Full Width(True/False)

त्या दिवशी जाणवलं की ‘पा’ किती ग्रेट आहेत;अभिषेकनं सांगितला किस्सा

मुंबई: बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांचा आज ७८ वा वाढदिवस. जगभरातील चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत असून अनेक सेलिब्रिटींनी बिग बींना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा मुलगा अभिषेक नेहमीच अमिताभ यांच्याबद्दल भरभरून बोलत असतो. बॉलिवूडचे महानायक असलेले अमिताभ खऱ्या आयुष्यात किती ग्रेट आहेत, याबद्दल अभिषेकनं एकदा भावना व्यक्त केल्या होत्या. ‘पा’ किती ग्रेट आहेत ते... बाबांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. भारतातच नव्हे तर जगभरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक वयोगटात त्यांचे असंख्य चाहते आहेत. पण, घरात आमच्यासाठी मात्र ते फक्त आमचे बाबा आहेत. कुणाच्याही वडीलांसारखेच. कुठल्याही अडचणीच्या प्रसंगी आपल्या मुलांसाठी खंबीरपणे उभे रहाणारे, त्यातून चुटकीसरशी मार्ग काढणारे. घरी आम्ही त्यांना ‘पा’ म्हणतो आणि इतर कुठच्याही मुलाच्या वडीलांसारखेच ते आमच्यासाठी फक्त आमचे ‘पा’ आहेत. मोकळ्या वेळात भरपूर गप्पा मारणारे, जेवणाच्या टेबलावर आमच्याबरोबर असणारे, जेवताना मित्रांची आवर्जून चौकशी करणारे. आता आम्ही मोठे झाल्यावर किंबहुना या क्षेत्रात पाऊल टाकल्यावर, स्टारडम म्हणजे काय, या जगात कुणाकडे कसं बघितलं जातं याची जाणीव होत गेली. पण लहानपणी मात्र, आपले बाबा किती मोठे स्टार आहेत याची जाणीव आम्हाला कधीच नव्हती. ते सिनेमात काम करतात आणि ते इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहेत हे ठाऊक होतं. पण वेगळे म्हणजे नक्की काय हे माहीत नव्हतं. एक दिवस पहिल्यांदाच त्यांच्यासोबत एका ठिकाणी मी गेलो होतो. तिथे चाहत्यांनी त्यांना जे प्रेम दिलं ते पाहिल्यावर पहिल्यांदा जाणवलं की आपले ‘पा’ किती ग्रेट आहेत ते... त्या दिवसानंतर माझ्या बाबांना बारकाईने पहायला लागलो. आणि तेव्हा जाणवलं की जगात ज्यांचा खूप बोलबाला आहे, ज्यांना अक्षरशः पुजलं जातं ते सुपरस्टार घरात मात्र फक्त माझे ‘पा’ आहेत. त्या क्षणापासून त्यांच्याबद्दल असलेला अभिमान कित्येक पटींनी वाढला. आपल्या मुलांबाबत जागरूक असणाऱ्या कोणत्याही पित्याप्रमाणे आमची प्रगती, आमचे मित्र-मैत्रिणी, आमच्या आवडीनिवडी हे सगळं ते आवर्जून जपतात. बाहेरच्या जगात असलेल्या त्यांच्या कमालीच्या प्रतिमेचा स्पर्शही त्यांनी आमच्या घरगुती आयुष्याला होऊ दिलेला नाही. उलट माझ्या आजोबांनी त्यांना दिलेले संस्कार, आम्हालाही कसे मिळतील याबाबत ते सदैव जागरूक आहेत. आता माझी मुलगी आराध्याला वाढवतानाही माझ्या बाबांनी माझ्यावर केलेले संस्कार आमच्या डोळ्यांसमोर आहेत आणि तीच पुंजी मला पुढे न्यायचीय, माझ्या मुलीला द्यायची आहे. पण मला वाटतं की, श्वेताच्या मुलांना, माझ्या आराध्याला त्यांच्या या लाडक्या आाजोबांनी ती पुंजी स्वतः द्यावी. आम्हाला दिलेले संस्कार आपल्या नातवंडांनाही त्यांनी स्वतःच द्यावे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30UtoOw