Full Width(True/False)

नका उचलू टोकाचं पाऊल! सिनेसंघटनांचं कलाकारांना आवाहन

कल्पेशराज कुबल मुंबई: बॉलिवूड स्टार सुशांतसिंहच्या जाण्यानं मोठा धक्का बसलेल्या मनोरंजनसृष्टीला अजूनही एकामागोमाग एक धक्के बसताहेत. मनमित गरेवाल, प्रेक्षा मेहता, कुशल पंजाबी, आशुतोष भाकरे, अनुपमा पाठक, समीर शर्मा या कलाकारांच्या अकाली निघून जाण्यानं हळहळ व्यक्त होतेय. सिनेसंघटनांनी या दुर्दैवी घटनांची गंभीर दखल घेतली असून, मुंबईत एकटे राहणारे कलाकार निराशेच्या गर्तेत अडकू नयेत, याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत कामासाठी आलेले कलाकार आपल्या कुटुंबापासून लांब राहतात. करोनाच्या संकटकाळात बहुतेकांच्या हाताला काम नाहीय. दुसरीकडे खर्चाचा आकडा कमी होत नाही. अशा कलाकारांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न कलाकारांच्या संघटनांकडून येत्या काळात प्रकर्षानं केला जाणार आहे. मनोरंजनसृष्टीनं एकत्र येऊन; कलाकारांच्या अडचणींबाबत एकमेकांशी खुलेपणानं बोलायला हवं, असा सूर इंडस्ट्रीतून उमटताना दिसतोय. करोनाचा संसर्ग रोखता यावा म्हणून काही अटी-शर्तींच्या चौकटीत मनोरंजनविश्वात चित्रीकरणाचं काम सुरू आहे. कलाकार, सिनेकर्मचारी आणि क्रूच्या एकूण मूळ संख्येपेक्षा केवळ ३३ टक्केच लोक सेटवर काम करण्याला परवानगी देण्यात आली आहे. परिणामी उर्वरित ६७ टक्के लोक अद्यापही बेरोजगार आहे. हाताला काम नसल्यानं अनेकांना नैराश्यानं ग्रासलं आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर आता, गेल्या चार-पाच महिन्यात झालेल्या इतर कलाकारांच्या आत्महत्यांच्या घटनांकडेही गांभीर्यानं पाहिलं जाऊ लागलंय. केवळ मनोरंजनसृष्टीपुरतीच ही चर्चा मर्यादित राहिलेली नसून, सर्वसामान्य लोकही त्याविषयी बोलताहेत. कलाकारांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये, म्हणून या निराशेच्या काळात यातून मार्ग काढण्यासाठी 'सिंटा', अर्थात 'सिने अँड टेलिव्हिजन आर्टिस्टस असोसिएशन'नं हालचाल सुरू केली आहे. लवकरच त्यांच्या सदस्यांची एक बैठक होणार असून त्यात प्रामुख्यानं याच विषयावरील उपाययोजनांवर विचार केला जाणार आहे. गेले चार महिने 'सिंटा'ने कलाकारांच्या मदतीसाठी पुढाकार घेऊन काम करत आहेच. परंतु, आता अधिकाधिक कलाकारांपर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचं 'सिंटा'कडून सांगण्यात आलं. कलाकारांना आवाहन नैराश्य, चिंता, काळजी, अस्वस्थता, ताणतणावांचं प्रमाण सध्याच्या परिस्थितीत सातत्यानं वाढते आहे. कलाकार जर बोलता झाला आणि मनातल्या गोष्टी त्यानं त्यांच्या जवळच्या व्यक्तीला किंवा आम्हाला (सिंटा) सांगितल्या, तर नक्कीच त्यातून मार्ग काढता येईल. नैराश्याची जाणीव योग्य वेळी झाल्यास संवाद साधून त्याला त्यातून नक्कीच बाहेर काढता येईल. करोना पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रात निराशेचं वातावरण आहे. परंतु, धैर्यानं सामोरं जाऊन परिस्थितीशी लढता येईल. कलाकारांच्या अस्वस्थतेचा क्षण योग्य वेळी हेरला गेला, तर आत्महत्येसारखे टोकाचे प्रकार रोखले जाऊ शकतील. त्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत; असं आश्वासन ज्येष्ठ अभिनेते आणि 'सिंटा'चे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज जोशी यांनी 'मुंटा'च्या माध्यमातून कलाकरांना दिलं आहे. कुणाच्या मनात काय सुरू आहे हे आपण ओळखू शकत नाही. परंतु, समोरून कोणी कलाकार व्यक्त होत असेल, तर त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेऊ शकतो. घडणाऱ्या घटना दुर्दैवी आहेत. त्या घडायला नकोत. त्यासाठी एकमेकांशी संवाद असणं अत्यंत आवश्यक आहे. मी किंवा माझ्यासारखे इतर निर्मातेही अस्वस्थ आहेत. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन येत्या दिवसात बैठक घेणार आहोत. काही पर्याय विचाराधीन आहेत. कलाकारांशी समन्वय साधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - जेडी मजीठिया, इंडियन फिल्म्स अँड टेलिव्हीजन प्रोड्यूसर्स काऊन्सिल, चेअरमन : टीव्ही विंग मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना त्यांच्या कामाचं मानधन नव्वद दिवसांनंतर न देता दर महिन्याला दिलं जावं, अशी मागणी 'सिंटा'नं निर्मात्यांकडे आणि वाहिन्यांकडे केली होती. निर्माते, ब्रॉडकास्टर्स, विविध संघटना यांची एकत्रित बैठक घेऊन निर्मात्यांनी दर महिन्याला मानधन देण्याची तयारी दर्शवली. कलाकारांची यापूर्वी बाकी असलेली रक्कमही देण्यात येईल. प्रत्यक्षात मात्र काही निर्मात्यांनी तसं केलं नाही. निर्मात्यांनीदेखील मानधनाचा विषय गांभीर्यानं घेतल्यास कलाकारांना आर्थिक चणचण भासून त्यांना नैराश्य येणार नाही. - मनोज जोशी, ज्येष्ठ कलाकार (वरिष्ठ उपाध्यक्ष - सिंटा)


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fLioaY