Full Width(True/False)

रिया शवगृहात का गेली? मुंबई पोलीस आणि डॉक्टरही आता रडारवर

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळालं आहे. सुशांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. पण याचवेळी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला शवगृहात जाण्याची परवानगी देण्यात आली. यावरुनच राज्य मानवाधिकार आयोगाने मुंबई पोलीस आणि कूपर रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. ४५ मिनिटांसाठी सुशांतचा मृतदेह शवगृहात असताना रियाला आतमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली होती. मुंबई मिररच्या वृत्तानुसार, मानवाधिकार आयोगाने महापालिकेच्या कूपर रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस दिली आहे. तर मुंबई पोलिसांनाही अशीच नोटीस मिळाली असल्याचं टाइम्स नाऊच्या वृत्तात म्हटलं आहे. मानवाधिकार आयोगाचे प्रमुख एमए सय्यद हे मुंबई मिररशी बोलताना म्हणाले, 'रिया चक्रवर्ती कूपरमधील शवगृहात जातानाचे अनेक व्हिडीओ मी पाहिले आहेत. याविषयीच्या तरतुदी तपासण्याचे निर्देश कायदेशीर विभागाला दिले आहेत. का आणि कोणत्या परिस्थितीत रियाला शवगृहात जाण्याची परवानगी मिळाली हे आम्हाला माहित नाही. असं होणं चुकीचं आहे.' पोलीस आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या मदतीविना सुशांतच्या कुटुंबीयांनाही शवगृहात जाण्याची परवानगी नव्हती. मग रियाला कोणत्या कारणासाठी परवानगी देण्यात आली, याचं स्पष्टीकरण द्यावं, अशी नोटीस कूपर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना देण्यात आली आहे. 'मृताशी तिचा संबंध नसतानाही रियाने शवगृहात प्रवेश का केला याचा तपास आम्ही करत आहोत. सर्व कायदेशीर बाबी पाळल्या जातील. पोलिसांनाही परिणामांना सामोरं जावं लागेल, अशी प्रतिक्रिया मानवाधिकार आयोगाच्या अधिकाऱ्याने मुंबई मिररला दिली. दरम्यान, आम्हाला अजून कारणे दाखवा नोटीस मिळालेली नसल्याचं मुंबई महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे. दुसरीकडे सीबीआयच्या तपासाला आता वेग आला आहे. सीबीआयने सिद्धार्थ पिठानीची डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये पाचव्यांदा चौकशी केली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32lqmTm