देशाचा आज साजरा होत असताना, सध्या आपल्या आजुबाजूला नेमकी काय परिस्थिती आहे? नेमकं काय चुकीचं घडतंय, काय होणं आवश्यक आहे? याबाबत काही ज्येष्ठ कलाकारांनी मांडलेले विचार. स्वातंत्र्याचा आदर आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालंय त्याचा आदर आपण केला पाहिजे. जबाबदार नागरिक म्हणून आपली नेमकी भूमिका काय असायला हवी याचा विचार सर्वांनी करावा. सध्या सोशल मीडिया प्रत्येकाच्या हातात असल्यामुळे त्याचा गैरवापर जास्त होताना दिसतो. समोरच्याला कमी लेखून त्याची निंदा करणं, दु:ख देणं हे सर्रास होताना दिसतंय, जे अत्यंत चुकीचं आहे. तंत्रज्ञानाचा मोजका, पण योग्य वापर मी करतो. अनेक गरीब, नवोदित प्रतिभावान गायक - वादक कलाकारांना मी माझ्या सोशल मीडियामधून कला सादर करायला सांगतो. या स्वातंत्र्याचा उपभोग घेताना त्याचा गैरवापर टाळा. लॉकडाउनमध्ये जो मोकळा वेळ मिळाला आहे, त्याचा सदुपयोग करावा. देशासाठी, भविष्यासाठी काय चांगलं करता येईल याच्यावर चर्चा या काळात होऊ शकते. - शंकर महादेवन, गायक-संगीतकार व्यक्त व्हा, पण... करोनामुळे माणसातली माणुसकी जागी होईल असं वाटलं होतं. पण, ते काहीच ठिकाणी पाहायला मिळालं. या काळात माणूस अंतर्मुख होईल, आपल्या आवश्यक गरजा काय आहेत त्यावर गंभीरपणे विचार करेल असं वाटलं होतं. पण तसं फार झालं नाही. व्यक्त होणं ही जेवढी गरज आहे तेवढाच हक्कदेखील आहे. काही माणसं फार चुकीच्या पद्धतीनं सोशल मीडियावर व्यक्त होतात. त्यामुळे काही लोक व्यक्त होण्याबाबत मनात भीती बाळगून जगतात. मग याला आपण स्वातंत्र्य म्हणायचं का? स्वातंत्र्य आणि स्वच्छंद यातला फरक कळला पाहिजे. एक दर्जा, सामाजिक भान ठेवून व्यक्त होण्यास कुणीही मनाई केलेली नाही. काहीतरी चुकीचं बोलून लाइक्स, फॉलोअर्स वाढतील. पण त्याचवेळी आपण स्वातंत्र्याचा अपमान करत असतो. - रेणुका शहाणे, अभिनेत्री दिसू दे प्रेम आजकाल आजुबाजूला पाहिल्यानंतर कुठेच प्रेम दिसत नाही. सगळीकडे एकमेकांबद्दल राग, तिरस्कार व्यक्त होतो. करोनाच्या काळातदेखील माणसं असा विचार कसा काय करतात याचं आश्चर्य वाटतं. सोशल मीडियाचा वापर फक्त आपलं नैराश्य व्यक्त करण्यासाठी केला जातोय, असं वाटू लागलंय. लोकांच्या अर्धवट ज्ञानाचा राजकीय पक्ष बऱ्याच वेळा गैरफायदा घेताना दिसतात. आपली सद्सदविवेकबुद्धी जागी ठेवून व्यक्त व्हायला हवं. देशात जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद असेल, तर मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग काय? सत्याचा आग्रह धरावा. विरोधी राहणं आणि विरुद्ध असणं यात फरक आहे. तो ओळखण्याची आता गरज आहे. सोशल मीडियापासून थोडं स्वतंत्र व्हायची गरज मला आजकाल भासतेय. देशात व्यक्तिस्वातंत्र्य आहे. पण, व्यक्त होताना असणाऱ्या मर्यादांचा विचार करायला हवा. - मकरंद देशपांडे, अभिनेता विचार व्हावा सारासार आपला देश सध्या प्रगतीपथावर आहे. प्रत्येकाला नैतिक स्वातंत्र्य मिळायला हवं. एक गट असा आहे की जो याला विरोध करतोय. पण, काही वर्षांनी हे सगळं संपेल आणि भारतामध्ये सुवर्णकाळ येईल. करोनानं जगभर थैमान घातलं असून, हा आजार एवढ्या लवकर जाणं शक्य नाही. त्यामुळे याला बरोबर घेऊन जगण्याची सवय आपण आता करून घ्यायला हवी. वाईट वेळ कलाकार, शेतकरी, व्यावसायिक सगळ्यांवरच आली आहे. गाडी रूळांवर यायला किमान २-३ वर्षं लागतील. सोशल मीडियावर स्वत:ची टिमकी न वाजवता सगळ्यांचा गंभीरपणे विचार करण्याची ही वेळ आहे. व्यक्त होताना सभ्यता ठेवायला हवी. सारासार विचार करून व्यक्त होता आला पाहिजे. - मोहन जोशी, अभिनेते स्वैराचार नसावा या काळातही मी निरोगी असल्याबद्दल ईश्वराचे रोज आभार मानतो. मी नियम पाळतोय. पण, अजूनही लोक या स्वातंत्र्याचा गैरवापर करताना दिसतायत. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात खूप फरक आहे. व्यक्त होत असताना आपली वाणी, भाषा कशा पद्धतीनं वापरतोय याचं भान सुटत चाललंय. सोशल मीडियाचा चांगले-वाईट दोन्ही उपयोग आहेत. आपली विवेकबुद्धी जागृत ठेवून वागलं पाहिजे. ज्या लोकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रक्त सांडलं, अशा लोकांनी पुढे जाऊन भारत देश असा बघायला मिळेल याचा विचारही केला नसेल. निदान त्याची तरी जाणीव ठेवून तरी स्वातंत्र्याचा आदर करायला हवा. एखादा व्यक्त होत असेल तर त्यावर टीकाटिप्पणी न करता त्यामागची भावना, परिस्थिती, कारणं तपासून घ्यायला हवी. - मनोज जोशी, अभिनेते शब्दांकन - गौरी भिडे
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kJOLdD