मुंबई: 'मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?' या वक्तव्यानंतर अनेकांनी अभिनेत्री हिला मुंबईत न येण्याची ताकीद दिली होती. विरोधकांना चकवा देत कंगना मुंबईत दाखल झाली आणि घरी देखील पोहोचली आहे. घरी पोहचल्यानंतर कंगनानं एक व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला हा वाद आणखी चिघळ्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांवर टीका करताना कंगनाची जीभ घसरली असून तिनं उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला आहे.'उद्धव ठाकरे आज तुम्ही माझं घर तोडलं आहे, उद्या तुमचं गर्वहरण झाल्याशिवाय राहणार नाही' असं कंगनानं म्हटलं आहे. नेमकं काय म्हटलं आहे कंगनानं तिच्या व्हिडिओमध्ये: 'उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं…फिल्म माफियांसोबत मिळून तुम्ही माझं घर तोडलं आणि मोठा बदला घेतलाय. आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल. वेळेचं चक्र आहे, कोणासाठीही नेहमी सारखं राहत नाही हे लक्षात ठेवा. पण तुम्ही माझ्यावर उपकार केले आहेत असंच मी समजेन. काश्मिरी पंडितांना कसं वाटतं याची जाणीव मला आज झाली. मी या देशाला वचन देतेय की, मी केवळ अयोध्या नाही तर काश्मीरवरही सिनेमा बनवेन. आपल्या देशातील नागरिकांना जागरुक करणार. ही क्रूरता माझ्यासोबत घडली हे चांगलं आहे, कारण याला देखील एक अर्थ आहे. जय हिंद…जय महाराष्ट्र. पाहा व्हिडिओ: दरम्यान,कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर पालिकेने आज कारवाई केली. या कार्यालयातील काही अनधिकृत असलेलं अंतर्गत बांधकाम पाडण्यात आलं आहे. तसंच मुंबई व मुंबई पोलिसांविरुद्ध वक्तव्य केल्यामुळं कंगना शिवसेनेच्या रडारवर आली आहे. मुंबईत भीती वाटत असेल तर स्वत:च्या राज्यात निघून जाण्याचा सल्ला शिवसेनेनं कंगनाला दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून कंगनानं शिवसेनेला आव्हान दिलं होतं. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महापालिकेच्या वांद्रे पश्चिम येथील एच-पश्चिम विभागाच्या इमारत व कारखाने विभागाच्या पथकानं कंगनाच्या बंगल्याची पाहणी केली होती. त्यात काही बांधकाम सुरू असल्याचे आढळलं. त्यानंतर पालिकेने मंगळवारी प्रशासकीय परवानगीची कागदपत्रे सादर करण्याची नोटीस पाठवली होती. पालिकेचे अधिकारी नोटीस बजावण्यासाठी गेले असता तिथं हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनी नोटिस स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे पालिकेनं कार्यालयावर नोटीस चिकटवली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33rdewH