणंही झालं. कमलला याविषयी काही माहीत आहे का मी विचारलं असता त्याने अनेक गोष्टी सांगितल्या. कमलजी मला म्हणाले की त्यांचं गेल्या सोमवारीच सुशांतचं आणि त्यांचं बोलणं झालं होतं. सुशांत फार डिस्टर्ब होता.

कमलजी म्हणाले की, सुशांत यापूर्वी कधीच असा बोलला नव्हता. सुशांत कमलजींना म्हणाला की, 'माझ्यासोबत एखादा मोठा सिनेमा कर यार.. मी छिछोरे दिला.. मी अनेक हिट सिनेमे दिले आहेत. पण तरीही माझ्याकडे मोठा सिनेमा नाही. माझ्याकडे त्या पद्धतीचं काम नाहिये जसं मला करायचं आहे.' यानंतर कमलजी यांनी त्याला दिलासा दिला की लॉकडाउन संपल्यानंतर एखादा सिनेमा करू. दोघं गुरुवारी भेटणार होती. पण त्याआधीच त्याने आपलं आयुष्य संपवलं. त्याला ज्यापद्धतीने बाजूला ठेवलं गेलं त्यावरून तो फार अस्वस्थ होता.

कंगना पुढे म्हणाली की, सर्वांनाच माहीत आहे की गँग तयार करून सुशांतला कसं जाणीवपूर्वक बाजूला केलं गेलं. याविषयावर ती सर्वांसमोर येऊन बोलायलाही तयार आहे. तसेच यावेळी तिने मुकेश भट्ट यांचाही समाचार घेतला. 'मी तुमच्याशी आता बोलत असतानाही माझे हात कापत आहेत. देशात एवढ्या गोष्टी सुरू आहेत. भारताचे अनेक जवान शहीद झाले. यासर्व गोष्टी घड असतानाही माझ्या डोक्यातून सुशांतचा मृत्यू जात नाही.'

मुकेश भट्ट यांनी दावा केला होता की, सुशांतच्या मनःस्थितीचा अंदाज त्यांना दिड वर्षांपूर्वीच आला होता. यावर बोलताना कंगना म्हणाली की, 'मुकेश भट्ट म्हणाले की, सुशांत हा परवीन बाबीच्या मार्गावरच होता. पण त्यांनी परवीन बाबीसोबत काय केलं हे साऱ्यांनाच माहीत आहे.' मुकेश भट्ट यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कंगना म्हणाली की, 'अशापद्धतीचं बोलण्याचा त्यांना कोणी अधिकार दिला. सुशांत हुशा होता. त्याने स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीची शिष्यवृत्ती यासाठी सोडली कारण त्याला त्याची स्वप्न पूर्ण करायची होती.

या सर्व गोष्टी अशा आहेत ज्याच्याबद्दल त्यांची (भट्ट) मुलं कधी विचारही करू शकत नाहीत. उद्या जर त्यांच्या मुलाने गळफास लावून घेतला आणि त्याची बरोबर परवीन बाबीसोबत केली गेली, तर तेव्हा मी पाहीन त्यांना कसं वाटेल.' कंगना आणि सुशांतने कधी एकत्र काम केलं नाही पण एम.एस धोनी- द अनटोल्ड स्टोरीच्या यशानंतर त्याने कंगनासोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती.

दरम्यान, सुशांतनं आत्महत्येचं इतकं टोकाचं पाऊल का उचललं या संदर्भात पोलीस आता तपास करणार आहेत. खरंच बॉलिवूडमधील स्पर्धेमुळं तो डिप्रेशनमध्ये गेला होता का? याची चौकशी केली जाईल असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखं यांनी म्हटलं आहे. सुशांतच्या शवविच्छेदनाच्या अहवालात त्याने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं होतं. याशिवाय तो क्लिनिकल डिप्रेशनमध्ये होता असंही त्या अहवालात म्हटलं आहे. याची दखल घेऊन गृहमंत्र्यांनी बॉलिवूडमधील स्पर्धा हेच याचे कारण आहे? का याची चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिस या प्रकरणाचा छडा लावतील असंही त्यांनी म्हटलं आहे.



from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30QKOMR