संजना पाटील, कॉलेज क्लब रिपोर्टर काही दिवसांपूर्वी अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर 'ओएमटी' अशी एक पोस्ट शेअर केली. अनेक दिग्गज कलाकारांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर, हे नेमकं काय असावं असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. तर, ‘ओएमटी’ म्हणजे '' अशी कल्पना असल्याचं समोर आलं आहे. ‘ओएमटी’च्या माध्यमातून काही कलाकारांमध्ये अभिनयाची स्पर्धा रंगणार आहे. ही स्पर्धा प्रेक्षकांना ४ जुलैपासून ऑनलाइन पाहता येणार आहे. या स्पर्धेत कलाकार मंडळी एक-एक टीमच्या माध्यमातून सहभागी होणार असून, 'घेऊन टाक', '२ फुल्या ३ बदाम', 'वल्ली'स' आणि 'मसाला पान' अशी या टीम्सची नावं आहेत. मिलिंद पाठक, भार्गवी चिरमुले, शुभंकर तावडे, नंदिता पाटकर, ऋतुराज शिंदे, संकर्षण कऱ्हाडे, ऋतुजा बागवे, आरोह वेलणकर, गौरी नलावडे, मयुरी वाघ, रसिका आगाशे, हेमांगी कवी, नेहा शितोळे, आशुतोष गोखले, विकास पाटील, संदीप पाठक, नचिकेत देवस्थळी, आरती मोरे, प्रिया मराठे असे अनेक प्रसिद्ध कलाकार या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. कोण कुठल्या टीममध्ये असेल याची उत्सुकता चाहत्यांना आहे. प्रेक्षकांना ४ जुलैपासून दर शनिवार-रविवारी ही स्पर्धा ऑनलाइन पाहता येणार आहे. स्पर्धा पाहण्यासाठी सोशल मीडियावर एक लिंक उपलब्ध करून देण्यात येईल. त्यावर क्लिक करून, रीतसर तिकीट काढून या धमाल स्पर्धेचा सर्वांना आनंद घेता येणार आहे. अभिनेता सुनील बर्वेची ‘सुबक’ ही संस्था आणि ‘व्हाइट विंग्स मीडिया’ हे संयुक्तपणे या स्पर्धेचं आयोजन करत आहेत. ‘घरात बसलो म्हणून का हो, अडतंय आमचं खेटर...अभिव्यक्त होण्यासाठी आता ऑनलाइन माझं थिएटर’, असं म्हणत प्रत्येक कलाकार रंगभूमीवर उत्साहानं पुन्हा एकदा ऑनलाइन उतरण्यासाठी सज्ज झालेला आहे. लॉकडाउनचा काळ सुरू झाला आणि नवनवीन प्रयोगांनाही सुरुवात झाली. परंतु, काही काळानं त्यातसुद्धा एकसुरीपणा दिसू लागला. थिएटर ही न थांबणारी गोष्ट आहे असं मला वाटतं. याचा प्रेक्षकवर्ग कमी-जास्त होऊ शकतो. त्यातून ‘ओएमटी’ची कल्पना सुचली. अत्यंत गमतीदार असा हा खेळ असणार आहे. सर्वांनी याची भरभरून मजा घ्या एवढंच मी सांगू इच्छितो. - सुनील बर्वे
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gbCCv5