तिला तसं कुणीच नव्हतं.. पोरकीच जन्माला आली..आई-बाप कोण कुठे काही माहीत नव्हतं..अशीच जगली, कधी ह्या दारी तर कधी त्या दारी. दिसायला लहानपणापासूनच सुंदर, आणि वयात आल्यावर तर जणू काही सौंदर्यानं पायाशी लोळण घातली असावी. बांधा म्हणजे घाट लाजेल हो...इतका रेखीव. रंग लख्ख गोरा, चाफेकळी नाक, कांती नितळ आणि मनाच्या तळाशी फक्त विठ्ठल ..! नाव? कुणी तिला 'बयो' म्हणत, तर कुणी पांढरी, तर कोणी वारीला जाणारी जनी म्हणे ...पण, तिनं तिचं नाव रखमाबाई ठेवलं. इतक्या सुंदर पोरीला का बरं असं बेवारस जिणं आलं असावं? अनेक जण तिच्याकडे पाहून हळहळ व्यक्त करत. तिला जेव्हापासून देव कळायला लागला, तेव्हापासून तिनं फक्त विठ्ठलाचीच भक्ती केली असावी! गळ्यात तुळशीमाळा घातली आणि एक तुळस डोक्यावर घेऊन. परकर पोलक्यात वारीला जाऊ लागली! तिची वारी कुठल्याही गावातून सुरू व्हायची. पंढरपुरी माऊलीच्या दारी संपायची आणि ती पुन्हा एकदा केवळ जगण्याच्या वारीला सुरुवात करायची! चार घरी भांडीकुंडी करत. पडेल ते काम करीत 'विठ्ठल विठल' करीत त्यातच जगायची. पांडुरंगाची भजन गात दरवर्षी वारीला जाणं इतकंच..आणि पांडुरंगाचं दर्शन हीच कमाई. रखमा फार सुंदर गात असे... तिच्या आवाजात गोडवा होता भक्तीचा. हृदय विठ्ठलमय झाल की स्वर गोड लागणारच. ओवी, भजन, विठूरायाची गाणी म्हणताना तल्लीन होणारी रखमाबाई, आधार नाही म्हणून खचली नाही. माझा पांडुरंग नेईल त्या दारी..तो देईल ते आणि तितकंच. तर अश्या ह्या रखमाबाईचं आयुष्य अचानक बदललं. एके दिवशी पांडुरंगाचं दर्शन घेऊन बाहेर पडली आणि एका माणसाने विचारले "माझ्याबरोबर याल? पण माझं लग्न झालंय..गेली चार वर्ष तुम्हाला वारीला पाहतोय. तुम्हाला काही आसरा नाही असं कळलं. मी असेपर्यंत तुम्हाला आसरा देईन..छत मिळेल..सुखाचा घास देईन..माझं नावही लावा हवं तर. पण मणी मंगळसूत्र गळ्यात नाही घालता यायचं." रखमाबाई शांत उभी राहिली. तसाsss तो माणूस पुढे होऊन म्हणाला, "बदल्यात मला काहीही नको...तुम्ही आणि तुमचा पांडुरंग" ह्या शेवटल्या शब्दावर मात्र रखमा थबकली. रखमानं एकदा पांडुरंगाकडे पाहिलं आणि त्याच्याशी बोलायला मागे वळली. तोवर त्या माणसाची पाठ दिसली. रखमानं गळ्यातल्या तुळशीमाळेला हात लावला आणि झपाझप पावलं टाकीत त्याच्यापर्यंत पोचली. त्याच्याबरोबर परतीची, पण घराकडे जाणारी पावलं टाकू लागली. रखमाबाई त्याच्या घरात पोहोचली तेव्हा भयंकर गोंधळ माजला. "सखा पाटलाने बाई आणली" असे वार होऊ लागले. रखमा गोंधळून गेली. सखानं तिचा हात हातात धरला आणि तिला घरात आणलं तेव्हा त्यांची बायको रागाने लालबुंद झाली. "हा काय प्रसंग ओढवला आहेस तू रंगा..?" रखमाबाई डोळ्यांत पाणी आणून मनात आक्रोश करीत ती पांडुरंगाशी भांडत होती. सखा मात्र जन्मोजन्मीचं नातं असल्यासारखा तिच्या बाजूला ठाम उभा होता. त्यानं आपल्या बायकोला आतल्या खोलीत नेलं...तिला काय सांगितलं कोणास ठाऊक..पण ती बाहेर आली आणि परसदारी असेलेल्या धान्याच्या गोण्या हलवून रखमा आणि रखमाचं बोचकं जवळजवळ आदळलं. "इथून पुढे स्वयंपाकघरात पाऊल ठेवायचं नाही. जे काही शिजेल ते गपगुमान खायचं..दुसरी चूल पेटवायचा आगाऊपणा करायाचा नाही. माझा नवरा फक्त माझा आहे ..हक्क गाजवला तर गाठ माझ्याशी आहे. तू आणि तुझा विठ्ठल तुझी वारी म्हणून जग..त्यापलीकडे आलीस तर खबरदार." रखमा त्यावर काहीही बोलली नाही. आणि मग...कुठेही रस्त्यावर राहणारी, धर्मशाळेत, ग्रामपंचायतीच्या पारावर, देवळाच्या दारी, राहणारी रखमा, घर का काय म्हणतात त्यात राहायला लागली. (क्रमश:) वाचा अभिज्ञा भावेचं ': वाचा वैभव मांगलेचं' मेमरी कार्ड':
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jKxkrS