कल्पेशराज कुबलkalpeshraj.kubal@timesgroup.com भारतभूमीत आजवर अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या, त्यातील एक 'वीरांगना' म्हणजे पहिल्या महिला फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना. वयाच्या चोविसाव्या वर्षी त्या कारगिलच्या युद्धभूमीवर कर्तृत्व गाजवणा-या गुंजन सक्सेना यांची प्रेणादायी गोष्ट दिग्दर्शक शरण शर्माने सिनेमातून मांडली आहे. शौर्यचक्र विजेत्या गुंजन सक्सेना यांची गोष्ट पडद्यावर अधिकाधिक वास्तववादी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एखादा प्रसंग वगळता ती अतिरंजित केलेली नाही. गुंजनपासून ते फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेनापर्यंतचा प्रवास संयमाने दाखविण्यात आला आहे. एखाद्या जीवनपटामध्ये संबंधित पात्राचे केवळ चांगले गुणच दाखविले जातात. त्या व्यक्तीला जणू देवत्व बहाल केले जाते. परंतु, या सिनेमामध्ये दिग्दर्शकाने असे केलेले नाही. व्यक्तिमत्त्वातील गुण-अवगुण दोन्ही दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ स्त्री असल्यामुळे गुंजन सक्सेना (जान्हवी कपूर) यांना नाकारण्यात आलेली संधी, त्यावरुन झालेला संघर्ष या चित्रपटाच्या पटकथेत विशेष अधोरेखित करण्यात आला आहे. पण, हा संघर्षपूर्ण शौर्यपट तुम्हाला 'गुंजन' यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण करेल. सिनेमाच्या मर्यादेनुसार विशिष्ट कालखंडाचा (नव्वदचे दशक) सिनेमात समावेश करण्यात आला आहे. परंतु, चित्रपटाच्या कथानकापुढील गोष्ट जाणून घेण्यासाठी तुम्ही सिनेमा पाहून झाल्यावर अधिक उत्साहाने इंटरनेटवर त्याचा शोध घ्याल हे नक्की. हेच या प्रेरणादायी सिनेमाचे यश मानावे लागेल. कारण, चित्रपट संपल्यावरही त्यातील पात्र आपल्यासोबत राहते. जान्हवी कपूरने गुंजन यांची भूमिका उत्तम रितीने साकारली आहे. 'धडक' या तिच्या पदार्पणाच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळविले नव्हते. त्यानंतर तिच्या अभिनय कौशल्यावरदेखील प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. परंतु, यावेळी तिने आपल्या कामातून टीकाकारांना उत्तर दिले आहे. संपूर्ण सिनेमाभर ती सहज वावरते. अभिनयाबाबत विशेष कौतुक करायला हवे, ते म्हणजे पंकज त्रिपाठी यांचे. अनुभव आणि संयम त्यांच्या कामातून ठळकपणे दिसून येतो. अंगद बेदी यानेदेखील वाट्याला आलेले प्रसंग उत्तम साकारले आहेत. शरण शर्माचा पहिलाच स्वतंत्र चित्रपट आहे. सिनेमाच्या मूळ कथेसोबत लैंगिक विषमतेवर केलेले भाष्य समाजाला आरसा दाखवणारे आहे. चित्रपटाच्या उत्तरार्धात जेव्हा गुंजन हे पात्र युद्धप्रवण क्षेत्रात पहिल्यांदा आकाशात झेप घेण्यासाठी तयार असते, हेल्मेट घेऊन हेलिकॉप्टरच्या दिशेने ती धाव घेते, हा प्रसंग मनात देशाभिमान जागविणारा आहे. यावेळी छायांकन आणि पार्श्वसंगीत सिनेमाची उंची अधिक वाढवतात. अमेरिकी एरियल कोऑर्डिनेटर सिनेमॅटोग्राफर मार्क वुल्फ यांचे काम जबरदस्त म्हणावे असे आहे. मार्कने यापूर्वी 'मिशन इम्पॉसिबल' आणि 'स्टार वॉर्स' सारख्या सीरिजसाठी काम केले आहे. सोबतच सिनेमातील व्हीएफएक्सचे कामदेखील दर्जेदार आणि वास्तववादी आहे. एकवेळ आवर्जून पाहण्यासारखा हा सिनेमा आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2PVBlgw