मुंबई टाइम्स टीम देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असल्यानं थिएटरमालक सरकारकडे चित्रपटगृहं सुरू करण्याची परवानगी मागत आहेत. सिनेमागृहं सुरू झाली नाही, तर देशभरातील लाखो लोकांचा रोजगार धोक्यात येण्याचा इशारा देण्यात आला आहे. चित्रपटगृहं सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी स्वत: कलाकार मात्र यावरुन संभ्रमात असल्याचं चित्र दिसून येतंय. थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याबाबत काही कलाकारांनी 'थांबा आणि वाट पाहा' अशी भूमिका घेतली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून चित्रपटगृहं बंद आहेत. एकीकडे चित्रिकरणाला परवानगी देण्यात येऊन मनोरंजनसृष्टी हळूहळू पूर्वपदावर येतेय. पण, चित्रपटगृहं सुरू करण्याबाबत अद्यापही अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे काही सिनेमांनी ओटीटीचा मार्ग निवडला आहे. चित्रपटगृहं सुरू कधी होणार या प्रतीक्षेत थिएटरमालक आणि त्यावर अवलंबून असणारे लाखो कर्मचारी आहेत. अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यातसिनेमागृहं उघडण्याची शक्यता होती. पण, तसं झालं नाही. त्यामुळे किमान १ सप्टेंबरपासून तरी सिनेमागृहं प्रेक्षकांसाठी खुली करण्याची परवानगी द्या; अशी मागणी केंद्र सरकारकडे थिएटर आणि मल्टिप्लेक्स संघटनांनी केली आहे. पण, मनोरंजनविश्वातील काही कलाकारांनी मात्र सुरक्षा महत्त्वाची असल्याचं म्हणत चित्रपट पाहण्यासाठी इतक्यात तरी सिनेमागृहांत जाणार नाही, असं म्हटलं आहे. त्यामुळे थिएटर व्यावसायिक अधिकच चिंतेत पडले आहेत. सिनेमागृह उघडल्यावर चित्रपट पाहण्यासाठी जाणार का? या प्रश्नांचं नकारार्थी उत्तर अभिनेत्री हिनं दिलं आहे. ती म्हणते, 'मला वाटत नाही की, मी आता थिएटरमध्ये जाण्यासाठी तयार आहे. गर्दीच्या ठिकाणी जाण्यात जोखीम आहे. सिनेमागृह हे एक बंदिस्त ठिकाण आहे. त्यामुळे मला वाटत नाही की, मी सिनेमागृहात जाईन. विशेष म्हणजे सरकारनंदेखील थिएटर उघडण्यास परवानगी दिलेली नाही. परंतु मी आशा करतेय की सिनेमागृहात सुरक्षितेतच्या सर्व उपायोजना असतील.' जबरदस्त अॅक्शन आणि रफटफ लुकसाठी ओळखला जाणारा अभिनेता विद्युत जामवाल याविषयी सांगतो, की 'सिनेमागृह व्यवसाय पुन्हा पूर्वपदावर लवकरात लवकर येण्याची आशा मी करतो आहे. प्रेक्षकांनादेखील थिएटरमध्येच सिनेमा पाहणं अधिक आवडतं. मलाही सिनेमागृहात जाऊनच चित्रपट पाहण्यात मजा येते. परंतु, माझ्यासाठी सुरक्षा खूप महत्त्वाची आहे, स्वतःची आणि प्रेक्षकांचीदेखील. सुरक्षिततेचा विचार प्राधान्यानं व्हायला हवा. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत मी सिनेमागृहात जाऊ इच्छित नाही. जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती स्वतःला सुरक्षित समजत नाही; तोवर जाणं योग्य ठरणार नाही.' अभिनेते पंकज त्रिपाठी आजच्या परिस्थितीत सिनेमागृहात जाण्यासाठी तयार नाहीत. ते म्हणतात, 'सध्या सर्वांच्याच मनात करोनाविषयी भीती कायम आहे. तशीच ती माझ्या मनात आहे. मीदेखील माणूसच आहे. मी सक्तीनं सुरक्षित वावराच्या नियमांचं पालन करतो आहे. गेल्या तीन-चार महिन्यांत मी कुटुंबाव्यक्तिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला भेटलेलो नाही. माझ्यामुळे मी कुणाला संकटात आणू इच्छित नाही. राहिला प्रश्न बाहेर पडण्याचा, तर सिनेमागृहात जाण्याचा निर्णय हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं. परंतु, मी सध्या बाहेर पडणं टाळतोय.' माझी स्वतःची थिएटर्स आहे. व्यवसायाला आर्थिक फटका बसला आहेच. परंतु, परिस्थितीसमोर आपण काय करू शकतो? सिनेमागृह उघडल्यावर प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी येतील का, याचं उत्तर वेळच देईल. सध्या मॉल, शहरातील अनेक दुकानं उघडली आहेत. परंतु, तिथेही लोकांचा ओढा कमी आहे. अनेक कार्यालयांमध्ये कर्मचारी येत नाहीत. त्यांचं वर्क फ्रॉम होमच सुरू आहे. सिनेमागृह व्यवसाय लवकरात लवकर पूर्ववत व्हावा अशी इच्छा आहे. परंतु, सध्या काहीच सांगू शकत नाही. - प्रकाश झा, निर्माते/दिग्दर्शक
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34hud6B