मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आता आपल्यात नाही. १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी त्याचा मृतदेह सापडला. सुशांतची सर्वांना आवडणारी गोष्ट म्हणजे तो जे काही काम करायचा ते अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे करायचा. तो एक हुशार विद्यार्थी, उत्कृष्ट डान्सर, अभिनेता, माणूस होता. '', 'काय पो छे' पासूनची त्याची मेहनत आणि यश साऱ्यांनाच माहीत आहे. पण सुशांतला आयुष्यात जे मिळालं ते अगदी सहज मिळालं नव्हतं. त्यासाठी त्याची अथक मेहनत होती. सुशांत अभ्यासात अत्यंत हुशार होता. अकरावीत असताना तो फिजिक्स ऑलम्पियाडमध्ये सहभागी झाला होता. तिथे त्याला सुवर्णपदक मिळाले होते. यानंतर दिल्लीतील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असताना एखादी कला जोपासावी असं त्याला वाटलं. यानंतर त्याने डान्स ग्रुप जॉइन केला. या ग्रुपसोबत सुशांतने अनेक शो केले. शामक दावरच्या ग्रुपनंतर त्याने बॅरी जॉनचं थिएटर जॉइन केलं. यानंतर सुशांत मुंबईत आला. सुशांतने एका मुलाखतीत सांगितले होते की संघर्षाच्या दिवसात तो सहा जणांसह एका खोलीत एकत्र रहायचा. यादरम्यान त्याला एका नाटकासाठी २५० रुपये मिळाले होते. सुरुवातीच्या काळात, त्याने मुलांची शिकवणी घेतली आणि त्याच साठवलेल्या पैशांतून त्याने स्वतःसाठी पहिली बाइक विकत घेतली. अवघड परिस्थितीतही त्याने स्वतःची जिद्द कधी सोडली नाही. प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला कसं सकारात्मक ठेवायचं हे त्याला उत्तमरित्या माहीत होतं. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर सुशांतला २००८ मध्ये पहिला ब्रेक मिळाला. बालाजी टेलीफिल्म्सच्या 'किस देश में है मेरा दिल' या मालिकेत त्याने काम केलं. यानंतर सुशांतने मागे वळून पाहिलं नाही. त्याने पवित्र रिश्ता मालिकेत मुख्य भूमिका साकारली. या मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला. २०१३ मध्ये काय पो छे सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यात सुशांतच्या कामाचे कौतुक झाले आणि त्याला फिल्मफेअर अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर सुशांतने 'शुद्ध देसी रोमांस', 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी' आणि 'पीके' सारख्या सिनेमात काम केले. २०१६ मध्ये, एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी या सिनेमात सुशांतने क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची भूमिका साकारली होती. या भूमिकेचंही खूप कौतुक करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी त्याचा 'छिछोरे' हा त्याच्या कारकिर्दीतील १०० कोटींची कमाई करणारा पहिला सिनेमा होता. आज सुशांत आपल्यात नाही यावर अजूनही विश्वास बसत नाही. एवढा हरहुन्नरी आणि सदैव हसत- खेळत आयुष्य जगणाऱ्या सुशांतने आत्महत्या का केली हाच प्रश्न अनेकांच्या मनात आहे. सध्या सीबीआय सुशांतच्या मृत्यूचा तपास करीत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2DK76GG