मुंबई- मराठी वर्षातील आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. आषाढी एकादशीला महाराष्ट्रात वेगळे महत्त्व आहे. पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे दैवत. प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी वारी घेऊन जातात. गेल्या आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून ही वारी सुरू असल्याचे मानले जाते. आषाढी एकादशी म्हटले की, प्रथम डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी. वर्षभरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीलाही अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, अशी मान्यता आहे. पंढरपूरच्या वारीची थोरवी गावी, ऐकावी तेवढी थोडीच आहे. वारीबद्दल सांगण्यापेक्षा ती अनुभवण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. विठ्ठल भक्तांचा श्वास आणि ध्यास असणारी पंढरीची पायी वारी कोरोनामुळे यावर्षी थांबवावी लागली. विठ्ठला, जीवात जीव असेपर्यंत दरवर्षी पायी वारी करत तुझ्या दर्शनाला येईन असा विठ्ठलाला शब्द दिलेल्या वारकऱ्यांच्या काळजाचा जणू ठोकाच चुकला. या आषाढीला चंद्रभागेच्या तीरी झेंडा पताका फडकणार नाहीत, हरिनामाचा जयघोष होणार नाही, रिंगण होणार नाही, वारकऱ्यांना विठू माऊलीचं दर्शन घेता येणार नाही. याची देही याची डोळा विठ्ठलरूप मनात साठवता येणार नाही. धांवोनियां आलो पहावया मुख | गेले माझे दुःख जन्मांतरिंचे || ऐकिले ही होते तैसे चि पाहिले| मन स्थिरावले तुझ्या पायी|| तासनतास दर्शन रांगेत उभं राहून माऊलीचं दर्शन घेऊन मुक्ती अनुभवणारे आपले वारकरी. यावर्षी मात्र विठ्ठलाच्या वारकऱ्यांसाठीची आनंदाची पर्वणी अर्थात वारी आळंदीहून निघाली नाही. विठ्ठल भेटीची आस लागलेल्या तमाम विठ्ठल भक्तांसाठी काही करता येईल का असा विचार सचिन सुर्यवंशीने केला. याच विचारातून आषाढी एकादशी दिवशी लाखो वारकऱ्यांसाठी सचिन बाळासाहेब सुर्यवंशीचं लिखाण असलेलं विठ्ठलाचं एक आगळंवेगळं 'दर्शन' घडवलं. याला साथ दिली ती अभिनेता ने. त्याच्या सादरीकरणातून कोल्हापूर फिल्म कंपनीने विठ्ठलाचं आगळं वेगळं दर्शन वाकऱ्यांसाठी आणलं. 'दर्शन' ही कोल्हापूर फिल्म कंपनीच्या सचिन सुरेश गुरव यांची निर्मित, संकल्पना असून संकलन फैजल महाडिक यांनी केले आहे, पार्श्वसंगीत अमित पाध्ये यांनी दिले असून प्रथमेश रांगोळे यांच्या छायाचित्रणातून हे दर्शन आपल्याला घेता येणार आहे. असं हे विठ्ठलाचं आगळंवेगळं 'दर्शन', सेवेच्या रुपात कोल्हापूर फिल्म कंपनीने विठ्ठल भक्तांचरणी रुजू केली.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ignApv