Full Width(True/False)

सिनेमा त्याला 'दिसायचा'; संदीप कुलकर्णी यांनी सांगितलेल्या निशिकांतच्या आठवणी

निशिकांत सुरुवातीला जसा होता तसाच शेवटपर्यंत होता. तो स्वत: एक उत्तम अभिनेता असल्याने त्याच्याबरोबर काम करणे हा नटांसाठी छान अनुभव असायचा. तो एक उत्तम संकलक होता. त्यामुळे त्याला तो सिनेमा दिसायचा. त्याने कधीही ओव्हरशूट केले नाही. कुठला शॉट कसा लागेल हे त्याला बरोब्बर ठाऊक असायचे. सिनेमांचे त्याचे तांत्रिक ज्ञान अतिशय उत्तम होते. 'निशी'...होय, मी त्याला 'निशिकांत' अशी हाक क्वचितच मारली असेल. मी त्याला 'निशी'च म्हणायचो. कारण आमचे नाते तेवढे जवळचे होते. त्यात औपचारिकता कधीच नव्हती. 'डोंबिवली फास्ट' करण्याआधीपासून आमची ओळख होती. पूर्वी एका चॅनेलवर 'पोलिस फाइल' ही मालिका तो करायचा. मी त्यात भूमिका करायचो. तिथे आमची ओळख झाली होती. तेव्हा फावल्या वेळेत आम्ही चित्रपटांवर खूप बोलायचो. जागतिक सिनेमे, आपल्याकडचे सिनेमे यावर भरपूर चर्चा व्हायची. या चर्चेतून आमची मैत्री अधिक गाढ झाली. चित्रपटांच्या त्याच्या मनातील संकल्पना तो सांगायचा. आपला पहिला सिनेमा जेव्हा होईल तेव्हा होईल, पण तो एकत्र करायचा, असे आमचे ठरले होते. त्यानंतर माझा 'श्वास' आला. 'श्वास'ने मराठी सिनेमाला नवी दिशा दिली. मराठी सिनेसृष्टीत नवा उत्साह संचारला. त्यानंतर हा सळसळता उत्साह टिकवून ठेवण्यासाठी आम्ही ठरवले की 'डोंबिवली फास्ट'सारखा सिनेमा व्हायला पाहिजे. नाही तर 'श्वास'सारखा चित्रपट अपघातानेच झाला की काय, असे व्हायला नको. 'डोंबिवली फास्ट'ची कथा घेऊन तो दीड वर्ष फिरत होता. त्याला निर्माताच मिळत नव्हता. तोही जिद्दीला पेटला होता. चित्रपटाची कथा तो खूप रंजकपणे ऐकवायचा. अखेर एका कंपनीला तो विषय आवडला. त्यांनी चित्रपटाची निर्मिती करण्याची तयारी दर्शविली. परंतु हा चित्रपट आमच्या मनासारखा झाला नाही, तर तो आम्ही प्रदर्शित करणार नाही, असेही सांगितले होते. निशीला त्याच्या कामावर पूर्ण विश्वास होता. सिनेमा तयार झाला आणि तो पाहण्यासाठी निर्माते आले. त्यांचा चित्रपट पाहून होईपर्यंत आमची धाकधूक वाढली होती. त्यांना चित्रपट खूप आवडला. त्यानंतर मग या चित्रपटाची गाडी अक्षरश: 'फास्ट' सुटली. प्रसिद्धी मिळाली, अनेक पुरस्कार मिळाले. हिंदी सिनेसृष्टीतील काही लोकांनीही तो पाहिला आणि त्याचे कौतुक केले. या चित्रपटाची संपूर्ण प्रोसेस सुमारे अडीच-तीन वर्षांची आहे. तेवढा काळ मी त्याचा भाग होतो. कुठल्याही नटाला निशिकांतची साथ एवढा प्रदीर्घ काळ लाभली नसेल. त्या चित्रपटाने मला एवढी ताकदीची भूमिका साकारण्याची संधी दिली. या निमित्ताने निशी आणि माझ्यातले बंधही घट्ट होत गेले. त्यानंतर त्याने 'फोर्स' या हिंदी चित्रपटासाठीही मला साइन केले. पण, दुसऱ्या चित्रपटाला दिलेल्या तारखांमुळे मला तो करता आला नाही. रुईयाच्या नाक्याशी त्याचे घट्ट नाते होते. तेथील एका हॉटेलमध्ये तो नेहमी जायचा. त्या हॉटेलच्या मालकाशी त्याचे खूप जवळचे संबंध होते. 'डोंबिवली फास्ट'ला कुठलाही पुरस्कार मिळाला, की पुरस्कार सोहळा संपल्यानंतर रात्री उशिराही तो आवर्जून त्या हॉटेलमध्ये जायचा. तो पुरस्कार तिथे ठेवून, थोडा वेळ तिथे घालवून मगच घरी जायचा. पुढे जाऊन एकत्र आणखी काम करू असे आम्ही ठरविले होते. पण, तो योग काही नंतर आलाच नाही. -संदीप कुलकर्णी २००५ साली पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'डोंबिवली फास्ट'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला, त्यावेळी अभिनेता आणि दिग्दर्शक यांना गौरवताना हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार आमिर खान.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3aKGmSD