'काही मालिका खूप खेचल्या जातात हे खरं आहे. पण, त्या बघितल्या जातात म्हणूनच सुरू राहतात. प्रेक्षकांनी नुसतंच बोलत राहण्यापेक्षा, काय बघायला आवडेल हेदेखील सांगावं'...हे म्हणणं आहे अभिनेते यांचं. '' या मालिकेतली त्यांची साईबाबांची भूमिका सध्या चर्चेत आहे. या निमित्तानं त्यांच्याशी झालेल्या गप्पा. संपदा जोशी ० कोट्यवधी भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या 'साईबाबां'ची भूमिका करताना नेमकी कशा प्रकारे तयारी केली?- मी शिर्डीला अनेकदा गेलोय. पण, साईबाबांविषयी खूप माहिती नव्हती. त्यामुळे नक्कीच साईबाबांच्या व्यक्तिरेखेचा नीट अभ्यास केला. 'श्रीसाईचरित्र' मिळवून ते वाचून काढलं. शिर्डी संस्थानाचे पवार काका यांच्यासह काही वर्कशॉप्स केली. ही भूमिका मी स्वीकारण्याआधीही प्रेक्षक बघत होते. त्यामुळे दिग्दर्शक या पात्राला जसा आकार देतोय, तसं मला स्वतःला त्या पात्रात बसवायचं होतं. सेटवरच्या सगळ्यांशी खूप चर्चा केली. त्यांच्या भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मला चित्रीकरण सुरू झाल्यावर समजलं, की ही भूमिका मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या खरंच खूप आव्हानात्मक आहे. ० आध्यात्मिक व्यक्तिरेखा साकारताना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं?- प्रत्येकाच्या मनातल्या साईबाबांना, त्यांच्याबद्दलच्या नितांत श्रद्धेला माझ्याकडून अभिनेता म्हणून कोणत्याही प्रकारे धक्का न लागू देणं हे एक मोठं आव्हान आहे. तसंच एक अभिनेता म्हणून हे भान ठेवणं गरजेचं आहे की साईबाबा हे एकमेव होते. पुन्हा ते होणं नाही. मी फक्त एक अभिनेता आहे. मालिकेमध्ये मला अगदी शुद्ध हिंदी भाषा बोलायची असते. साईबाबा स्वतः ते बोलताहेत असं प्रेक्षकांना वाटायला हवं. जो संदेश द्यायचाय तो नीट पोहोचायला हवा. हे एक आव्हान असतं. ० मराठी चित्रपटांमध्ये पुन्हा कधी दिसणार?- माझी सुरुवात मराठी चित्रपटांमुळेच झाली. सध्या मालिकेत व्यग्र आहे. एखाद्या आव्हानात्मक, वेगळ्या भूमिकेची वाट बघतोय. ० या मालिकेनंतर एखादी मराठी मालिका करणार का?- नक्कीच आवडेल. मी हिंदी मालिका जास्त केल्या असल्या, तरीही मी कटाक्षानं काही काळानं मराठी मालिकादेखील करतोच. मराठी मालिकांशी जुळलेली माझी नाळ तुटू शकत नाही. पण यातही एखादी अनोखी भूमिका करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार. ० ओटीटी माध्यमाबद्दल तुमचं मत काय?ओटीटी माध्यमामुळे जणू क्रांतीच झाली. अशा प्रकारचे विषय, सादरीकरण एवढ्या सहज-सोप्या पद्धतीनं बघता येतील हे आपल्याला माहितच नव्हतं. हल्ली जास्तीत जास्त प्रेक्षकवर्ग त्याकडे वळतोय. सध्या असं जाणवतंय की चित्रपट-मालिका या माध्यमांना या गोष्टीची जाणीव झाली आहे की आपण अजून काहीतरी चांगलं प्रेक्षकांना दिलं पाहिजे. ही चांगली गोष्ट आहे. पण, ओटीटीला सेन्सॉरशिप नसल्यामुळे अश्लीलता, हिंसाचार या गोष्टी इथे जरा जास्त आहेत. ही एक नकारात्मक बाजूदेखील आहे. ० तुम्हाला वेब सीरिजची ऑफर आली का?- हो. मी ओटीटीवर अनुराग कश्यपचा 'चोक' हा चित्रपट केलाय. त्यानंतर ज्या संधी आल्या त्यामध्ये, उगाचच घ्यायची म्हणून काही दृश्यं होती, भाषा होती. म्हणून मी त्या नाकारल्या. मालिकेत व्यग्र असल्यानं काही ऑफर्सना नाही म्हटलं. काही सीरिज स्क्रिप्ट न आवडल्यानं, तर काहींच्या तारखा न जुळल्यानं नाकारल्या. ० मालिकांच्या सद्यस्थितीबद्दल काय वाटतं?- हे दुधारी तलावारीसारखं आहे. एखादी मालिका जर छान चालली, तर वाहिनी ती बंद करणार नाही. प्रेक्षकांना कंटाळा आला तरीही टीका करत का होईना, ती मालिका ते बघतात. शेवटी हा सगळा टीआरपीचा खेळ आहे. काही काही मालिका अगदीच खेचल्या जातात. पण प्रेक्षक त्यांची जबाबदारी झटकू शकत नाही. कारण, ते बघतात म्हणून त्या मालिका चालतात. सध्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक मालिकांकडे प्रेक्षकांचा कल वाढलाय. नुसतंच बोलण्यापेक्षा, काय बघायला आवडेल हे प्रेक्षकांनी सांगावं. यामुळे मालिकांमध्ये नवनवीन प्रयोग करणं सोपं जाईल. ० कलाकारांना हल्ली सोशल मीडियावर सर्रास ट्रोल केलं जात असतं. काय सांगाल?- प्रत्येकाला त्याचं मत असतं आणि ते व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियासारखं माध्यम मिळालं आहे. एखादी चांगली गोष्ट होणार तशी ट्रोलिंगसारखी वाईट गोष्टही होणार. व्यक्त होणं चांगलंच, पण आपला तोल सुटत नाहीय ना, याचा विचार प्रत्येकानं करावा. जबाबदारीचीही जाणीव असायला हवी. ओटीटीमुळे चित्रपट-मालिका या माध्यमांना जाणीव झाली की आपण अजून काहीतरी चांगलं प्रेक्षकांना दिलं पाहिजे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30nJyiW