तरडे म्हणाले, की 'खरं तर 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटात, 'शेती ईकायची नसते, शेती राखायची असते' हा संवाद जेव्हा मी लिहिला, तेव्हा या संवादाची ताकद काय असेल, याची मला आधीपासूनच जाणीव होती. आज अनेक गाड्यांवर हे वाक्य लिहिलेलं दिसतं. अनेक गावांतून शेतकरी मला फोन करतात आणि सांगतात, की आम्ही आमची शेती विकली होती. अगदी सगळा व्यवहार पूर्ण होत आला होता. मात्र, चित्रपट पाहिला आणि विक्रीचा व्यवहार रद्द केला. पैसे परत दिले.
प्रवीणजी, आम्ही शेती करणार. म्हणूनच, माझ्या मते या चित्रपटाचं संपूर्ण यश त्या संवादामध्ये होतं. ही गोष्ट किती खरी आहे, हे आज आपण पाहतो. आयटी पार्क, औद्योगिक विकास, हिलस्टेशन असं काहीही असलं, तरी नेहमी शेतकऱ्यांचीच जमीन सगळ्यांना हवी असते. काळ्या सुपीक पठारावर मोठमोठे कारखाने उभे राहतात. राज्यात मोकळं रान पडलेलं असताना कंपन्या मात्र, जिथं काळी आई आहे, जी धान्य पिकवते, लोकांची भूक भागवते तिथेच उभ्या राहतात.'
आपल्या शेतात काम करण्याबाबत ते म्हणाले, की 'भात लावणीचं म्हणाल, तर आताही आमच्या जातेडे या गावी (ता. मुळशी) शेतीसाठी मजूर मिळत नाहीत. यंदाही भात लावायचा होता. एव्हाना आई-वडील कामं उरकून वारीला जातात. वडिलांचं वय ७८, तर आई ७०-७२ वर्षांची आहे. हे दोघं मिळून शेतात किती काम करणार? म्हणूनच, गेली ४-५ वर्षं भातलावणीच्या या काळात मी आवर्जून गावाला जातो.
यंदा माझे वडील विठ्ठल तरडे आणि आई रुक्मिणी, पत्नी स्नेहल तसंच बंधू योगेश तरडे यांच्यासह 'मुळशी पॅटर्न' चित्रपटातले कलाकार रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सुनील पालकर यांनीही शेतात काम केलं. मजुरांची कमतरता असतानाही आमचा भात लावला गेला. या निमित्तानं ज्या शेतकऱ्यांची मुलं पुण्या-मुंबईत स्थिरावली आहेत, त्यांनी जर असे ठरवले, की किमान महिन्यातून दोनदा किंवा वर्षातून भात लावणी वा काढणी किंवा शेतीच्या हंगामी कामात मी आई-वडीलांकडे जाईन, तर शेती विकण्याची वेळ शेतकऱ्यावर कधीच येणार नाही.
'मुळशी पॅटर्न'सारखा चित्रपट लिहिल्यावर एक शेतकरी म्हणून माझी जबाबदारी वाढली. शेती हाच माझा मूळ व्यवसाय आहे. कितीही चित्रपट केले, तरी माझी मुख्य ओळख शेतकरी अशीच राहील. सिनेइंडस्ट्रीत कितीही व्यग्र असलो, तरी गेली चार-पाच वर्षं किमान भात लावणी आणि काढणीच्या वेळेला आवर्जून मी गावाला जातो आणि आई-वडिलांना मदत करतो. कारण शेती विकायची नसते, शेती राखायची असते आणि स्वतः जाऊन घाम गाळून ती कसायची पण असते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3f1Cxdj