Full Width(True/False)

सेटवर कलाकारांच्या 'पोटोबा'ची काळजी घेणाऱ्यांचे होतायत हाल

chaitali.joshi@timesgroup.com लॉकडाउनमध्ये विश्व पूर्णपणे ठप्प झालं होतं. तीन महिने चित्रीकरण बंद असल्यामुळे पडद्यामागे काम करणाऱ्यांचीही परिस्थिती बिकट झाली. अनलॉकमध्ये पुन्हा चित्रीकरण सुरू झालं असलं, तरी सेटवर कमी लोकांमध्ये काम सुरू आहे. मालिकांच्या सेटवर चहा-नाश्ता, भोजनाची व्यवस्था सोय करणाऱ्या केटरर्सना आर्थिक फटका बसला. नव्या नियमांचं पालन करताना चित्रीकरणाच्या नियोजनात अनेक बदल करावे लागले. मालिकांची बजेट कमी झाली. काही मालिकांनी चित्रीकरणाची जागा बदलली, काही मालिकांच्या सेटवर भोजनव्यवस्थेत बदल झाले, तर काही सेटवर याबाबत काही मर्यादा आल्या. या बदलांमुळे मालिकांच्या टीमला सेटवर जेवण पुरवणाऱ्या काहींच्या हातची कामं गेली आहेत. तर काही ठिकाणी सेटवरील लोकांची संख्या कमी असल्यानं उत्पन्नात घट झाली आहे. लॉकडाउनपूर्वी अर्चना बिदनूर '' आणि 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकांच्या सेटवर भोजनव्यवस्थेचं काम बघायच्या. अनलॉकमध्ये चित्रीकरण सुरू झाल्यानंतर 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेची संपूर्ण टीम चित्रीकरणासाठी नाशिकला गेली. त्यामुळे त्या आता फक्त 'माझा होशील ना' या मालिकेसाठी भोजनव्यवस्थेचं काम त्या बघतात. 'लॉकडाउननंतर मनोरंजनविश्वात झालेल्या बदलांचा फटका आम्हालाही बसला आहे. नाइलाजास्तव वाहिन्यांनी चित्रीकरणात केलेले बदल आम्हाला स्वीकारावे लागले. हातातलं काम सुटू नये म्हणून जो तो प्रयत्न करतोय. आमच्याकडे काम करणारे अनेक जण असतात. आमचं एखादं काम बंद झालं, तर त्यांचंही आर्थिक नुकसान होतं. शिवाय, सध्याच्या काळात सुरक्षा आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून जेवणासाठी वापरून फेकून द्यायची (युज अँड थ्रो) ताटं, वाट्या, चमचे वापरावे लागतात. याचा वाढीव खर्च होतो', अर्चना यांनी सांगितलं. सेटवर कमी लोकांना परवानगी असल्यामुळे जेवण तुलनेनं कमी लागतं. वापरून फेकून द्यायची ताटं, वाट्या, पाणी पिण्याची भांडी, चमचे, पॅकिंगसाठी लागणारं सामान या सगळ्याकरीता जास्त किंमत मोजावी लागते. साधारणपणे एका सेटवर दोन वेळचा नाश्ता आणि दोन वेळचं जेवणं असतं. त्यामुळे त्यासाठीचा खर्च वाढतो, असं भोजनव्यवस्था करणाऱ्यांकडून सांगितलं जातंय. कल्याणी गोळे यांच्या हाती असलेलं एक काम या लॉकडाउनमुळे बंद झालंय. 'वैजू नंबर वन' या मालिकेच्या सेटवर त्या जेवण आणि नाश्ता पुरवत असत. पण, अनलॉकमध्ये चित्रीकरण सुरू झाल्यानंतर काही नियमांमुळे वाहिनीला बदल करावे लागले आणि कल्याणी यांचं काम बंद झालं. 'काम बंद झाल्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पुरेसे पैसे नसल्यामुळे भाड्याचं घर मला सोडावं लागलं. आता मी कुटुंबासह माझ्या आई-बाबांकडे राहायला आले असून, भाजी विकायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी मी जेवणाचे डबे देते. कसंबसं भागेल इतपत उत्पन्न मिळतंय', कल्याणी यांनी सांगितलं. या क्षेत्रात १८ वर्षांचा अनुभव असलेल्या कृष्णा तोरसकर यांनी सांगितलं, की 'माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवात अशी परिस्थिती मी पहिल्यांदाच बघतोय. पण टिकून राहायचं असेल, तर हातात आहे ते काम मिळेल त्या मोबदल्यात करावं लागणार आहे. सध्या मी दोन वेब सीरिज आणि 'सुखी माणसाचा सदरा' या मालिकेसाठी भोजनव्यवस्था बघतोय. मालिकांची बजेट कमी झाल्यामुळे आमच्याही उत्पन्नावर परिणाम झाला आहे. होतोय. सुरक्षेच्या दृष्टिनं अन्नपदार्थ पॅकबंद करण्याकरिता लागणाऱ्या अधिक मनुष्यबळ आणि साधनसामग्रीसाठी खर्चही वाढतो.' भोजनाची वेळ दुपारी दीड-दोनची असली, तरी सेटवर सगळे त्याच वेळेत जेवतातच असं नाही. काहींना उशीर होतो. पॅकबंद केलेले अन्नपदार्थ खराब होण्याची शक्यताही जास्त असते. त्यामुळे अन्न वाया जाण्याचं प्रमाण वाढतं, असं या वर्तुळातील जाणकार सांगतात. एका व्यक्तीच्या दोन वेळच्या जेवणाच्या पॅकिंगसाठी साधारणपणे ३५-४० रुपये लागतात. यानुसार केवळ पॅकिंगचा खर्च किती असू शकतो याची कल्पना येईल, असं ते सांगतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oLifdb