Full Width(True/False)

'टीआरपीमुळे दर्जात्मक मालिका चिरडली जाऊ नये इतकीच माफक अपेक्षा'

चैताली जोशी ० बऱ्याच दिवसांनी मालिकेतली मध्यवर्ती भूमिका स्वीकारावीशी का वाटली ? - मालिकांसाठी अधूनमधून विचारणा होतच असते. पण , वेळेअभावी अनेकदा ते शक्य होत नाही. 'जिगरबाज' मालिकेचा विषय मला महत्त्वाचा वाटला. सामाजिक विषय मला आवडतात. समाजात जागृती निर्माण करणारी अशी डॉ. मेश्राम ही व्यक्तिरेखा आहे. संकट आलं, तरी न डगमगणारी अशी ती व्यक्ती आहे. मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर राहता येतं. मालिकेत काम करताना मला वेगळाच आनंद मिळतो. मालिकेत पुढे काय होणार याबाबत नेहमी उत्सुकता वाढते. हे सगळं मला 'जिगरबाज' या मालिकेच्या बाबतीत वाटलं. म्हणून मी ही मालिका स्वीकारली. ० तरुण कलाकारांबरोबर तुम्ही नेहमीच काम करत आला आहात. काय वाटतं त्यांच्याबरोबर काम करताना? - या पिढीची ऊर्जा मला आवडते. ही पिढी प्रचंड वेगवान आहे. हा वेग थोडा कमी करून त्यांनी प्रत्येक पायरीचा आनंद घ्यावा. तरच नट म्हणून तुमचं आयुष्य अधिक समृद्ध होईल. नटाची निरीक्षण क्षमता उत्तम हवी. त्याला रंगभूमीची पार्श्वभूमी असली, तरी उत्तम. तिथे भाषा आणि शब्दांचं महत्त्व समजतं, क्षमता वाढीस लागते आणि कामामध्ये शिस्त येते. याच पायऱ्या महत्त्वाच्या आहेत. हे सोडून एकदम हिरो किंवा हिरॉइन होता येत नाही. ० वेब सीरिजमध्ये तुम्ही काम केलंय. या नव्या माध्यमाबद्दल तुम्हाला काय वाटतं ? - हा एक विलक्षण प्रकार आहे. मी दोन-तीन वेब सीरिजमध्ये काम केलंय. कुठेही वाईट अनुभव आला नाही. पण, मी अनेक वेब सीरिज बघितल्या आहेत. या माध्यमावर बंधन असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यातील काही दृश्यांना आणि भाषेला लगाम असणं गरजेचं आहे. कारण हल्ली अनेक सीरिजमधून जे दाखवलं जातंय ते बघून असं वाटू लागलंय की समाजात चांगलं, पवित्र असं काही आहे की नाही? की ते दाखवायचंच नाहीय. एकच गोष्ट सतत दाखवत राहिली की ती बोथट होते. पण चांगलं बघायचं, वाचायचं हे प्रत्येकाच्या हातात असतं. प्रेक्षक बघतोय, त्याला आवडतंय म्हणून तेच सतत दाखवलं जातं. ० रंगभूमीवर पूर्वीसारखे नाट्यप्रयोग होण्यासाठी बराच काळ जावा लागेल असं चित्र आहे. तुमचं यावर काय मत आहे ? - हो खरंय. प्रेक्षकांना सुरक्षित वाटत नाही, तोवर ते नाट्यगृहात येणार नाहीत. आले तरी ४०० ऐवजी १०० च असतील असा अंदाज. प्रयोगांना प्रेक्षकच आले नाहीत, तर नाट्यगृहं सुरू होऊनही अडचण होईल. तर दुसरीकडे तिथे काम करणाऱ्यांचा विचार व्हायला हवा. वेगवेगळ्या माध्यमातून अनेकांनी अशा गरजू लोकांना मदत केली आहे. पण, त्यालाही मर्यादा आहेत. या सगळ्यात खरं तर परिस्थितीचा दोष आहे. तरीही सरकारनं अशांच्या आर्थिक परिस्थितीबाबत थोडं लक्ष द्यायला हवं. करोनाकाळात करमणूक क्षेत्राकडे बरंचसं दुर्लक्ष झालंय. कलाकार फक्त समारंभासाठीच हवेत का? ते जेव्हा अडचणीत असतील तर त्यांना सहकार्य करायची जबाबदारी घ्यायला हवी. आम्ही कलावंतांनी आमच्या परीनं बरीच जबाबदारी घेतली. पण शेवटी आमच्या खिशालाही मर्यादा आहेत. ० टीआरपीमुळे मालिकेत बदल होत असतात. याबद्दल तुमचा काय अनुभव ? - टीआरपी म्हणजे काय हेच इतक्या वर्षांत मला कधी कळलं नाही. मी त्यात पडतही नाही. मी करत असलेली एक मालिका याच कारणास्तव बंद झाली होती. पण, त्याबद्दलची वाहिन्यांची गणितं वेगळी असतात. ग्रामीण, शहरी प्रेक्षक असं वर्गीकरण केलं जातं. विशिष्ट भागांत विशिष्ट मालिका बघण्याची कारणं वेगळी असतात. असे सगळे निकष लावले जातात. त्यामुळे कोणतीही वाहिनी या सगळ्याचा व्यावसायिकदृष्ट्या विचार करते. पण, टीआरपीमुळे दर्जात्मक मालिका चिरडली जाऊ नये इतकीच माफक अपेक्षा आहे. हल्ली अनेक सीरिजमधून जे दाखवलं जातं ते बघून असं वाटू लागलंय की समाजात चांगलं, पवित्र असं काही आहे की नाही?


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kPjiWd