Full Width(True/False)

थिएटरला पर्याय शोधता येईल असं वाटत नाही: नागराज मंजुळे

सध्या ओटीटीवर चित्रपटांची रांग लागल्यामुळे ओटीटी हा सिनेमागृहांना पर्याय होऊ लागल्याची चर्चा आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते यांना मात्र तसं वाटत नाही. 'थिएटरमध्ये सगळ्या सुविधांसह चित्रपट पाहणं हा वेगळा आनंद आहे. त्याला पर्याय शोधता येईल असं वाटत नाही', असं ते म्हणतात. आगामी कामांमध्ये गढून गेलेलं, प्रत्येक गोष्टीत साधेसरळपणा जपणारं आणि स्वतःमधला विद्यार्थी चिरंतन जपण्याला महत्त्वं देणारं नाव म्हणजे...प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे. त्यांनी दिग्दर्शित केलेला 'पावसाचा निबंध' आणि प्रस्तुत केलेले 'बिबट्या' आणि 'पायवाट' हे लघुपट नुकतेच ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाले. तसंच त्यांचा आगामी 'झुंड' चित्रपटही चर्चेत आहे. यानिमित्त त्यांच्याशी झालेल्या गप्पा. माध्यम एकच... 'सैराट'ला मिळालेल्या यशानंतर 'पावसाचा निबंध' हा लघुपट त्यांनी केला. त्याविषयी नागराज म्हणाले, 'चित्रपट केल्यानंतर लघुपट करू नये असं काही मी समजत नाही. 'फँड्री'च्या आधीही मी लघुपट केला होताच. आवाका छोटा किंवा मोठा असला, तरी माध्यम एकच आहे. एखादी गोष्ट छोटी असते, ती लघुपटात सांगून होते. पावसाची गोष्ट खूप दिवस मनात होती. ती एक तर भर पावसातही करायची होती. पूर्वी लघुपटासाठी तेवढं बजेट शक्य नव्हतं. शक्य झालं तेव्हा केलं.' थिएटरचा आनंद वेगळा सध्या अनेक कलाकृती ओटीटीकडे वळत आहेत. थिएटरला हा पर्याय ठरेल, अशी चर्चा असते. त्याविषयी विचारलं असता, लगेच काही आडाखे बांधणं योग्य नाही असं नागराज यांना वाटतं. ते म्हणाले, 'लगेच असं काही घडेल असं वाटत नाही. थिएटरमध्ये सगळ्या सुविधांसह चित्रपट पाहणं हा वेगळा आनंद आहे. ओटीटी म्हटलं, तरी सगळ्यांकडे ही सुविधा नाही. थिएटरमध्ये सिनेमा बघण्यासाठी मोठा पडदा, साउंड सिस्टीम आणि अनुकूल वातावरण असतं. त्याला पर्याय शोधता येईल असं मला वाटत नाही.' पुन्हा बदलेल मनोरंजनसृष्टीची बदललेली कामाची पद्धत, आगामी काळाबद्दल असणारं संभ्रमाचं वातावरण याविषयी नागराज म्हणतात, 'आता अमुकच घडेल, असं काही भाष्य आपण करू शकत नाही किंवा ही परिस्थिती कायम राहील, असं गृहीत धरू शकत नाही. काही महिन्यांपूर्वी करोना येईल असं कुणाला वाटलंही नव्हतं. सध्याची परिस्थिती अशीच राहील, बदलणार नाही किंवा अशाच पद्धतीनं बदलेल असं आपण घाईनं सांगू शकत नाही. यापूर्वीही रोगराई, महायुद्ध यानंतर जग सुरळीत झालं, पुन्हा चालू लागलं.' प्रयत्न करा; खचू नका आपल्याला नागराज मंजुळेंसारखा दिग्दर्शक मिळावा, असं अनेकांना वाटतं. नागराज म्हणाले, 'प्रत्येकजण आपापल्यापरीनं धडपडत असतो. सगळ्यांच्या आयुष्यात सगळं घडतं असं नाही. आपली आवड जोपासून काम करत राहिल्यावर मार्ग सापडत जातात. या माध्यमात आता मोकळेपण आलंय. युट्यूब, लघुपट, ओटीटी अशी व्यासपीठं उपलब्ध आहेत. आपण आपलं काम करत राहावं. मात्र, एखाद्या वेडापायी हाती असलेलं करिअर बरबाद करून घेण्यात शहाणपण नाही आणि प्रयत्न करणं सोडून खचून जाणंही योग्य नाही. आता संधी खूप आहेत.' पुढचं पाऊलही पडेल...'सैराट'नं मराठी चित्रपटाला शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवून दिलं. मराठी चित्रपटांबाबत आशय, व्यावसायिक गणितं की मनोरंजन महत्त्वाचं ही चर्चा सातत्यानं सुरू असते. हे कायमच घडत राहणार असं सांगून नागराज म्हणाले, 'आजवरचे सगळे रेकॉर्ड तोडणारा चित्रपट येईलच की. कुठलीही गोष्ट ठरवून होत नाही. कलेचं हे क्षेत्र आशेवर पुढे जात असतं. मराठी चित्रपटसृष्टी चांगलं काम करून आणखी पुढे जाईल. चांगले लोक येत आहेत. त्यामुळे कुठलेही ठोकताळे नकोत. आशावादी असणं उत्तम.' होतेय इच्छापूर्ती... अभिनेता-निर्माता रितेश देशमुखनं नागराज मंजुळेंसह छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटांची घोषणा केली आहे. एवढं मोठं कर्तृत्व असणाऱ्या थोर व्यक्तीवर चित्रपट करावा, ही या क्षेत्रात येण्यापूर्वीपासूनची इच्छा होती, असं नागराज सांगतात. ते म्हणाले, 'सध्या या प्रकल्पाचं प्राथमिक पातळीवर काम आणि तयारी सुरू आहे. मलाही उत्सुकता आहे.' नेहमीप्रमाणे नव्यांना संधी, की प्रस्थापितांसोबत काम करणार असं विचारताच ते म्हणाले, 'मी असं काहीही ठरवलेलं नाही. भूमिकेला योग्य व्यक्ती निवडणं हा विचार असतो. नव्यांना संधी मिळावी असं वाटतं. प्रस्थापितांसोबत काम करायचं नाही असं ठरवलेलं नाही. यापूर्वी केलं आहेच.' 'झुंड'बद्दल पहिल्यांदाच अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे या दोन नावांमुळे 'झुंड' चित्रपटाची सातत्यानं चर्चा आहे. टीझर आल्यावर या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली. नागराज म्हणाले, 'चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरू आहे. माझा चित्रपट प्रदर्शित व्हावा म्हणून सगळं सुरळीत व्हावं, असं मला वाटत नाही. सगळं जग चिंतेत असताना माझा चित्रपट यावा असा विचारही नाही. सगळं नीट झाल्यावर आला, तर लोकांनाही तो पाहायला आनंद वाटेल.' कुठल्याही भूमिकांना मी पर्याय शोधत नाही. ते पात्र जसंच्या तसं शोधायचा माझा प्रयत्न असतो. ज्यांना फार संधी मिळत नाहीत अशांना ती मिळावी, ही माझी नेहमीच इच्छा असते. - नागराज मंजुळे


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2CPhKM3